तोकड्या मनुष्यबळावर ‘जीएमसी’चे व्यवस्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 03:07 PM2019-06-04T15:07:58+5:302019-06-04T15:10:23+5:30

रुग्णांची संख्या वाढली असून, त्या तुलनेत रिक्त पदे व नवीन पद निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी तोकड्या मनुष्यबळावर ‘जीएमसी’मध्ये रोजचे व्यवस्थापन करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे.

Insufficient Manpower in Akola GMC | तोकड्या मनुष्यबळावर ‘जीएमसी’चे व्यवस्थापन

तोकड्या मनुष्यबळावर ‘जीएमसी’चे व्यवस्थापन

Next
ठळक मुद्देसर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात महिन्याला सरासरी ३५ हजारांपेक्षा रुग्णांवर उपचार केले जातात. आवश्यक मनुष्यबळ म्हणून ७७३ पदे मंजूर असून, त्यापैकी केवळ ६०० पदे भरण्यात आली आहेत. ही मंजूर पदे १२ वर्षांपूर्वीची असून, त्यावेळी रुग्णालयाची क्षमता केवळ ४७६ खाटांची होती.

- प्रवीण खेते
अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता मिळून जवळपास १७ वर्षे झाली, तर सर्वोपचार रुग्णालयाचे हस्तांतरण होऊनही १२ वर्षांचा कालावधी उलटला. या कालावधीत विद्यार्थी क्षमता व रुग्णांची संख्या वाढली असून, त्या तुलनेत रिक्त पदे व नवीन पद निर्मिती करण्यात आली नाही. परिणामी तोकड्या मनुष्यबळावर ‘जीएमसी’मध्ये रोजचे व्यवस्थापन करताना प्रशासनाच्या नाकी नऊ येत आहे.
७५० खाटांची क्षमता असलेल्या सर्वोपचार रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात महिन्याला सरासरी ३५ हजारांपेक्षा रुग्णांवर उपचार केले जातात. या व्यतिरिक्त शेकडो रुग्ण येथे उपचारासाठी भरती असतात. या ठिकाणी रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळ म्हणून ७७३ पदे मंजूर असून, त्यापैकी केवळ ६०० पदे भरण्यात आली आहेत. विशेष म्हणजे ही मंजूर पदे १२ वर्षांपूर्वीची असून, त्यावेळी रुग्णालयाची क्षमता केवळ ४७६ खाटांची होती. हीच परिस्थिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची असून, महाविद्यालयाला मान्यता मिळाली त्या वेळी येथील प्रवेश क्षमता केवळ शंभर होती. त्यानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी १,२०० पदांची मंजुरी मिळाली होती. त्यापैकी केवळ ९५० पदे भरण्यात आली. बदलत्या परिस्थितीनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच सर्वोपचार रुग्णालयात आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढविण्यात आले नाही. परिणामी रुग्ण संख्या व विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढत गेली; मात्र मनुष्यबळ आहे तेवढेच असल्याने कामाचा व्याप वाढला. त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. या संदर्भात महाविद्यालय प्रशासनातर्फे शासनाकडे वाढीव पदांची मागणी करण्यात आली; मात्र शासनाची त्याकडे डोळेझाक होत असल्याने परिस्थिती गंभीर होत आहे.

या समस्या उद््भवल्या

  1. अस्वच्छता
  2. रक्ताचे नमुने उघड्यावर
  3. प्रयोगशाळा व्यवस्थापन कोलमडले
  4. वेळेवर एक्सरे, एमआरआय होत नाही
  5. कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सेवा द्यावी लागत आहे



३,५५५ पदांची मागणी
अधिष्ठाता यांनी २०१६ मध्ये शासनाकडे महाविद्यालय व रुग्णालय असे दोन्ही मिळून ३,५५५ पदांची मागणी केली होती. यामध्ये रुग्णालयासाठी २४००, तर महाविद्यालयासाठी १,१५५ पदांचा समावेश आहे; परंतु शासनातर्फे याची दखल घेण्यात आली नाही.

 

Web Title: Insufficient Manpower in Akola GMC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.