रेती माफियांनी धरण पोखरले, प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 06:52 PM2018-11-16T18:52:16+5:302018-11-16T18:52:20+5:30

आकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख परिसरात शहापूर बृहत प्रकल्पांतर्गत धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे.

Sand Mafia dam collapses, threatens the safety of the project | रेती माफियांनी धरण पोखरले, प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात

रेती माफियांनी धरण पोखरले, प्रकल्पाची सुरक्षितता धोक्यात

Next

- विजय शिंदे
आकोट : आकोट तालुक्यातील पणज वडाळी देशमुख परिसरात शहापूर बृहत प्रकल्पांतर्गत धरणाचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणाच्या पात्रात अवैधरित्या उत्खनन करणार्‍या रेती माफीयांनी चक्क धरणपात्र पोखरल्याचे आढळून आले आहे. धरणाच्या भिंतीपर्यंत रेतीमाफियांनी सुरुंग केले आहेत. सदर सुरुंगांची लांबी-रुंदी पाहता देशाच्या सीमेवर आढळून येणार्‍या सुरुंगापेक्षाही धोकादायक परिस्थिती धरण पात्रात पाहावयास मिळत आहे. या प्रकारामुळे धरण परिसराला धोका निर्माण झाला असून, रेती माफियांचे कृत्य भविष्यात दुर्दैवी घटनेला निमंत्रण देणारे ठरत आहे.

आकोट तालुक्यातील पणज या गावाजवळून वाहणार्‍या पठार नदीवर लघु पाटबंधारे योजनेंतर्गत शहापूर बृहत या धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाकरिता शासनाने 261 कोटी रुपये खर्चून धरणाची निर्मिती केली आहे. या धरणाची लांबी 55.10 मीटर व उंची 17.23 मीटर असून, धरणाची एकूण साठवणूक क्षमता 2.790 द.ल.घ.मी. आहे. पिण्याच्या पाण्याकरिता, सिंचन व औद्योगिक वापराकरिता आरक्षित करण्यात आले आहे. सदर धरणात पाणीसाठा न झाल्याने व गाळ असल्याने रेती माफियांनी धरण पात्रात अक्षरश: 20 ते 30 फूट खोल असे सुरुंग तयार करून रेतीचा उपसा केला आहे. या सुरुंगामधून रेती बाहेर काढून त्या ठिकाणी गाळून त्याची अवैधरीत्या वाहतूक करण्यात येत आहे. या सुरुंगाला रेती माफियांनी विशिष्ट आकार दिले आहेत. तसेच आतमधून रेती काढण्याकरिता पायर्‍या सुद्धा केल्या आहेत.

जमिनीच्या आतमध्ये तसेच धरणाच्या भिंतीपर्यंत हे सुरुंग खोदलेले आहेत. रेती माफिया हे रात्रीच्या वेळी हा सर्व प्रकार करीत आहेत. महसूल विभाग या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्याही नजरेस पडणार अशी स्थिती या रेती माफियांनी करून ठेवली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर रात्री काळोखात बुडाल्यानंतर या ठिकाणी रेतीचा उपसा करण्यात येतो. यादरम्यान कारवाई करण्याकरिता जाणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांच्याही जिवाला धोका निर्माण होऊ शकेल अशा प्रकारचे सुरुंग या ठिकाणी तयार करण्यात आले आहेत. रेती माफियांनी चक्क धरणाचे पात्र व धरणाच्या आजूबाजूचा परिसर सुरुंग करुन मोठमोठे खड्डे निर्माण केले आहे. या सुरुंगमध्ये रेती काढण्याकरिता जाणार्‍या मजूरांसोबत दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातून रात्रीच्या वेळी रेतीची चोरी करणार्‍या माफीयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

रेती चोरट्यांनी धरण परिसरात केलेल्या सुरूंगाबाबतची तसेच रेती चोरीच्या प्रकाराबाबतची माहिती एस.डी.ओ. तथा जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आली आहे.
- अविनाश कुंभार
सहाय्यक अभियंता श्रेणी 2
अकोला पाटबंधारे विभाग
------------------
धरण परिसरातील सुरक्षिततेची जबाबदारी लघु पाटबंधारे विभागाची आहेत. त्यांच्या स्तरावर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसुल विभागाने यापूर्वी दंडात्मक व फौजदारी कारवाया केल्या आहेत. सुरुंगाची परिस्थिती पाहिल्यानंतर रेती माफीयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
- विश्वनाथ घुगे
तहसीलदार, आकोट
-----------------
धरण परिसरातील पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात सुरुंग आढळून आले आहेत. हा प्रकार मानवी जीवाशी खेळणार आहे. याबाबत रितसर तक्रार आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.
- मिलिंद बहाकर
पोलीस निरीक्षक,

Web Title: Sand Mafia dam collapses, threatens the safety of the project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.