अकोला जिल्ह्याच्या दिव्यांग धीरजने सर केले किलीमंजारो हिमशिखर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 02:52 PM2019-01-29T14:52:09+5:302019-01-29T14:53:11+5:30

अकोट (जि.अकोला): अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले जगातील सर्वात उंच असे दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सर केले.

Handicaped Dhiraj of Akola climbed up Kilimanjaro peack | अकोला जिल्ह्याच्या दिव्यांग धीरजने सर केले किलीमंजारो हिमशिखर

अकोला जिल्ह्याच्या दिव्यांग धीरजने सर केले किलीमंजारो हिमशिखर

googlenewsNext

- विजय शिंदे
अकोट (जि.अकोला): अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील धीरज बंडू कळसाईत या एक हात व एक पाय नसलेल्या दिव्यांगाने ज्वालामुखीच्या उद्र्रेकातून तयार झालेले जगातील सर्वात उंच असे दक्षिण आफ्रिकेतील किलीमंजारो हे हिमशिखर २६ जानेवारी प्रजासत्ताकदिनी सर केले. आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, धाडसाच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करीत धीरजने भारताचा तिरंगा ध्वज प्रजासत्ताकदिनी पहाटे दिमाखाने फडकविला. सोबतच महाराष्ट्राच्या अस्मितेचा भगवा ध्वज आणि भारताचे क्रमांक-१ चे मराठी दैनिक ‘लोकमत’चा फलकही झळकविला. भारतातून हे शिखर सर करणारा धीरज कळसाईत हा पहिला भारतीय दिव्यांग आहे.
आफ्रिका खंडातील किलीमंजारो हा सर्वात उंच पर्वत टान्झानिया देशातील ईशान्य भागातील केनियाच्या सीमेवर आहे. या शिखराची उंची १९ हजार ३४१ फूट म्हणजेच ५ हजार ८९५ मीटर आहे. विशेष म्हणजे, हा जगातील सर्वात उंच पर्वत असून, बहुतांश भाग बर्फाळ असल्याने हिमस्खलन होत असते. हा पर्वत सरळ उभा असल्याने वातावरणातील तापमान व जोराने वाहणारे वारे याचा सामना करीत धीरज कळसाईतने हे शिखर सर करण्यासाठी २६ जानेवारीची पहाट उजाळली. धीरज हा मुंबई येथून आपल्या चमूसह २१ ला टान्झानियाला रवाना झाला. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर पूर्वतयारी करून सर्व साहित्यासह बेस कॅम्प पार करीत २३ जानेवारी रोजी किलीमंजारो शिखराच्या चढाईला सुरुवात केली. पहाटे शिखरावर पोहोचल्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत पूर्वतयारीनिशी गेलेल्या धीरजने भारत माता की जय, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय भवानीच्या जयघोषात प्रजासत्ताकदिनी पहाटे भारताचा तिरंगा तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेला भगवा ध्वज फडकविला. त्यानंतर सर्वांनी राष्ट्रगीताचे गायन केले. शारीरिकदृष्ट्या सुदृढ असलेल्या गिर्यारोहकालासुद्धा सदर शिखर सर करणे अनेक वेळा अशक्यप्राय ठरते; मात्र दिव्यांगसुद्धा जगाच्या पाठीवर कुठंही कमी नसल्याचे धीरजने दाखवून दिले. यापूर्वी धीरजने कळसुबाई शिखर, लिंगाणा, पावनखिंड, तुंगागड, त्रिकोणा गड, सुधागड अशा शिखरांवर यशस्वी गिर्यारोहण केले आहे. ही मोहीम पुणे पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांचा नेतृत्वाखाली राबविण्यात आली. यामध्ये दिव्यांग धीरज कळसाईत सोबतच पिंपरी चिंचवडचे साई कवडे (वय ९ वर्षे), मुंबईच्या प्रियंका गाडे, नवी मुंबई पोलीस दलातील व साताराचे मूळ रहिवासी तुषार पवार यांनीदेखील ही मोहीम यशस्वी पूर्ण केली. या मोहिमेसाठी विशेष सहकार्य ज्येष्ठ गिर्यारोहक सुशील दुधाणे यांनी केले.

माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द

साहसवीर धीरजच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. भूमिहीन असून, वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आर्थिक स्रोत नसल्याने २०१५ मध्ये बहिणीचे शिक्षण थांबले. धीरजने आर्थिक संकटाला तोंड देत मुक्त विद्यापीठातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. आधीच जन्मापासून डावा हात मनगटापासून नसल्याने त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष असतानाच २०१४ मध्ये झालेल्या अपघातात त्याला आपला एक पाय गमवावा लागला होता. शरीरात दिव्यांग आले असले तरी मात्र त्याने आपला आत्मविश्वास कमी होऊ न देता उंच शिखरासारखी उंच स्वप्न बघत हे हिमशिखर दृढनिश्चयी व साहसी स्वप्न उराशी बाळगून होता. आपल्या दृढनिश्चयाने त्याने किलीमंजारो शिखर सर केल्यानंतर जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर करण्याची जिद्द मनाशी बाळगून आहे.



‘लोकमत’ने दिला मदतीचा हात!
धीरज कळसाईत या दिव्यांग गिर्यारोहकाची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची, राहण्याकरिता साधे घर नाही. त्या ठिकाणी आपल्या दिव्यांगत्वावर मात करून उंच शिखर सर करण्याचे अशक्य स्वप्न पाहणाऱ्या; परंतु आर्थिक परिस्थितीने हतबल असलेल्या धीरजची साहस कथा व किलीमंजारो पर्वत सर करण्याची त्याची अपेक्षा ‘लोकमत’ने मदतीचा हात सदरात प्रकाशित केली. त्यानंतर अनेक व्यक्ती, संस्था, संघटनांच्या रूपाने मदतीचे हात धीरजला बळकटी देण्याकरिता पुढे आहे. या मदतीच्या हातांनी त्याचे मनोबल उंचावले. प्रगल्भ इच्छाशक्तीच्या जोरावर जगावेगळं कर्तृत्व करायची जिद्द पूर्ण करीत त्याने जगात अशक्य अशी कुठलीही गोष्ट नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. ‘लोकमत’ने दिलेल्या पाठबळामुळेच धीरजने जगातील सर्व उंच शिखरावर भारताचे क्र. १ चे मराठी वृत्तपत्र असलेल्या ‘लोकमत’च्यावतीने संदेश दर्शविणारा फलक झळकविला.

असे आहे किलीमंजारो
जोहानस रेबमेन नामक एक जर्मन मिशनरी ने १८४८ मध्ये किलीमंजारो या शिखराचा शोध लावला होता, तर १८८९ मध्ये हेंस मेयर (जर्मनी), योआनास किन्याला लौवो (तंजानिया) आणि लुडविग पुर्तस्चेलर (आॅस्ट्रिया) या तीन गिर्यारोहकांनी पहिल्यांदा सफलतापूर्वक चढाई केलेली आहे. त्यानंतर या शिखरावर दरवर्षी या शिखरावर चढाई करताना जवळपास १० गिर्यारोहकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे, तर फ्रान्सच्या वॉल्टी डेनियल (८७) या सर्वाधिक वयाच्या गिर्यारोहकाने हा शिखर सर केला आहे. सर्वात कमी वय असलेल्या पुणे येथील बालेवाडीच्या ९ वर्षांचा साई सुधीर कवडे या बालकाने यशस्वी चढाई केली. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोट येथील एका पायाने व हाताने दिव्यांग असलेला धीरज हा किलीमंजारो शिखर सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक असल्याचे मानल्या जात आहे.

 

Web Title: Handicaped Dhiraj of Akola climbed up Kilimanjaro peack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.