अकोला जिल्ह्यातील पाण्याच्या ५० टक्के नमुन्यात धोकादायक नायट्रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2018 01:04 PM2018-08-06T13:04:57+5:302018-08-06T13:08:07+5:30

अकोला : रासायनिक पाणी गुणवत्ता तपासणीत जिल्ह्यातील विविध स्रोतांतून घेतलेल्या २८०७ पैकी १५११ नमुन्यांच्या स्रोतातील पाणी आरोग्यास धोक्याचे आहे.

Dangerous nitrate in water samples of 50% of Akola district | अकोला जिल्ह्यातील पाण्याच्या ५० टक्के नमुन्यात धोकादायक नायट्रेट

अकोला जिल्ह्यातील पाण्याच्या ५० टक्के नमुन्यात धोकादायक नायट्रेट

Next
ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील २८०७ पाणी नमुन्यांची गेल्यावर्षी आॅगस्टअखेर मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली. १४२७ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे, तर ६६ नमुन्यांमध्ये क्लोराइड अधिक आहे. त्याशिवाय ६६ नमुन्यांतील क्लोराइडचे प्रमाणही आरोग्यास हानीकारक असल्याचे नमूद आहे.

- सदानंद सिरसाट
अकोला : रासायनिक पाणी गुणवत्ता तपासणीत जिल्ह्यातील विविध स्रोतांतून घेतलेल्या २८०७ पैकी १५११ नमुन्यांच्या स्रोतातील पाणी आरोग्यास धोक्याचे आहे. १४२७ नमुन्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण अधिक आहे, तर ६६ नमुन्यांमध्ये क्लोराइड अधिक आहे. पाण्याच्या रासायनिक आणि जैविक गुणधर्मात बदल झाल्याने त्याचा सजीवांवर घातक परिणाम होत असल्याचा निष्कर्ष महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आधीच प्रसिद्ध केला आहे.
भूगर्भजल जलगुणवत्ता निर्देशांकाचे मोजमाप करण्यासाठी सामू, एकूण कठीणपणा, कॅल्शिअमचा कठीणपणा, मॅग्नेशिअम, क्लोराइड, एकूण विरघळलेले पदार्थ, फ्लोराइड, नायट्रेट, सल्फेट या घटकांचा विचार केला जातो. त्यानुसार स्रोतांतील पाणी नमुन्यांची दर सहा माही तपासणी केली जाते.
अकोला जिल्ह्यातील २८०७ पाणी नमुन्यांची गेल्यावर्षी आॅगस्टअखेर मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर अद्याप ती झालेली नाही. तीन प्रयोगशाळात विभागून दिलेल्या तालुक्यातील नमुने पाठवले जातात. अकोला शहरासह सात तालुक्यातील एकूण पाण्याच्या नमुन्यांपैकी १४२७ नमुन्यात नायट्रेटचे प्रमाण मानवी आरोग्यास हानीकारकतेच्या मर्यादेपलीकडे असल्याचे पुढे आले. त्याशिवाय ६६ नमुन्यांतील क्लोराइडचे प्रमाणही आरोग्यास हानीकारक असल्याचे नमूद आहे. ३१९ नमुन्यातील पाण्याचा कठीणपणा अधिक आहे. पाणी अधिक आम्लारीधर्मी असल्याचे १४१ नमुन्यांच्या तपासणीत पुढे आले. या पाण्याच्या वापरामुळे मानवास आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यासाठी पाणी गुणवत्तेसाठी ग्रामपंचायती, आरोग्य विभागाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये किडनीच्या आजाराने मृत्यूच्या घटनाही सातत्याने होत आहेत.

मोर्णा नदीचे पाणी अतिवाईट श्रेणीत
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने राष्ट्रीय जल गुणवत्ता संनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जानेवारी २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जलगुणवत्ता निर्देशांकात अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा नदीचे पाणी अतिवाईट श्रेणीत असल्याचे म्हटले आहे. मंडळाने राज्यातील २५० ठिकाणांचा जलगुणवत्ता निर्देशांक प्रसिद्ध केला. त्यामध्ये अमरावती विभागात अतिवाईट श्रेणीत केवळ मोर्णा नदीचा समावेश आहे.

तालुकानिहाय धोकादायक पाणी नमुने
तालुका           नमुने               धोकादायक
अकोला          ३२७                       २२१
बार्शीटाकळी   ७१८                       ३२२
बाळापूर         ३०९                         १९८
पातूर            २७९                        ९१
मूर्तिजापूर    ६९०                        ४८२
तेल्हारा       ३१८                         १३१
अकोट        १६६                           ६६

 

Web Title: Dangerous nitrate in water samples of 50% of Akola district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.