व्याघ्र संरक्षणाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ उत्तर प्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:47 PM2018-04-10T12:47:10+5:302018-04-10T12:47:22+5:30

महाराष्ट्रात वाघ संरक्षणाचे योग्य नियोजन बघता महाराष्ट्राचे हे मॉडेल आत्मसात करण्यासाठी उत्तरप्रदेशने महाराष्ट्राची मदत घेतली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या मॉनिटरिंगबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यशाळेतून धडे देणार आहेत.

'Maharashtra Model' of Tiger cover Uttar Pradesh | व्याघ्र संरक्षणाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ उत्तर प्रदेशात

व्याघ्र संरक्षणाचे ‘महाराष्ट्र मॉडेल’ उत्तर प्रदेशात

Next
ठळक मुद्देवरिष्ठ वनाधिकारी देणार धडेआधुनिक पद्धतीचा अभ्यास करणार

गणेश वासनिक।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाराष्ट्रात वाघ संरक्षणाचे योग्य नियोजन बघता महाराष्ट्राचे हे मॉडेल आत्मसात करण्यासाठी उत्तरप्रदेशने महाराष्ट्राची मदत घेतली आहे. महाराष्ट्रात वाघांच्या मॉनिटरिंगबाबत वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यशाळेतून धडे देणार आहेत.
राज्यात सध्या २५० च्यावर वाघ शिल्लक असून एकट्या विदर्भात ही संख्या १७५ च्या आसपास आहे. महाराष्ट्रात वाघांबाबत विदर्भ समृद्ध म्हणावा लागेल. कारण ११ जिल्ह्यांपैकी १० जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व आहे. विदर्भात वाघांचे मॉनिटरिंग त्याचे नियोजन हे खऱ्या अर्थाने योग्य पद्धतीने सुरू असल्याने वाघाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील ४२ व्याघ्र प्रकल्पांमध्ये ‘टॉप टेन’मध्ये मेळघाट व ताडोबा या व्याघ्र प्रकल्पांनी स्थान प्राप्त केले आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ताडोबा आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील नियोजनाची दखल घेतली आहे. अलीकडे मध्यप्रदेशच्या तुलनेत उत्तराखंड, उत्तरप्रदेशमध्ये वाघांची संख्या वाढत आहे. वाघांचे संवर्धन, संरक्षण आणि नियोजन हे महाराष्ट्राप्रमाणे करण्यासाठी उत्तरप्रदेशने महाराष्ट्रातील वन्यजीव विभागाला वाघांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने निमंत्रित केले आहे.
वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व काही अधिकारी उत्तरप्रदेशात गेले असून, तेथे वाघांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्यांना महाराष्ट्र पॅटर्न समजावून सांगणार आहेत.

काय आहे महाराष्ट्राचा पॅटर्न?
महाराष्ट्रात एकट्या विदर्भात वाघांची संख्या झपाट्याने वाढल्याने सध्या महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. शासनाने व्याघ्र प्रकल्पांना स्वायत्तता देत अधिकारी व वनकर्मचाऱ्यांची संख्या वाढविली. जीपीएस प्रणाली, शासकीय मोबाईल, कॉलर आयडी, कॅमेरा ट्रॅपिंग, कोड नंबर, यामुळे वाघांची संख्या अचूक टिपण्यास मदत झाली. प्रकल्पाबाहेर पडणाऱ्या वाघांचे लोकेशन जीपीएस एम ट्रॅक पद्धतीने घेतल्याने कोणता वाघ कोणत्या क्षेत्रात भ्रमंती करतोय, यासाठी संगणकाचा वापर केला जात आहे.

व्याघ्र संवर्धन फोर्स व कृत्रिम पाणवठे
सीमा सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मेळघाट, ताडोबा, पेंच या तीनही व्याघ्र प्रकल्पांत व्याघ्र संवर्धन फोर्स तैनात केले आहेत. २४ तास बंदूक खांद्यावर घेऊन हे दल संवेदनशील भागात गस्त घालून वाघांचे संरक्षण करीत आहेत. त्यामुळे शिकारीला काहीसा आळा बसला आहे. यासाठी वन विभागात स्वतंत्र कर्मचाऱ्यांची भरती केली आहे. आदिवासी क्षेत्रातील तरूणांना प्राधान्य देण्यात आले आहे. उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे तयार करून त्यावर करडी नजर ठेवली जात आहे.

‘‘दोन दिवसीय कार्यशाळेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील व्याघ्र प्रकल्पात वाघांचे संवर्धन, संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. वाघांच्या संरक्षणाचा महाराष्ट्र पॅटर्न उत्तर प्रदेशात राबविला जात असल्याचे समाधान आहे.
- सुनील लिमये, अपर प्रधान मुख्यवनसंरक्षक,
वन्यजीव विभाग महाराष्ट्र

Web Title: 'Maharashtra Model' of Tiger cover Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ