नवरा-बायकोत वाद, बापानेच केले ३ वर्षीय लेकीचे अपहरण

By प्रदीप भाकरे | Published: January 28, 2024 06:30 PM2024-01-28T18:30:45+5:302024-01-28T18:31:07+5:30

पाळणाघरातील घटना : पती, पत्नीत बेबनाव, केस न्यायालयात

Husband-wife dispute, father kidnapped 3-year-old girl | नवरा-बायकोत वाद, बापानेच केले ३ वर्षीय लेकीचे अपहरण

नवरा-बायकोत वाद, बापानेच केले ३ वर्षीय लेकीचे अपहरण

अमरावती : पाळणाघरातून तीनवर्षीय चिमुकलीचे तिच्याच वडिलांनी अपहरण केल्याची तक्रार संचालक महिलेने फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी, पोलिसांनी २६ जानेवारी रोजी उशिरा रात्री अपहृत मुलीच्या वडिलांसह अन्य एकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

फिर्यादी महिला या आठ वर्षांपासून फ्रेजरपुरा हद्दीत पाळणाघर चालवितात. तेथे अनेक पालक त्यांच्या लहानग्या पाल्यांना तेथे सकाळी ९:३० ते सायंकाळी सात या कालावधीत सांभाळण्याकरिता सोडून जातात. ज्या चिमुकलीचे अपहरण झाले, ती तीनवर्षीय मुलगीदेखील दीड वर्षापासून त्या पाळणाघरात येत होती. त्या चिमुकलीच्या आईच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे व त्यांच्या पतीचे न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराचे प्रकरण सुरू आहे. न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या मुलीला चांगले सांभाळा, तिला तिच्या वडिलांकडे देऊ नका, असे त्या चिमुकलीच्या आईने आपल्याला सांगितले होते, असे पाळणाघर चालक महिलेने जबाबात म्हटले आहे.


मुलीचे वडील अधूनमधून भेटीसाठी

मुलीचे वडील अधूनमधून पाळणाघरात मुलीला भेटण्याकरिता येत जात असत. २५ जानेवारी रोजी दुपारी २:३० च्या सुमारास मुलीचे वडील पाळणाघरात आले. त्यावेळी त्यांची मुलगी जेवण करीत होती. वडील तिला दिसताच ती त्यांच्याकडे पळत गेली. त्यांनी तिला कडेवर घेतले. माझ्याबरोबर असलेल्या नातेवाइकास मुलीस दाखवितो व परत घेऊन येतो, अशी बतावणी पित्याने पाळणाघरातील एका महिलेकडे केली. त्यावर तशी परवानगी नाही, तुम्ही आतमध्ये येऊन बोला, असे म्हणतच ते मुलीला घेऊन बाहेर गेले तथा तिला मोपेडवर बसवून निघून गेले.

कचोरी खाऊ घालतो अन् परततो
पाळणाघरात मुलांना सांभाळणाऱ्या एका महिलेने ती घटना पाहिली. त्यानंतर पाळणाघर संचालक महिलेने लगेचच चिमुकलीच्या आईला मोबाइल कॉल करून घटनेची माहिती दिली. चिमुकल्या मुलीच्या आईने आपल्या पतीस फोन कॉल लावला असता, ‘मी मुलीला कचोरी खाऊ घालतो व परत आणून सोडतो,’ असे त्याने सांगितले. मात्र, २६ जानेवारीच्या रात्रीपर्यंत त्यांनी त्या चिमुकलीला पाळणाघरात आणून सोडले नाही किंवा तिच्या आईच्या ताब्यात दिले नाही. त्यामुळे अखेर पाळणाघर संचालक महिलेने २६ ला रात्री फ्रेजरपुरा पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत गुन्हा दाखल केला.

Web Title: Husband-wife dispute, father kidnapped 3-year-old girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस