डीबीचा शॉक, १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 01:30 AM2019-06-26T01:30:00+5:302019-06-26T01:30:29+5:30

वायरमन निलंबित दोन अभियंत्यांना शोकॉज लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : डीबीजवळील तारेतील विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन १६ वर्षीय मुलाचा ...

DB shock, the death of a 16-year-old boy | डीबीचा शॉक, १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

डीबीचा शॉक, १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमुख्य अभियंत्याला दोन तास घेराव : विद्युत भवनात नातेवाईकांसह नागरिकांचा ठिय्या

वायरमन निलंबित
दोन अभियंत्यांना शोकॉज

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डीबीजवळील तारेतील विद्युत प्रवाहाचा स्पर्श होऊन १६ वर्षीय मुलाचा सोमवारी सायंकाळी करुण अंत झाला. आदित्य मनोहर तळकित (रा. प्रेरणानगर, गाडगेनगर) असे मृताचे नाव आहे. आदित्यच्या मृत्यूनंतर नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करीत, विद्युत भवनात मुख्य अभियंत्यांना दोन तास घेराव घातल्याने प्रचंड खळबळ उडाली. या घटनेच्या अनुषंगाने महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी जनमित्र सुरेश किटकुले यांना तडकाफडकी निलंबित केले, तर सहायक अभियंता दीपक बोंडे व प्रभारी सहायक अभियंता प्रफुल्ल देशमुख यांना शो-कॉज बजावली.
आदित्य हा सायंकाळी ५.३० वाजता मित्रांसोबत परिसरातील उद्यानात क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. सायंकाळी ७.१५ पर्यंत क्रिकेट खेळत असताना, उद्यानातील डीबीजवळील पोलचा ताण सहन करणाºया तारेला आदित्यचा स्पर्श झाला आणि त्याला विद्युत प्रवाहाचा तीव्र झटका बसला. तो तारेला चिकटल्याचे पाहून त्याच्या मित्रांनी धाव घेतली. त्याला तारेपासून दूर करण्यासाठी प्रयत्न केले. लाकडी बॅटच्या साहाय्याने एका मित्राने आदित्यला दूर केले. त्यानंतर या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली. आदित्यला तात्काळ पीडीएमसी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले गेले. येथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेच्या माहितीवरून गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. मृताच्या नातेवाइकांची विचारपूस करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
पे्ररणानगरातील डीबीतील खुल्या वायरिंगबद्दल परिसरातील नागरिकांनी अनेकदा महावितरणाकडे तक्रारी दिल्या होत्या. मात्र, त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आदित्याला जीव गेला. विद्युत महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याने नातेवाइकांचा रोष उफाळून आला.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस पोहोचले विद्युत भवनात
मृताच्या नातेवाइकांचा व नागरिकांचा रोष पाहता, गाडगेनगर ठाण्यातील पोलिसांचा ताफा विद्युत भवनात पोहोचला. दोन महिला पोलिसांसह अन्य पोलिसांनी महावितरण अधिकाºयांना सुरक्षा दिली. पोलीस निरीक्षक मनीष ठाकरेसुध्दा विद्युत भवनात पोहोचले होते.
मुख्य अभियंत्यांचे डोळे पाणावले
मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या कक्षात आदित्यच्या मावशीने त्यांच्याशी संवाद साधत, आदित्यच्या आई-वडिलांनी कसे परिश्रम घेतले, याबद्दल सांगितले. त्याची आई तुमच्यासारख्या अधिकाºयांच्या घरी जाऊन पोळ्या करते. मुलांना तुमच्यासारखे बनविण्यासाठी प्रयत्न करते. वडील मोलमजुरी करून मुलांचा सांभाळ करतात. मात्र, तुमचे अधिकारी मोठे वेतन घेऊनही काम करीत नाही, असे म्हटल्यावर मुख्य अभियंता गुजर यांचे डोळे पाणावले.
गाडगेनगर पोलिसांत तक्रार
महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे आदित्यचा मृत्यू झाला. त्यामुळे दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी तक्रार आदित्यच्या नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी गाडगेनगर पोलिसांत केली. पोलिसांनी या प्रकरणात सद्यस्थितीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला जाणार आहे.

या घटनेच्या अनुषंगाने मृताच्या कुटुंबीयांना प्रथम २० हजारांची, तर निरीक्षण अहवालानंतर चार लाखांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय कुटुंबातील एका सदस्याला सुरक्षा रक्षकाच्या नोकरीत सामावून घेतले जाईल. यासंदर्भात त्यांना लेखी आश्वासन दिले आहे.
- सुचित्रा गुजर, मुख्य अभियंता

नातेवाइकांच्या तक्रारीवरून सद्यस्थितीत मर्ग दाखल केला आहे. वीज निरीक्षकांचा अहवाल प्राप्त झाल्यावर कुणी हलगर्जीपणा केला व कोण दोषी आहे, हे समजेल. त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल.
- मनीष ठाकरे
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे
यापूर्वी दोन जण बचावले
गेल्या अनेक दिवसांपासून प्रेरणानगरातील या उद्यानामधील डीबी खुली आहे. यामुळे उद्यानात खेळण्यासाठी येणाऱ्या चिमुकल्यांचा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. त्यातच सात ते आठ दिवसांपूर्वी दोन लहान मुलांनाच विद्युत प्रवाहाचा झटका बसल्याचे नागरिक सांगत आहेत. ती दोन्ही मुले थोडक्यात बचावली, अन्यथा यापूर्वीच मोठा अनर्थ झाला असता.
भावाला नोकरी कुटुंबीयांना चार लाखांची मदत
मृत आदित्यचे नातेवाईक व नागरिकांनी मुख्य अभियंत्यांच्या कक्षात ठिय्या मांडून दोषी अधिकाºयावर कारवाई, कुटुंबीयांना आर्थिक मदत व एका सदस्याला नोकरीची मागणी केली. त्यानुसार मुख्य अभियंत्यांनी कारवाई तसेच आदित्यच्या कुटुंबीयांना सानुग्रह मदत म्हणून प्रथम २० हजार रुपये दिले. निरीक्षण अहवालानंतर चार लाखांची मदत व आदित्यच्या मोठ्या भावाला नोकरीत सामावून घेण्याचे लेखी आश्वासन दिले.

Web Title: DB shock, the death of a 16-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.