विद्यापीठांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर,  विनोद तावडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 07:44 PM2017-12-27T19:44:05+5:302017-12-27T19:44:52+5:30

विकासाबाबत विदर्भाचा बॅकलॉग आहे. गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठाचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी विद्यापीठांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक उत्कृष्टता (अ‍ॅकेडेमिक एक्सलन्स) वाढविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी येथे दिली.

Focus on academic excellence of universities, Vinod Tawde | विद्यापीठांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर,  विनोद तावडे यांची माहिती

विद्यापीठांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेवर भर,  विनोद तावडे यांची माहिती

googlenewsNext

अमरावती : विकासाबाबत विदर्भाचा बॅकलॉग आहे. गोंडवाना आणि अमरावती विद्यापीठाचा विकास जलद गतीने व्हावा, यासाठी विद्यापीठांच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक उत्कृष्टता (अ‍ॅकेडेमिक एक्सलन्स) वाढविणार असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी येथे दिली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गृहविज्ञान विभागातील कम्युनिटी स्टुडीओमध्ये व्हर्च्युल सी-फोर (व्हर्च्युल-कॅम्पस टू कॉलेज अ‍ॅण्ड कम्युनिटी सेंटर) व विद्यापीठ संकेतस्थळाचे लोकार्पणाप्रसंगी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. 
 यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, आ. अनिल बोंडे, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव अजय देशमुख, उच्चशिक्षण सहसंचालक अर्चना नेरकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी उपस्थित होते.
    ना. तावडे पुढे म्हणाले, विदर्भाचा विकास झपाट्याने झाला पाहिजे, यासाठी केंद्र व राज्य शासन प्रयत्नशील आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विद्यापीठात बाबासाहेबांच्या विचारधारेवर आधारित अभ्यासक्रम सुरू झाला आहे. अमरावती विद्यापीठाचा विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वेगळे आर्थिक पॅकेज देण्याबाबत शासन विचाराधीन आहे. रुसाच्या माध्यमातून विद्यापीठांना निधी मिळत आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयांचे अ‍ॅकेडेमिक एक्सलन्स कसे वाढेल, यासाठी शैक्षणिक विकासात्मक बाबी पूर्ण केल्या आहेत. व्हर्च्युल सेंटरचा उपक्रम विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरेल. विद्यार्थी आणि महाविद्यालयांशी या माध्यमातून संपर्क साधता येईल. शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन व ज्ञानाचा लाभ मिळू शकेल, असे सांगून ना. तावडे यांनी वेबसाईटद्वारे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. प्रश्न जाणून घेताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सर्मपक उत्तरे देऊन समाधान केले.
    अध्यक्षीय भाषण करताना कुलगुरू मुरलीधर चांदेकर म्हणाले, क्लासरुमबाहेरचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याची गरज आहे. आठवडा, पंधरा दिवसांतून वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक विषयांवर, नवीन टेक्नॉलॉजी, देश-विदेशात होणारे विविध संशोधन व त्यांची माहिती विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज आहे. या सेंटरच्या माध्यमातून तज्ज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाचा लाभ शहरी आणि विशेषत: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होईल, असे कुलगुरुंनी सांगितले.
प्रारंभी शिक्षण महर्षी डॉ. भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त आणि संत गाडगे बाबांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पार्पण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.  शाल, श्रीफळ व गाडगे बाबांचे पुस्तक देऊन कुलगुरुंनी ना.विनोद तावडे यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला. संगणक विभागप्रमुख दिनेश जोशी यांनी वेबसाईटची माहिती दिली.
ना. तावडे यांनी रिमोटद्वारे वेबसाईटचे उद्घाटन केले.  कार्यक्रमाचे संचालन कुलसचिव अजय देशमुख यांनी तर आभार वैशाली धनविजय यांनी मानले. यावेळी महापालिका स्थायी समितीचे सभापती तुषार भारतीय, माजी प्र-कुलगुरू जयकिरण तिडके, दिलीप इंगोले, आनंद मापूसकर, गोविंद येतएकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जे.डी. वडते आदी उपस्थित होते.

Web Title: Focus on academic excellence of universities, Vinod Tawde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.