पवन महाराजाच्या आई-वडिलांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 10:21 PM2018-06-15T22:21:51+5:302018-06-15T22:21:51+5:30

अंगात देव येत असल्याचे सोंग करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराजाच्या आई-वडिलांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरात तीन तलवारी सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४/२५ आर्म्स अ‍ॅक्टचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज पसार झाला असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.

Pawan Maharaj's parents got the police custody | पवन महाराजाच्या आई-वडिलांना पोलीस कोठडी

पवन महाराजाच्या आई-वडिलांना पोलीस कोठडी

Next
ठळक मुद्देबयाण नोंदविले : आर्म्स अ‍ॅक्टचाही गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंगात देव येत असल्याचे सोंग करून अंधश्रद्धा पसरविणाऱ्या पवन घोंगडे ऊर्फ घोंगडे महाराजाच्या आई-वडिलांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्याच्या घरात तीन तलवारी सापडल्यामुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध ४/२५ आर्म्स अ‍ॅक्टचाही गुन्हा नोंदविला आहे. पवन महाराज पसार झाला असून, त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
मागील तीन वर्षांपासून कांतानगरातील शासकीय वसाहतीत पवन घोंगडे महाराज याचे कारनामे सुरू आहेत. अष्टमी, अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी घोंगडे महाराज देव अंगात आल्याचे सोंग करायचा. साडी नेसून अंगाला हळदी-कुंकवाचे टिळे लावून देवाचा अंगात संचार असल्याचा आव आणत अंधश्रद्धा पसरवित होता. धार्मिक भावनेतून अनेक अंधश्रद्धाळू या भोंदूबाबाशी जुळत होते. त्याचे विविध प्रताप पाहून तेथील रहिवाशांची तळपायाची आग मस्तकात जायची. मात्र, कोणी बोलले की, पवनसह त्याचे आई-वडील नागरिकांच्या अंगावर धावून जायचे. अनेकदा तेथील रहिवाशांचे घोंगडे कुटुंबीयांशी वाद झाले. पोलिसांपर्यंत पोहोचले तरी त्यांची पोलिसांनी फारशी दखल घेतली नाही.

गाडगेनगर पोलिसांची टाळाटाळ
घोंगडे महाराजासमोर नतमस्तक होणाºया अंधश्रद्धाळूंचा जमावडा, होमहवन, जोरजोरात ओरडणे, भूत उतरविणे आदी प्रकारांची सवयच तेथील नागरिकांना झाली होती. पोलीस कारवाई करीत नव्हते. भोंदूबाबा पवन महाराजसोबत शेकडो अंधश्रद्धाळू जुळल्यामुळे त्याच्या भक्तांनी व चेल्यांनीही नागरिकांसोबत हुज्जतबाजी सुरू केली होती. दररोज अंधश्रद्धाळूंची संख्या वाढतच होती. पवन महाराजाचा लोकदरबार भरतच होता. त्यामुळे नागरिक अक्षरशा: वैतागले होते. अखेर या भोंदूबाबाच्या प्रतापांना वैतागून तेथील नागरिकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे धाव घेतले. त्यांनी दखल घेत गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविली. तरीसुद्धा पोलिसांनी फारसे लक्ष दिले नाही. महिना लोटत असतानाच कारवाई होत नसल्याचे पाहून नागरिकांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी पवन महाराजाचा शोध सुरू केला आणि त्याच्या आई-वडिलांना अटक केली. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतरही भरला पवन महाराजाचा दरबार
अमरावती : अंधश्रद्धा पसरविणाºया पवन महाराजाविरुद्ध कांतानगर रहिवासी व अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून १५ मे रोजी पहिली तक्रार करण्यात आली. पोलिसांनी पवन घोंगडेविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, त्याला अटक केली नाही. पोलिसांना त्याच्या घरी पाठविण्यात आले तेव्हा ‘दरबार’ भरला होता. १६ जून रोजी पुन्हा रहिवाशांनी थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदविली. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी हालचाल सुरू केली. यावरून गाडगेनगर पोलीस कितपत ‘कर्तव्यदक्ष’ आहेत, ही बाब दिसून येते. महिनाभर गाडगेनगर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला नाही. पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ अ‍ॅक्शन घेत पवन महाराजचे घर गाठले आणि घराची झडती घेतली. त्यातच जप्तीही अर्धवट केली. हा प्रकार आरोपी पवन महाराजाला पाठीशी घालण्याचा असून, ठाणेदार मनीष ठाकरे यांनी चौकशी का होऊ नये, असा सवाल आता नागरिक करीत आहेत.

ती आलमारी कधी उघडणार
पवनच्या घरातील आलमारीत तंत्र-मंत्राचे काही साहित्य असल्याची शंका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. घरझडतीत नेमकी तीच कुलूपबंद आलमारी पोलिसांनी तपासली नाही. ती आलमारी उघडली, तर जादुटोण्याविषयीची काही पुरावे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

पूजाअर्चेचे साहित्य जप्त
पवनच्या घरझडतीत पोलिसांनी पूजाअर्चेचे साहित्य जप्त केले. त्यामध्ये खारका-बदामा, राळ, उद, ४४ कवड्यांचे दोन हार, मोरांचे पंख यांचा समावेश आहे.

आर्म्स अ‍ॅक्टचा गुन्हा
पवन घोंगडेच्या घरातून पोलिसांनी तीन तलवारी जप्त केल्या. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम २ (क), २(घ), ३ व ४/२५ आर्म्स अ‍ॅक्टनुसार गुन्हा नोंदविला.

पवन महाराज मुंबईला
पवन घोंगडे हा तरुण वयात महाराज बनून देव अंगात येण्याचे नाटक करीत आहे. त्याच्या आई-वडिलांनी पवन हा स्पर्धा परीक्षेसाठी मुंबईला गेल्याचे पोलिसांना सांगितले. आता तेथे जाऊन पोलीस ताब्यात घेणार का, याकडे लक्ष लागले आहे.

तत्कालीन एसीपींची भेट
पवन घोंगडेच्या भोंदूगिरीने झालेल्या त्रस्त झालेल्या नागरिकांनी वर्षभरापूर्वी गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यावेळी तत्कालीन एसीपी चेतना तिडके यांनी कांतानगरातील शासकीय वसाहतीत जाऊन पाहणी केली होती. त्यावेळी पवन महाराजांची आराधना करणारे अनेक अंधश्रद्धाळू उपस्थित होते. मात्र, त्यानंतरही पवनविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.

भोंदूगिरी करणारा आरोपी अद्याप हाती लागला नाही. त्याचा कसून शोध सुरू आहे. त्याच्या घराच्या झडती घेण्यास आली असून, तलवारी जप्त केल्यामुळे आर्म्स अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदविण्यात येईल.
- चिन्मय पंडित, पोलीस उपायुक्त.

Web Title: Pawan Maharaj's parents got the police custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.