पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:33 PM2019-04-08T12:33:43+5:302019-04-08T12:39:58+5:30

महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Rapid evaporation of water; Citizens have to use water | पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा!

पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन ; अकोलेकरांनो, पाणी जपूनच वापरा!

googlenewsNext
ठळक मुद्देपाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.अकोलेकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.अकोलेकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.

अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पिवळ्या रंगाच्या पाण्यावर प्रक्रिया करण्याचे काम वेगात सुरू असले तरी आणखी एक-दोन दिवस अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. महानच्या धरणात पुरेसा जलसाठा उपलब्ध असला तरी उन्हाची तीव्रता लक्षात घेता पाण्याचे झपाट्याने बाष्पीभवन होत आहे. ही बाब लक्षात घेता अकोलकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील धरणात आज रोजी १८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मार्च महिन्याच्या पूर्वार्धापासून उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्याचा परिणाम धरणातील जलसाठ्यावर होत असून, मागील वीस दिवसांच्या कालावधीत जलसाठ्यामध्ये झपाट्याने घसरण झाली आहे. बाष्पीभवनामुळे जलसाठ्यात होणारी घसरण चिंतेचा विषय आहे. यादरम्यान, जलप्रदाय विभागाने धरणातील पाचवा व्हॉल्व्ह उघडल्यामुळे अकोलेकरांना पिवळ्या रंगाचा पाणी पुरवठा होत आहे. त्यावर जलशुद्धीकरण केंद्रावर उपाययोजना केली जात असली, तरी त्यामुळे पाणी पुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अकोलेकरांना जूनपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. असे असले तरी उन्हाची तीव्रता, पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पाण्याची नासाडी तसेच ऐनवेळेवर जलवाहिनी फुटण्याची शक्यता पाहता अकोलेकरांनी पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.

नळाचे पाणी केवळ पिण्यासाठीच!
उन्हाळ्यात पाण्याच्या मागणीत वाढ होते. रणरणत्या उन्हात पाणी न मिळाल्यास नागरिकांमध्ये रोष निर्माण होतो. हा विचार करून प्रशासनाकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन केले जात आहे. अशावेळी नागरिकांनी नळाचे पाणी केवळ पिण्यासाठी वापरणे अपेक्षित आहे. इतर अन्य कामांसाठी विहीर किंवा बोअरवेलच्या पाण्याचा मर्यादित वापर करण्याची गरज आहे. यासाठी नागरिकांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा वर्तविली जात आहे.

नगरसेवकांची सोशल मीडियाद्वारे जनजागृती
जलशुद्धीकरण केंद्रावर होणारा तांत्रिक बिघाड, पाण्याच्या वितरण प्रणालीत ऐनवेळेवर होणारे बदल लक्षात घेता नागरिकांनी पाण्याची नासाडी न करता मर्यादित वापर करण्याचे आवाहन करण्यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. सोशल मीडियाद्वारे प्रभागातील नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन केले जात असून, या आवाहनाला नागरिक कितपत प्रतिसाद देतात, हे दिसून येणार आहे.

सार्वजनिक नळावर पाण्याचा अपव्यय
घरी पाण्याची साठवणूक केल्यानंतर नागरिक वाहने व कपडे धुण्यासाठी पाण्याचा बेसुमार वापर करतात. पाण्याची नासाडी थांबविण्यासाठी नागरिकांनी स्वत:च जागरूक होणे अपेक्षित आहे. मनपाने सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या नळावर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. पोळा चौकात मनपाच्या मुख्य जलवाहिनीवर सार्वजनिक नळ बसविण्यात आल्यामुळे या ठिकाणी दिवसभर पाण्याचा अपव्यय होत असल्याचे दिसून येते.


नळाला मोटर लावून पाण्याचा अनावश्यक उपसा करणे, रस्यावर पाणी शिंपडणे, वाहने धुण्यासाठी पाण्याची नासाडी करायची का, यावर सुज्ञ अकोलेकरांनी आत्मचिंतन करावे, पाणी पुरवठा सुरळीत क रण्याचे प्रयत्न होत आहेत.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

Web Title: Rapid evaporation of water; Citizens have to use water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.