धामणगाव तालुक्यात दीडशे घरे पाण्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:07 PM2018-07-11T15:07:09+5:302018-07-11T15:08:33+5:30

१८ हजार हेक्टर शेतात पाणीच पाणी 

heavy rain in dhamangaon | धामणगाव तालुक्यात दीडशे घरे पाण्याखाली

धामणगाव तालुक्यात दीडशे घरे पाण्याखाली

Next

धामणगाव : सलग तीन दिवसांपासून तालुक्यात संततधार पावसाने कहर केला आहे. नदी-नाले ओसंडून वाहत असून, पुलाची उंची कमी असल्याने चार गावांचा संपर्क तुटला, तर दोन गावांतील दीडशे घरात बुधवारी पहाटे पाणी शिरल्याने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामुळे धान्य व जीवनाश्यक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मागील पंधरा दिवसापूर्वी पेरलेली तब्बल १८ हजार हेक्टर शेती पाण्याखाली आली आहे.

धामणगावात तिसऱ्या ही दिवशी पावसाची संततधार सुरूच आहे. मंगळवारी रात्री दक्षिण भागात सर्वाधिक पाऊस झाल्याने चंद्रभागा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे तहसीलदार अभिजीत नाईक यांनी त्या भागांचा दौरा करून नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाल्याचे पाणी इतर ठिकाणी जागा नसल्याने मलातपूर व नारंगावंडी या दोन्ही गावात शिरले आहे. मलातपूर गावातील ७० घरांतील अन्नधान्य पूर्णत: ओले झाले. पहाटे पाणी शिरल्याने जीवनाश्यक वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. हीच स्थिती नारगांवडी गावांची आहे. चंद्रभागा नदी दुथडी वाहत असल्याने नाल्याचे पाणी गावात शिरले. गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तहसीलदार नाईक यांनी दोन्ही गावात जाऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला.

पेरणीचे तिबार संकट 

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे १५ दिवसांपूर्वी पेरलेल्या अठरा हजार हेक्टर शेतात पाणी साचले. पेरलेले सोयाबीन, कपाशीचे बियाणे दडपले, तर काही शेतातील पाणी बाहेर निघत नसल्याने निघालेले अंकुर करपण्याची शक्यता आहे. यंदा प्रथम कमी तर आता अधिक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. पेरणीचे तिबार संकट घोंगावत आहे. 

लोकमत विधानभवनात 

मंगळवारी झालेल्या पावसाने आलेल्या पुरामुळे सोनेगाव खर्डा येथील ६३ विद्यार्थ्यांना शाळेतच रात्र काढावी लागली. ‘लोकमत’ने वस्तुस्थितीदर्शक वृत्त प्रकाशित केले. या बाबीची आ. वीरेंद्र जगताप यांनी दखल घेत विधानभवनात बुधवारी औचित्याचा मुद्दा मांडला. ज्या नाल्यामुळे ही पूरस्थिती निर्माण झाली, त्या कोल्हा नाल्याची उंची वाढविली असती तर ही स्थिती उद्भवली नसती.  कर्मचारी मुख्यालयात राहत नसल्याचा मुद्दाही आ. जगताप यांनी मांडून पुलाची उंची वाढवावी. पुराने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीची मागणीही त्यांनी केली आहे. 

Web Title: heavy rain in dhamangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.