अमरावती, दि. 14 - इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत येणा-या महाविद्यालयांत प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी २९ सप्टेंबर २०१७ पर्यंत प्रवेश घेता येईल, याबाबतची अधिसूचना गुरूवारी निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहणा-या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अभियांत्रिकी, फार्मसी व वैद्यकीय महाविद्यालये वगळता अन्य अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. यापूर्वी ७ सप्टेंबरपर्यंत महाविद्यालयात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती. परंतु इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल उशिरा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे महाविद्यालयात प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख ७ सप्टेंबर ही होती. इयत्ता १२ वी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होऊनही महाविद्यालयात प्रथमवर्ष अभ्यासक्रमात प्रवेश मिळत नसल्याच्या तक्रारी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे विद्यार्थ्यांनी सादर केल्या होत्या. त्यामुळे हा विषय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी निगडित असल्याने महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभागाने प्रथमवर्ष अभ्यासक्रम प्रवेशासाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. यात कला, वाणिज्य, विज्ञान, समाजविज्ञान आदी शाखांमधील अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येईल. नव्या निर्णयामुळे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अकोला, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील सुमारे ३७५ महाविद्यालयांमध्ये प्रथमवर्ष अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

‘‘यापूर्वी प्रथमवर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख ७ सप्टेंबर होती. मात्र, इयत्ता १२ वीचा निकाल उशिरा लागल्याने विद्यार्थी प्रथमवर्ष अभ्यासक्रमापासून वंचित राहू नये, यासाठी प्रवेशास मुदतवाढ देण्यात आली आहे.
- ए.डी.चव्हाण,
उपकुलसचिव, महाविद्यालय व विद्यापीठ विकास विभाग.

प्रवेशासंदर्भात प्राचार्यांना पत्र...
प्रथमवर्ष अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना २९ सप्टेंबरपर्यंत प्रवेश द्यावा, याबाबतचे पत्र विद्यापीठ प्रशासनाकडून प्राचार्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता १२ वीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आल्यास ते बिनशर्त स्वीकारावे, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.