'Shivaji's Initiative: Two-Day Organizations Today's 50th Convention of the Joint History Council of three Universities | ‘शिवाजी’चा पुढाकार : दोन दिवसीय आयोजन आजपासून तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन
‘शिवाजी’चा पुढाकार : दोन दिवसीय आयोजन आजपासून तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन

अमरावती : विदर्भातील तीन विद्यापीठांच्या संयुक्त इतिहास परिषदेचे ५० वे अधिवेशन १० व ११ फेब्रुवारीला स्थानिक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. परिषदेचे उद्घाटन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
राष्ट्र संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि गोंडवाना विद्यापीठ (गडचिरोली) यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या इतिहास परिषदेच्या ५० व्या अधिवेशनाच्या आयोजनाचा मान श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाला मिळाला आहे. प्राचार्य स्मिता देशमुख उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राहतील. इतिहास परिषदेचे अध्यक्ष पी.एन. उपाख्य बाबासाहेब देशमुख, सचिव शरद बेलोरकर हे परिषदेला प्रामुख्याने उपस्थित राहतील. 
शनिवार, १० फेब्रुवारीला दुपारी १२ वाजता परिषदेचे उद्घाटन होईल. श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख नितीन चंगोले हे या परिषदेचे संयोजक आहेत. दुपारी ४ वाजता ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. अरुणा राऊत यांच्या अध्यक्षतेत चंदा जगताप, प्रशांत कोठे, ज्योती खडसे, संजय ठवले, अरुण फरपट, नामदेव ढाले, नत्थू गिरडे, प्रकाश तायडे हे अभ्यासक परिसंवादात सहभागी होतील. सांस्कृतिक कार्यक्रमाने पहिल्या दिवशीचा समारोप होईल. 
रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता ‘विदर्भाचा सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक वारसा’ या विषयावर भूपेश चिकटे यांच्या अध्यक्षतेत आयोजित परिसंवादात राजू वाघ, सातभाई, गोविंद तिरमनवार, तीर्थानंद बझागरे, अनिल ठाकरे, आनंद भोयर, प्रमोद हयार, सच्चिदानंद बिच्चेवार हे विचार मांडतील. नंतर सकाळी १०.३० वाजता घनश्याम महाडिक, शीला उमाळे व गोविंद तिरमनवार हे विविध विषयांवर शोधनिबंध सादर करतील. दुपारी १ वाजता मलकापूर येथील श्रीमती के. के. अग्रवाल महाविद्यालयाचे प्राचार्य एस.आर. राजपूत यांच्या अध्यक्षतेत आणि भूषण चिकटे व रवि वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा समारोप होईल. या परिषदेला इतिहासप्रेमी अभ्यासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, अशी विनंती संयोजक नितीन चंगोले यांनी केली आहे.


Web Title: 'Shivaji's Initiative: Two-Day Organizations Today's 50th Convention of the Joint History Council of three Universities
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.