बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 06:10 PM2022-12-28T18:10:17+5:302022-12-28T18:10:57+5:30

प्रकल्प उभारणीसाठी अजूनही दीड वर्ष लागणार, बेरोजगार युवकांना रोजगाराची प्रतीक्षा

Railway wagon factory in Badnera started; Speed up repair of coach-wheels | बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग

बडनेऱ्यातील रेल्वे वॅगन कारखाना सुरू; डबे-चाकांच्या दुरुस्तीला वेग

googlenewsNext

श्यामकांत सहस्रभोजने

बडनेरा (अमरावती) : बडनेरातील बहुप्रतिक्षीत रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्यात ट्रायल बेसिसवर डबे तसेच चाकांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून या कारखान्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. अजूनही या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दीड वर्षाची प्रतीक्षा लागणार आहे.

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नाने बडनेरा ते काटआमला मार्गावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखाना उभारण्यात आला आहे. २०० एकरात याचे काम सुरू असून, ३०० कोटींपेक्षा जास्त रकमेतून हा प्रकल्प साकारला जात आहे. मोठा तसेच रोजगारांची संधी उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प नावारूपास येत आहे. प्रारंभी या प्रकल्पाच्या निर्मितीत संथगती होती. जमीन हस्तांतरणाला शेतकऱ्यांकडून बराच अवधी लागला. तर कोरोनात मजुराअभावी काम ठप्प होते. प्रकल्प उभारणीचे काम करणाऱ्या कंपन्यांचा वेळकाढूपणा देखील दिरंगाईस कारणीभूत आहे. गत वर्षभरापासून येथील कामाला गती मिळाली आहे. हा कारखाना सुरू होण्याबाबत अनेकदा तारखा देण्यात आल्या. प्रत्यक्षात अजूनही दीड वर्षांची प्रतीक्षा लागणार आहे. मध्यंतरी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वे वॅगन कारखान्याची पाहणी करून या प्रकल्प पूर्णत्वासासाठी संबंधित यंत्रणेला सूचना केल्या होत्या, हे विशेष.

कोच तसेच चाकांच्या दुरुस्तीला सुरुवात

गेल्या दीड महिन्यापूर्वी या कारखान्यात कोच तसेच रेल्वे गाड्यांची चाके त्याचप्रमाणे इतरही कामांच्या दुरुस्तीला सुरुवात झाली. कुर्डुवाडी, भुसावळ, नागपूर विभागातून या ठिकाणी कोच तसेच चाके दुरुस्तीसाठी आली आहेत. त्यांच्या दुरुस्तीचे काम झपाट्याने सुरू आहे. रेल्वे डबे, चाकांच्या दुरुस्तीची कामे वेगाने होत आहेत.

अद्यापही बरीच कामे बाकी

हा कारखाना उभारणीला प्रत्यक्षात २०१७ पासून सुरुवात झाली. मात्र काही तांत्रिक अडचणी, मंत्रालयातील दिरंगाई, मनुष्यबळाचा अभाव, कोरोना काळात कामे ठप्प अशा एक ना अनेक कारणांनी या प्रकल्पाची कामे अत्यंत संथगतीने सुरू झाली. खरे तर कोरोनानंतर या कारखान्याच्या सभोवतील संरक्षण भिंत उभारण्यात आली. पाण्याच्या टाकीचे काम झाले. मात्र अंतर्गत रेल्वे ट्रॅक, शेडची कामे काहीशी बाकी आहे. परिसरात मुरूम भरून लेवल करण्याचे काम सध्या सुरू आहे. रस्ते तसेच इतरही बरीच कामे अद्याप होणे बाकी आहे.

दीड हजार लोकांना मिळू शकतो रोजगार

हा कारखाना पूर्णपणे सुरू झाल्यानंतर येथील कामासाठी जवळपास दीड हजार लोकांना रोजगार मिळू शकतो. स्थानिकांना या कारखान्यात प्राधान्याने रोजगार मिळाला पाहिजे, असे शहरवासीयांमध्ये सुरुवातीपासूनच बोलले जात आहे. रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या माध्यमातून एक चांगली रोजगाराची संधी मिळणार आहे. त्याकरिता बेरोजगार युवकांना प्रतीक्षा आहे.

Web Title: Railway wagon factory in Badnera started; Speed up repair of coach-wheels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.