‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी  

By प्रदीप भाकरे | Published: March 16, 2024 06:37 PM2024-03-16T18:37:53+5:302024-03-16T18:40:46+5:30

‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशा फलकबाजीने शहरातील राजकीय वातावरण कमालिचे तापले आहे.

bannered by unknown person in amravati | ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी  

‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही', अज्ञातांकडून बॅनरबाजी  

अमरावती: ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशा फलकबाजीने शहरातील राजकीय वातावरण कमालिचे तापले आहे. राणांच्या पीएंच्या तक्रारीवरून त्याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी एका मुद्रकासह काही अज्ञातांविरूध्द बदनामी व मालमत्ता विरूपणाचा गुन्हा दाखल केला. तेवढ्याच तत्परतेने राजापेठ व सिटी कोतवाली पोलिसांनी ते फलक काढून नेले. पोलिसांनी संपुर्ण रात्रभर त्या फलकांची सर्चिग चालविली होती.

शुक्रवारी रात्री ९ ते ९.३० च्या पुढे राजापेठ उड्डाणपुलासह राजकमल, जयस्तंभ व इर्विन चौकात ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ अशी फलके लागल्याचे पाहावयास मिळाले. ती बाब खुपियामार्फत माहिती पडताच कोतवाली, राजापेठ पोलिसांनी तातडीने तिकडे धाव घेत कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, बिघडण्यास कारण मिळू नये, यासाठी ते फलक काढले. कोतवालीचे ठाणेदार मनोहर कोटनाके, राजापेठचे ठाणेदार महेंद्र आंबोरे यांनी तत्काळ फलकस्थळ गाठले. त्याचबरोबर अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील तशी फलके लागली असेल, तर काढण्याचे आदेश देण्यात आले. 

त्यायोगे, संपुर्ण शहरात सर्चिंग करण्यात आले. खासदार नवनीत राणा या पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्या यावेळची निवडणूक कमळावर लढतील, असे स्पष्ट संकेत आहेत. ते ठरविण्यासाठी शनिवारी सायंकाळी युवा स्वाभिमानींचा मेळावा देखील आयोजित होता. त्याआधीच काही अज्ञात लोकांनी ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही‘, ‘मी अमरावतीकर’ अशी पोस्टरबाजी करत नवनीत राणांची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. खासदार राणा भाजपकडून निवडणूक लढणार, अशी माहिती शनिवारी दुपारी अमरावती लोकसभा मतदारसंघात पसरली. त्यानंतर सायंकाळी राणांविरोधात ही पोस्टरबाजी करण्यात आली.
 
असा आहे संदर्भ
पाच वर्षांपुर्वी नवनीत राणा राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावरुन निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. अलिकडे तर त्यांच्या बॅनर पोस्टरवर देखील मोदी शहांच्या छबी झळकत आहेत. शिवाय, यंदाची लोकसभा निवडणूक त्या भाजपकडून लढवतील, असे चित्र दृष्टीस पडते आहे. मात्र,स्थानिक भाजपमधील अनेक बड्या नेत्यांचा राणांना विरोध आहे. भाजपसोबत असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्याशी असलेले राणांचे विळ्या भोपळ्याचे सख्य अमरावती जिल्ह्यात सर्वश्रूत आहे. त्या अनुषंगाने ‘मोदीजी आपसे बैर नही, राणा तेरी खैर नही!’ असे फलक लावण्यात आले असावेत, अशी राजकीय चर्चा शहरात रंगली आहे.

Web Title: bannered by unknown person in amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.