काँग्रेस अन् आंबेडकरांचे एकमेकांवर दबावतंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:26 PM2019-02-05T12:26:32+5:302019-02-05T12:26:37+5:30

आंबेडकर व काँग्रेस यांच्यामधील चर्चा बिनसल्यावर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाणीवपूर्वक आघाडीचे बारा वाजविल्याचे आरोप करतात.

Congress and Ambedkar's pressures on each other | काँग्रेस अन् आंबेडकरांचे एकमेकांवर दबावतंत्र

काँग्रेस अन् आंबेडकरांचे एकमेकांवर दबावतंत्र

Next

अकोला: भारिप बमसंचे संस्थापक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत आघाडी करून त्यांना अकोला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यास प्राधान्य द्यावे. आघाडी होत असेल तर उत्तमच, अन्यथा स्वबळावर लढावे असा सूर काँग्रेसच्या बैठकीत निघाला होता. लोकसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला लोकसभा मतदारसंघाच्या स्थितीबाबत शुक्रवार १६ नोव्हेंबर रोजी मुंबईत आढावा घेतला असता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थित अकोल्याच्या स्थितीवर मंथन झाले होते. आता तीन महिने उलटल्यावरही काँग्रेस अन् आंबेडकर यांच्या आघाडीचा गुुंताच आहे; मात्र या दरम्यानच्या काळात दोहोंनी एकमेकांवर दबावतंत्राचे राजकारण कायम ठेवत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्याचाच प्रयत्न असल्याचे भासविणे सुरू केले आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघातील समीकरणांचा विचार केला तर भाजपाला थांबविण्यासाठी काँग्रेसला अ‍ॅड. आंबेडकरांची साथ हवी आहे. यापूर्वी १९९८ व १९९९ मध्ये काँग्रेस सोबत अ‍ॅड. आंबेडकरांच्या साथीने यश मिळविले होते. त्यांची पुनरावृत्ती २०१९ च्या निवडणुकीत व्हावी, असा मानस काँग्रेसचा आहे. तर दुसरीकडे काँगे्रसची साथ सोडल्यानंतर अ‍ॅड. आंबेडकरांनाही अकोला जिंकता आले नाही हा इतिहास आहे, त्यामुळे काँग्रेसनेही आंबेडकरांच्या अटी, शर्थी मान्य करून त्यांना सन्मान देत अकोला जिंकावे, असे आंबडेकरांच्या समर्थकांनाही वाटते. त्यामुळे आघाडीच्या प्रयत्नांकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागलेले आहे. आंबेडकर व काँग्रेस यांच्यामधील चर्चा बिनसल्यावर दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर जाणीवपूर्वक आघाडीचे बारा वाजविल्याचे आरोप करतात. त्यामुळे आघाडीत आमच्यामुळे बिघाडी झाली हा संदेश आपल्याकडून जाऊ नये याची काळजी घेत दोन्ही पक्ष एकमेकांवर दबाव कायम ठेवताना दिसत आहेत.
 
वंचित बहुजन आघाडीचे पत्ते खुले
एकीकडे अ‍ॅड. आंबेडकर व काँग्रेस यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या मेळाव्यात एकापाठोपाठ एक असे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर होत आहेत. एका अर्थाने हा काँग्रेसवर दबाव असला तरी दुसरीकडे स्वबळावरच निवडणूक लढवायची आहे, असे संकेत कार्यकर्त्यांना दिले जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या निमित्ताने भारिप-बमसंनेच आपले पत्ते खुले केल्याचे स्पष्ट चित्र या निमित्ताने दिसत आहे.
 
काँग्रेसकडून पर्यायांची चाचपणी
प्रदेश काँग्रेसकडे उमेदवारीसाठी गेलेल्या नावांमध्ये डॉ. अभय पाटील, डॉ. अरुण भागवत, डॉ. संजीवनी बिहाडे, डॉ. पुरुषोत्तम दातकर, डॉ. सुधीर ढोणे, सै. कमरोद्दीन या नावांचा समावेश असला तरी डॉ. अभय पाटील यांचे नाव अग्रक्रमाने आहे. अभय पाटलांसोबतच गेल्या चार दिवसात माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे नाव चांगलेच चर्चेत आले होते. खुद्द अनंतराव यांनीही दिल्ली दरबारी हजेरी लावून पक्षश्रेष्ठींसोबत मसलतही केली; मात्र आता पुन्हा आणखी एखादा पर्याय मिळतो का, याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसची आघाडी झाली नाही तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे भारिप-बमसंचे उमेदवार राहतील, हे स्पष्टच आहे. त्यामुळे त्यांच्याकडे वळणारी मते थांबविण्यासोबतच खासदार संजय धोत्रे यांच्या मतपेढीला धक्का देणारा मराठा उमेदवारच काँग्रेसची पसंती राहणार आहे.

 

Web Title: Congress and Ambedkar's pressures on each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.