Lok Sabha Election 2019: The formation of BJP's War Room for Lok Sabha elections | Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ‘वॉर रूम’चे गठन
Lok Sabha Election 2019: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ‘वॉर रूम’चे गठन

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या संपकर् ात राहणे, त्यांच्यासोबत संवाद साधून मतदारांपर्यंत माहितीचे आदान-प्रदान करण्यासाठी भाजपच्यावतीने शहरात ‘वॉर रूम’चे गठन करण्यात आले आहे. या कामासाठी बाहेरगावच्या २५ जणांची चमू तैनात करण्यात आली असून, यामध्ये आयटी तज्ज्ञ व अभियंत्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाची चमू सक्रिय झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात पक्षाची तटबंदी मजबूत करण्यासोबतच आता कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करून पक्षाचा संदेश पोहोचविण्यासाठी ‘वॉर रूम’चे गठन करण्यात आल्याची माहिती आहे. यामध्ये पक्षाकडून प्राप्त संदेश कार्यकर्ते, बुथ प्रमुख, शक्ती केंद्रप्रमुखांपर्यंत पोहोचवून त्याची अंमलबजावणी करण्याची कसरत या माध्यमातून करावी लागणार आहे. पक्षाचे दिल्ली दरबारातील वरिष्ठ नेते तसेच राज्य पातळीवरील नेत्यांची भाषणे, आयोजित बैठका तसेच जाहीर सभांची इत्थंभूत माहिती ठेवण्याचे काम या ‘वॉर रूम’च्या माध्यमातून केले जाणार आहे. पक्षाची अचूक भूमिका मतदारांपर्यंत पोहोचवून सोशल मीडियाच्या माध्यमातून मतदारांशी अप्रत्यक्षरीत्या संवाद साधण्याचे काम या चमूमार्फत केले जाईल. या कामासाठी पक्षाच्यावतीने आयटी तज्ज्ञ व अभियंत्यांची चमू कार्यान्वित करण्यात आली आहे.

दिल्ली, मुंबईसोबत संपर्क
लोकसभा निवडणुकीच्या नियोजनासाठी भाजपच्यावतीने दिल्ली, मुंबईत ‘वॉर रूम’चे गठन करण्यात आले आहे. राज्यभरातील वॉर रूम दिल्ली व मुंबईतील वॉर रूमच्या संपर्कात राहून कामकाज करणार असल्याची माहिती आहे. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन कामकाज केले जाणार आहे.

अहोरात्र कामकाज
पक्षाचे काम प्रभावीपणे करून मतदारांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्यासाठी ‘वॉर रूम’चे कामकाज चोवीस तास सुरू राहणार आहे. २५ जणांच्या चमूला स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली आहे. या चमूकडे जिल्ह्यातील सात लाख मतदारांचा ‘डेटा’ तयार असल्याची माहिती आहे.

शिवसेनेसोबत समन्वय
राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबत या रूमच्या माध्यमातून समन्वय राखला जाणार आहे. दोन्ही पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्याची जबाबदारी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे सोपविण्यात आली आहे. युतीच्या माध्यमातून दोन्ही पक्षांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांना वेळोवेळी दिशानिर्देश दिले जाणार आहेत.

 


Web Title: Lok Sabha Election 2019: The formation of BJP's War Room for Lok Sabha elections
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.