मेळघाटात पहिल्यांदाच आढळला पाकिस्तानी ‘कॉमन बझार्ड’

By गणेश वासनिक | Published: December 14, 2023 05:00 PM2023-12-14T17:00:27+5:302023-12-14T17:01:26+5:30

दुर्मिळ पक्षी म्हणून नोंद, मेळघाटच्या यादीत आणखी एका प्रजातीची भर, आतापर्यंत ३०५ ईतक्या पक्ष्याची यादी

Pakistani 'Common Buzzard' found for the first time in Melghat | मेळघाटात पहिल्यांदाच आढळला पाकिस्तानी ‘कॉमन बझार्ड’

मेळघाटात पहिल्यांदाच आढळला पाकिस्तानी ‘कॉमन बझार्ड’

गणेश वासनिक,अमरावती : मेळघाटचे जंगल हे विविधतेने संपन्न असा अधिवास असून या ठिकाणी पक्षी प्रजातींची विविधता विशेष संपन्न आहे. देशभरात आढळणाऱ्या एकूण प्रजातींपैकी आजवर जवळपास २५ टक्के प्रजातींची या ठिकाणी नोंद झालेली आहे. मेळघाटच्या जंगलात पक्षी अभ्यासाची सुरुवात सुमारे दीडशे वर्षापूर्वी झाली होती, त्यानंतर वेगवेगळ्या काळात झालेल्या अभ्यासातून आजवर ३०४ पक्ष्यांची नोंद झालेली आहे. या यादीत सामान्य बाज (कॉमन बझार्ड) या पक्ष्याची नव्याने भर पडली असून ही प्रजाती नुकतीच मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळून आली आहे.

मेळघाट येथे नुकतेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे चार दिवसीय निसर्गशिबीर संपन्न झाले. यात तज्ञ मार्गदर्शक हे अकोट वन्यजीव विभागातील जंगल भ्रमंतीमध्ये असताना धारगड भागातील जंगलात सामान्य बाज हा दुर्मिळ पक्षी आढळून आला. पक्षी अभ्यासक तथा मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर, निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. निशिकांत काळे, अभ्यासक नंदकिशोर दुधे, पक्षिमित्र अमोल सावंत व शिबिरार्थींना हा पक्षी एका वाळलेल्या झाडाच्या खोडावर बसलेला आढळून आला. त्याचे निरीक्षण केले असता तो शुभ्रनयन तिसा या प्रजाती पेक्षा वेगळा वाटल्याने त्याचे थांबून सखोल निरीक्षण केले आणि त्याची चांगली छायाचित्रे टिपण्यात आलीत. शेवटी हा पक्षी सामान्य बाज नावाचा दुर्मिळ पक्षी असल्याची खात्री पटली. ही या पक्ष्याची मेळघाटातील प्रथम नोंद आहे. यापूर्वी मेळघाटच्या पक्षी सुचिमध्ये या पक्ष्याचा समावेश नव्हता.

‘कॉमन बझार्ड’चे खाद्य सरडे, साप :

मेळघाटात आढळून आलेला हा पक्षी बुटीओ प्रजातीची वूल्पीनस ही उप प्रजाती असून यामध्ये दोन उप प्रजाती आढळतात. आकाराने शुभ्रनयन तिसा या प्रजाती पेक्षा मोठा जवळपास ५५ सेंमी असलेला हा बाझ रंगाने गडद विटकरी असून छातीवर आणि डोक्यावर तपकिरी रंगाच्या उभ्या रेषा असतात. चोच आखूड, टोकावर काळ्या रंगाची असून डोळ्यावर काळ्या रंगाची भुवई दिसते. शेपूट आखूड व त्यावर खालून बारीक उभ्या रेषा असतात. शिकारी पक्षी गटातील या पक्ष्याचे खाद्य इतर गरुड किंवा बाझ प्रमाणे लहान प्राणी, सरडे साप इत्यादी असून तो मासाहारी पक्षी आहे. सामान्य बाझ प्रजातीच्या या नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी ३०५ इतकी झाली आहे.

Web Title: Pakistani 'Common Buzzard' found for the first time in Melghat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.