विद्यार्थ्यांंनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 02:03 AM2017-11-14T02:03:35+5:302017-11-14T02:04:00+5:30

लोकमतच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधत सोमवारी महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला.  ‘लोकमत’ ने या चिमुकल्यांना  पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली.

Students Experience The World of Journalism | विद्यार्थ्यांंनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व

विद्यार्थ्यांंनी अनुभवले पत्रकारितेचे विश्‍व

Next
ठळक मुद्देमान्यवरांशी साधला संवाद लाइव्ह रिपोर्टिंगचाही घेतला अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: लोकमतच्या वतीने बालदिनाचे औचित्य साधत सोमवारी महाराष्ट्रातील भावी महापत्रकार असा उपक्रम राबविण्यात आला.  ‘लोकमत’ ने या चिमुकल्यांना  पत्रकारिता क्षेत्र अनुभवण्याची संधी दिली. पत्रकारिता क्षेत्रातील काम कसे चालते, बातम्या कशा मिळविल्या जातात, मुलाखती कशा घेतात, अशा काही गोष्टींचा उलगडा विद्यार्थ्यांंना झाला. 
 एक दिवस प्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेण्यास इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांंची नावे पाठविण्याचे आवाहन अकोल्यातील शाळांना करण्यात आले होते. त्यानुसार अकरा विद्यार्थी सकाळी अकरा वाजता ‘लोकमत’ मध्ये उपस्थित झाले. लोकमतचे निवासी संपादक रवी टाले यांनी सर्वांंचे स्वागत करून लोकमत संदर्भात प्राथमिक माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांंनी एकमेकांचा परिचय करून घेतला. प्रत्येकाला कोणत्या क्षेत्राची आवड आहे, पत्रकार म्हणून कुणाला भेटायला आवडेल, तुम्हाला कोणते प्रश्न पडतात, अशी चर्चा संपादकीय सहकार्‍यांसोबत करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांंमधून बाल शिवाजी शाळेची मानसी  राऊत हिला अतिथी संपादकाची जबाबदारी देण्यात आली. अतिथी संपादक मानसी अरूण राऊत हिने सर्व संपादकीय सहकार्‍याची बैठक घेत सर्व सहकार्‍यांना ‘लोकमतचे ओळखपत्र’ दिले व प्रत्यक्ष फिल्डवर पाठविण्यात आले. भारत विद्यालयाची सनिका अनिल चतुरकर व बाल शिवाजीचा यश उज्ज्वल खुमकर यांनी महापौर विजय अग्रवाल यांच्यासोबत संवाद साधून त्यांना अनेक प्रश्नांवर भंडावून सोडले. सन्मित्र पब्लिक स्कूलची अपूर्वा शिवाजी ढगे, परशुराम नाईक विद्यालय बोरगाव मंजूचा विद्यार्थी अनिकेत राऊत या दोघांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांची भेट घेऊन चर्चा केली. तेथून बाहेर पडत असतानाच एक अपघात झाल्याची माहिती मिळताच या दोघांनी संपादकीय सहकार्‍यासोबत अपघात स्थळी धाव घेऊन तेथील रिपोर्टिंंगचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 
जागृती विद्यालयाचा यश मानकर याने जिल्हा क्रीडा अधिकारी यांची भेट घेऊन माहिती जाणून घेतली. स्वामी विवेकानंद स्कूलची गौरी धनराज कांगटे, जिजाऊ कन्या शाळेची स्नेहा रमेश मेटकरी व दुर्गा संजय भोजने यांनी महिला बालकल्याण अधिकारी योगेश जवादे यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. तर अतिथी संपादक मानसी राऊत, जय संजय झापे यांनी लोकमत कार्यालयात ‘दप्तरांचे ओझे कधी संपणार?’ या विषयावर परिचर्चा घेतली. तर प्रभात किड्सची सानिका जुमळे व डॉ. हेडगेवार माध्यमिक शाळेचा ऋषिकेश इंगळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात फेरफटका मारून तेथील कामाचा अनुभव घेतला. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा लोकशाही दरबार सुरू होता. त्या कामाची माहिती घेतली. असा सर्व अनुभव घेत या विद्यार्थ्यांंनी लोकमत कार्यालयात येऊन त्यांचे अनुभव सर्वांंसोबत शेअर केले. आपल्याच शब्दात या अनुभवांना शब्दबद्ध करून लोकमतमधील संपादकीय सहकार्‍यांना त्याची प्रत दिली. संपूर्ण दिवसभर पत्रकारितेच्या प्रत्यक्ष कामकाजामध्ये सहभाग घेत या विद्यार्थ्यांंनी घेतलेला अनुभव हा त्यांच्यासाठी रोमांचकारी ठरल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांंनी दिल्या. शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी ‘लोकमत’ राबविलेल्या या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांंंना प्रत्यक्ष अनुभवाचे दालन खुले करून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
 

Web Title: Students Experience The World of Journalism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.