तीन कोटींनी माघारली कर वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:52 AM2017-12-31T00:52:26+5:302017-12-31T00:52:41+5:30

आर्थिक अरिष्टांशी झगडणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर शतप्रतिशत मालमत्ता करवसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे तीन महिने असताना महापालिकेच्या तिजोरीत केवळ १८.२० कोटी रूपये आल्याने चिंतेत भर पडली आहे.

 Recovery of three crores tax recovered | तीन कोटींनी माघारली कर वसुली

तीन कोटींनी माघारली कर वसुली

Next
ठळक मुद्दे२९ कोटींचे उद्दिष्ट : वरातीमागून घोडे

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आर्थिक अरिष्टांशी झगडणाऱ्या महापालिका प्रशासनासमोर शतप्रतिशत मालमत्ता करवसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. २०१७-१८ हे आर्थिक वर्ष संपायला उणेपुरे तीन महिने असताना महापालिकेच्या तिजोरीत केवळ १८.२० कोटी रूपये आल्याने चिंतेत भर पडली आहे. पुढील ९० दिवसांत महापालिकेला तब्बल २९ कोटी रूपयांचा मालमत्ता कर वसूल करावयाचा आहे. विशेष म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत मालमत्ता कराच्या वसुलीत तब्बल ३ कोटी रुपयांची घट आली आहे. १ मार्च ते २४ डिसेंबर २०१७ या कालावधीत १८.२० कोटी मालमत्ता कर वसूल झाला, तर मागील वर्षी याच कालावधीत महापालिकेच्या तिजोरीत २१.११ कोटी रुपये जमा होते.
मालमत्ता पुनर्सर्वेक्षण व कर निर्धारणाला ग्रहण लागल्यानंतर लिपिक व सहायक आयुक्तांनी ‘मेहनत’ करत नव्या मालमत्ता कराच्या अखत्यारित आणल्या. त्यामुळे मालमत्ता कराची मागणी ३७ कोटीवरून ४७.२२ कोटींवर पोहोचली. मात्र, ज्या तुलनेत मागणी वाढली त्या तुलनेत वसुलीचा टक्का कमालीचा घसरला. मार्च २०१७ पासून २४ डिसेंबरपर्यंत १८.२० कोटी ८ रुपयेच करवसुली झाली. गतवर्षीच्या तुलनेत त्यात तीन कोटींची घट आली असताना जानेवारी ते मार्च २०१८ या उर्वरित तीन महिन्यांत तब्बल २९ कोटी रूपये पालिकेला वसुलण्याचे आहेत. त्यासाठी सुटीच्या दिवशीही करवसुली शिबिर घेण्यात येत आहे.
महापालिकेच्या उत्पन्नाचा एकमेव स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली प्रचंड माघारल्याने सहायक आयुक्त व करवसुली लिपिकांच्या जबाबदारीत भर पडली आहे. मालमत्ताधारकांनी थकीत वसुली भरून शहराच्या विकासास सहभाग द्यावा व दंड टाळावे, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार यांनी केले आहे.
पिठे अग्रमानांकित, डेंगरे माघारले
झोनस्तरावर करवसुलीची सर्व जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. पाचही झोनची एकूण मागणी ४७ कोटींच्या घरात असताना यात रामपुरी कॅम्प झोनने सर्वाधिक वसुली करून प्रथम क्रमांक पटकावला आहे. या झोनचे सहायक आयुक्त योगेश पिठे आहेत, तर पाचही झोनच्या तुलनेत अमित डेंगरे सहायक आयुक्त असलेले भाजीबाजार झोन तूर्तास माघारला आहे.

Web Title:  Recovery of three crores tax recovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.