३ वर्षांपासून पडून असलेल्या शिधापत्रिकांची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 01:44 AM2017-11-07T01:44:44+5:302017-11-07T01:45:18+5:30

अकोला : शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने लाभार्थींच्या नावे तयार केलेल्या शेकडो शिधापत्रिका गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयातच पडून असल्याचा प्रकार उघड होत आहे. त्या शिधापत्रिकांचे वाटप संबंधित लाभार्थींना झालेच नाही.

Inquiry of the ration card for three years | ३ वर्षांपासून पडून असलेल्या शिधापत्रिकांची चौकशी

३ वर्षांपासून पडून असलेल्या शिधापत्रिकांची चौकशी

Next
ठळक मुद्देअहवाल दोन दिवसांत वरिष्ठांकडे होणार सादर

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयाने लाभार्थींच्या नावे तयार केलेल्या शेकडो शिधापत्रिका गेल्या तीन वर्षांपासून कार्यालयातच पडून असल्याचा प्रकार उघड होत आहे. त्या शिधापत्रिकांचे वाटप संबंधित लाभार्थींना झालेच नाही. त्यामुळे सहायक जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून या प्रकाराची चौकशी सुरू आहे. दोन दिवसांत त्यांचा अहवाल वरिष्ठांना सादर केला जाणार असल्याची माहिती आहे.
अकोला शहरातील लाभार्थींना नवीन शिधापत्रिका, दुय्यम शिधापत्रिका, शिधापत्रिकेतून नाव कमी करणे, वाढ करणे यासह महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या लाभासाठी प्रमाणपत्र देण्याचे काम शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयातून केले जाते. त्यासाठी या कार्यालयाने एक स्वतंत्र कक्षच तयार केला. तसेच या कामांसाठी स्वतंत्र कर्मचारीही दिले. या कक्षावर निरीक्षण अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी यांचे नियंत्रण असते. 
शिधापत्रिकेसाठी अर्ज घेणे, त्यासोबत कागदपत्रांची पूर्तता करून घेणे, गृहभेट अहवाल घेतल्यानंतर ठरलेल्या कालावधीत शिधापत्रिकेचे वाटप करण्याची जबाबदारी या कक्षातील कर्मचार्‍याची आहे. त्या कक्षात २0१४ पासून आतापर्यंत नवीन आणि दुय्यमसाठी अर्ज केलेल्यांच्या शिधापत्रिका तयार आहेत. त्यांची संख्या तब्बल ७00 पेक्षाही अधिक आहे. 
त्या शिधापत्रिकांचे वाटपच झाले नसल्याचा मुद्दा काही दिवसांपूर्वी पुढे आला. या गंभीर प्रकाराची चौकशी करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष शिंदे यांनी सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी औदुंबर पाटील यांना निर्देश दिले. त्यानुसार शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयात पडून असलेल्या शेकडो शिधापत्रिका ताब्यात घेत गेल्या काही दिवसांपासून चौकशी सुरू करण्यात आली. ती आता आटोपली आहे. अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. 

दुकानदारांना हाताशी धरून धान्य वाटपात घोळ
नव्या आणि दुय्यम शिधापत्रिका तयार झाल्यानंतर त्याची नोंद घेऊन धान्य वाटपासाठी पात्र ठरवण्यात आलेल्या शिधापत्रिकाही त्यामध्ये आहेत. लाभार्थींकडे शिधापत्रिका नसल्याने दुकानदाराने त्यांच्या नावे उचल केलेले धान्य त्यांना न देण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे शेकडो शिधापत्रिकांपैकी ज्या धान्य लाभार्थींच्या आहेत, त्यांच्या नावे दुकानदारांनी धान्याची उचल केली का, ते धान्य लाभार्थींंना वाटप झाले का, याचीही चौकशी झाल्यास मोठा घोळ उघड होण्याची शक्यता आहे. 

महिला कर्मचार्‍याचा कार्यभार बदलला!
या प्रकाराची तक्रार प्राप्त होताच शहर अन्न धान्य वितरण अधिकारी कार्यालयात दुय्यम शिधापत्रिका देणे, नाव कमी करणे, वाढवणे, जीवनदायी योजनेचे प्रमाणपत्र देण्याची जबाबदारी असलेल्या महिला कर्मचार्‍याला तेथून हटवण्यात आले. त्या ठिकाणी नव्या कर्मचार्‍याला जबाबदारी देण्यात आली आहे. 

अंतिम चौकशी अहवाल तयार आहे. दरम्यानच्या काळात सुटीवर असल्याने तो सादर करता आला नाही. बुधवारपर्यंत वरिष्ठांना अहवाल सादर केला जाईल. 
- औदुंबर पाटील,  
सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी 

Web Title: Inquiry of the ration card for three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.