राज्यात वनवणवा नियंत्रणासाठी तोकडी यंत्रणा, निधीची वानवा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2018 04:02 PM2018-02-11T16:02:14+5:302018-02-11T16:03:07+5:30

राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे.

No Forest Fire Cuntrol System in Maharashtra | राज्यात वनवणवा नियंत्रणासाठी तोकडी यंत्रणा, निधीची वानवा

राज्यात वनवणवा नियंत्रणासाठी तोकडी यंत्रणा, निधीची वानवा

Next

- गणेश वासनिक 
अमरावती - राज्यातील एकूण वनक्षेत्रापैकी निम्म्याहून अधिक विदर्भातील वनक्षेत्र दरवर्षी उन्हाळ्यात स्वाहा होत असताना वणवा नियंत्रणात आणण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात वनविभाग अपयशी ठरले आहे. आग विझविण्याचे प्रशिक्षण नसल्याने एका वनरक्षकाचा आगीत होरपळून जीव गेला आहे.
सध्या आगीचा हंगाम सुरू झाल्याने वनविभाग अलर्ट झालेला आहे. सर्वाधिक आगीची भीती राज्यातील पाच व्याघ्र प्रकल्पांना यासोबत प्रादेशिक वनविभागाच्या जंगलास आहे. गतवर्षी विदर्भातील वनक्षेत्रास लागलेल्या आगीत जवळपास २५ हजार हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले होते. यावर्षीसुद्धा वनविभागास वनक्षेत्रास लागणा-या आगीची चिंता आहे. त्यामुळे वनक्षेत्रामध्ये फायर लाईन कापणे व जाळण्याचे काम युद्धस्तरावर सुरू झाले असले तरी सदर कामास आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याचे वनविभागाची गोची झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत वनक्षेत्रास लागणारी आग ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागणाºया वनवणव्याचे नियोजनासाठी राज्य शासनाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली असून विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त व मुख्य वनसंरक्षकांची समिती गठित असताना या समितीचा बोजवारा उडाला आहे. समितीला डी.पी.सी.डी.च्या फंडातून वनवणवा नियंत्रणाकरिता निधी देण्याचे धारिष्ट्य होत नाही. 

वाहनांचीही वानवा
आग नियंत्रणासाठी उन्हाळ्याच्या हंगामात वनविभागास कोणत्याही विभागाची वाहने किंवा कर्मचारी बोलाविण्याचा अधिकार आहे. तसे अधिकार विभागीय आयुक्त व प्रादेशिक, परिवहन अधिका-यांना देण्यात आलेला असतानासुद्धा वनविभागास इतर विभागाची वाहने किंवा कर्मचारी उपलब्ध होत नाही.

वनरक्षकाचा बळी
जुन्नुर येथे कार्यरत नागठाणे नामक वनरक्षक हे जंगलातील आग नियंत्रण करीत असताना आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. मात्र, वनविभागाकडे पुरेसे ब्लोअर मशीन नसल्याने वनरक्षकांना पाण्याच्या सहाय्याने वनांतील आग नियंत्रित करावी लागते.

Web Title: No Forest Fire Cuntrol System in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.