Gharku beneficiaries not get sand | वाळू नसलेल्या नाल्यांवर घरकुल लाभार्थ्यांची बोळवण!
वाळू नसलेल्या नाल्यांवर घरकुल लाभार्थ्यांची बोळवण!

- संतोष येलकर

अकोला : घरकुल बांधकामांसाठी अकोला तालुक्यातील ३० ग्रामपंचायती अंतर्गत लाभार्थ्यांना स्वखर्चाने वाळूची उचल करण्याकरिता घुसर, घुसरवाडी व म्हातोडी या तीन गावांच्या नाल्यातील वाळूस्थळे अकोला तहसील कार्यालयामार्फत निश्चित करण्यात आली; परंतु या नाल्यांमध्ये वाळू उपलब्ध नसल्याने, वाळूची उचल करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना वाळूविना परतावे लागल्याचा प्रकार ११ मार्च रोजी घडला. त्यामुळे वाळू नसलेल्या नाल्यांची स्थळे देऊन घरकुल लाभार्थ्यांची बोळवण करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना व इतर योजनांतर्गत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी प्रत्येकी पाच ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा आदेश शासनामार्फत देण्यात आला आहे. त्यानुषंगाने अकोला तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांची यादी अकोला पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडून तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आली. त्यानुसार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुल बांधकामांसाठी मोफत पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील वाळूची स्थळे निश्चित करण्यात आली. निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणाहून ११ मार्च रोजी घरकुल लाभार्थ्यांनी स्वखर्चाने वाळूची उचल करण्याचा आदेश अकोल्याचे तहसीलदार विजय लोखंडे यांनी दिला. त्यानुसार घुसर, घुसरवाडी व म्हातोडी येथील नाल्यातील वाळूची उचल करण्यासाठी परिसरातील ३० ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल लाभार्थी ट्रकसह आले होते; परंतु या तीन नाल्यांमध्ये वाळू उपलब्ध नसल्याचे आढळून आले. वाळूची उचल करण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या नाल्यातील वाळू स्थळांवर वाळू उपलब्ध नसल्याने, आलेल्या घरकुल लाभार्थ्यांना वाळूविनाच घरी परतावे लागले. त्यामुळे वाळू उपलब्ध नसलेली नाल्यांची ठिकाणे निश्चित करून घरकुल लाभार्थ्यांची बोळवण करण्यात आल्याचे वास्तव समोर आले.


३० ग्रा.पं.च्या लाभार्थींसाठी नाल्याची वाळू स्थळे निश्चित!
वाळू स्थळ ग्रामपंचायतनिहाय लाभार्थी
घुसर नाला घुसर, आपोती बु., सांगळूद, यावलखेड, कौलखेड गोमासे, रामगाव, दहीगाव, वरोडी व आपातापा.
घुसरवाडी नाला अंबिकापूर, दापुरा, म्हैसांग, लाखोंडा, आखतवाडा, मजलापूर, अनकवाडी व धोतर्डी.
म्हातोडी नाला म्हातोडी, कासली बु., निंभोरा, एकलारा, दोनवाडा, कपिलेश्वर, वडद बु., दहीगाव, हिंगणी बु., काटी-पाटी, रोहणा, कट्यार व मारोडी.

घुसर, घुसरवाडी, म्हातोडी येथील नाल्याची ठिकाणे वाळू घाट नाहीत. नाल्यांमध्ये वाळू उपलब्ध नसताना घरकुल लाभार्थींना वाळू देण्यासाठी नाल्याची ठिकाणे तहसीलदारांकडून निश्चित कशी करण्यात आली, असा प्रश्न निर्माण होत असून, संबंधित तीन नाल्यांमध्ये वाळू नसल्याने, वाळूसाठी ट्रॅक्टरसह गेलेल्या घरकुल लाभार्थींना वाळूविना घरी परतावे लागले. त्यामुळे नाहक त्रास आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.
-दिलीप मोहोड,
सरपंच, आखतवाडा तथा
अध्यक्ष, बारुला कृती समिती, आपातापा.

गटविकास अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या घरकुल लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्यासाठी महसूल मंडळ अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार वाळूची स्थळे निश्चित करण्यात आली. घुसर, घुसरवाडी व म्हातोडी येथील नाल्यांमध्ये माती मिश्रित वाळू उपलब्ध होती. नाल्याच्या ठिकाणी वाळू उपलब्ध झाली नसल्याने, घरकुल लाभार्थींनी ग्रामपंचायतमार्फत वाळूची मागणी केल्यास संबंधित लाभार्थींना वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.

 


Web Title: Gharku beneficiaries not get sand
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.