अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 12:16 PM2023-11-17T12:16:37+5:302023-11-17T12:17:39+5:30

अमरावती-हिंगणघाट राज्य महामार्गावर पाचशे क्वार्टर्सजवळ घडला अपघात

A female leopard was killed in a collision with an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट जागीच ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट जागीच ठार

पोहरा बंदी (अमरावती) : वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बीट परिसराजवळ लागून असलेल्या अमरावती-हिंगणघाट राज्य महामार्ग क्रमांक २४३ वर सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाचा मादी बिबट्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली.

अमरावती शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वडाळी वनपरिक्षेत्र अंतर्गत वडाळी वर्तुळातील उत्तर वडाळी बीटच्या वनक्षेत्रातून रस्ता ओलांडताना मादी बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. घटनेची माहिती मिळताच वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे, वडाळी वर्तुळ अधिकारी श्याम देशमुख, वनरक्षक सुनील टिकले, चंद्रकांत चोले, कैलास इंगळे, वनमजूर ओंकार भुरे, वाहनचालक संदीप चौधरी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याची पाहणी केली व पंचनामा नोंदविला.

जबर धडक बसल्याने मादी बिबट्या मार्गाच्या एका कडेला कोसळला होता. वाहनाच्या धडकेने बिबट्याच्या तोंडातून रक्त पडत असल्याचे निदर्शनात आले. मात्र, बाह्यांगावर कोणतीही जखम नव्हती. बिबट्याला वनविभागाच्या वाहनाने बांबू गार्डन येथील प्राणी संग्रहालयात आणण्यात आले. पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. जे. मोहोड, डॉ. सागर ठोसर यांनी तपासणी करून शवविच्छेदन केले. यावेळी वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.

बांबू गार्डन परिसरात भडाग्नी

बिबट्या हा अनुसूची-१चा प्राणी असल्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत प्रथमश्रेणी अधिकारी उपवनसंरक्षक अग्रिम सैनी, सहायक वनसंरक्षक ज्योती पवार, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी वर्षा हरणे यांच्या उपस्थितीत भडाग्नी देण्यात आली.

Web Title: A female leopard was killed in a collision with an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.