अकोला : पाण्यासाठी रात्रीचा दिवस; खानापूर येथे भीषण पाणी टंचाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 02:12 AM2018-04-13T02:12:51+5:302018-04-13T02:12:51+5:30

खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांवर रात्रीचा दिवस करण्याची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 

Akola: Water shortage at Khanapur! | अकोला : पाण्यासाठी रात्रीचा दिवस; खानापूर येथे भीषण पाणी टंचाई!

अकोला : पाण्यासाठी रात्रीचा दिवस; खानापूर येथे भीषण पाणी टंचाई!

Next
ठळक मुद्देजलस्रोत आटल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी उन्हात भटकंती

रमेश निलखन । 
लोकमत न्यूज नेटवर्क
खानापूर : येथे गेल्या काही दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, पाण्यासाठी महिलांवर रात्रीचा दिवस करण्याची पाळी आली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पाणी टंचाईवर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. 
गावाची लोकसंख्या तीन हजारांच्या आसपास असून, सार्वजनिक सात विहिरी आहेत. ११ हातपंप असून, त्यामधून नऊ हातपंपांचे पाणी आटलेले आहे, तर सर्व विहिरींचे पाणी मार्च महिन्यातच आटलेले आहे. दोन हातपंपांवर ग्रा.पं.ने मोटारपंप बसविले असून, त्यातीलही एक हातपंप आटून गेला असल्यामुळे आता केवळ एकाच हातपंपावर ग्रामस्थांची मदार आहे. सदर हातपंपावर गावात ४ तर १ इंदिरा नगरात प्रति दोन हजार लीटर क्षमता असलेल्या टाक्या बसविल्या आहेत. एका बोअरवेलवर तेही पावसाळ्यापर्यंत तहान भागविणे अशक्यप्राय आहे. दिवसाला एकच वेळ या पंपावरून पाणी सोडल्या जात असून, हा बोअरवेलही उपशावर आला आहे. पाण्याची टंचाई ही एका वॉर्डापुरती र्मयादित नसून, पूर्ण गावाला याची झळ सोसावी लागत आहे. गावकर्‍यांचा मुख्य व्यवसाय हा शेती व शेतमजुरी असून, महिलांचा बराचसा वेळ पाण्यासाठी खर्च होत आहे. 
गावामध्ये जवळपास ४0 टक्के नागरिकांनी घरगुती बोअरवेल घेतलेले असून, सदर बोअरही आटून गेले आहे. गावाचे दक्षिणेस घनदाट असा जंगल असून, उर्वरित दोन बाजूने टेकड्या आहेत. त्यामुळे साहजिकच हे गाव खोलगट भागात आहे. दोन गावांतून तर दोन नाले गावाला लागूनच बाहेरून गेले आहेत. पावसाळ्यात पाणी येते आणि नाल्याने धो-धो वाहून जाते. त्याला कुठे गतिरोधकच नसल्यामुळे वाहून जाण्याशिवाय पर्याय नाही. अतवृष्टी झाल्यास नाल्याचे पाणी घरात प्रवेश करून नुकसान होते. सदर चारही नाल्यांवर जंगलामध्ये वनतळ्याची निर्मिती करून पाणी अडविल्यास ग्रामस्थांची गावाकडे असलेली धाव थांबेल आणि महत्त्वाचे म्हणजे गावातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे विहिरींना आणि हातपंपांना पाणी राहील. म्हणजे गावात भविष्यात पाण्याची टंचाई कधीही भासणार नाही. पुन्हा सिंचन क्षेत्रातही भरघोस अशी वाढ होईल, असे या वनतळ्यापासून चार फायदे आहेत; परंतु याकडे ग्रामपंचायत स्तरावरून काहीही विशेष अशी हालचाल दिसत नाही.

हातपंप दुरुस्तीकडे दुर्लक्ष 
पातूर आणि बाळापूर या दोन तालुक्यांसाठी हातपंप दुरुस्तीकरिता एकच गाडी पं. स. स्तरावर आहे. गावातील हातपंप रिपेरिंग केल्यास निम्मे हातपंप सुरू होणार आहे. याकडे वरिष्ठांचेही दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या पाणी टंचाईची झळ मानवासोबतच गुराढोरांना जास्तच पोहोचत आहे. गावातील अनेक हातपंप बंद पडलेले आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता आणखी वाढली आहे. 

मोर्णाचे पाणी कालव्याद्वारे सोडण्याची मागणी
६ एप्रिल रोजी मोर्णा प्रकल्पाचे पाणी मोर्णा नदीला सोडण्यात आले. तसेच मायनर एकपर्यंत कालव्यालाही सोडण्यात आले; परंतु मायनर एकपर्यंत केवळ पास्टुल, आस्टुल व लोणारी खुर्द या तीन गावांचाच समावेश होत असल्यामुळे पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसत असलेल्या खानापूर गावाला याचा कोणताही लाभ होऊ शकत नाही. गुराढोरांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी, हा यामागील उद्देश असून, कालव्याला सोडलेले पाणी कोठारी मार्गे चेलका या गावाकडे नदीमध्ये वळते करण्यात आल्याची माहिती आहे. सदर समस्या ही केवळ वरील तीन गावांचीच नसून, या समस्येने परिसरात खानापूर या गावाला विशेषकरून गंभीर स्वरूपाने ग्रासले आहे. मायनर दोनपर्यंत कालव्याला पाणी सोडल्यास गुरांसाठी पाण्याची व्यवस्था होऊन पाणी टंचाईवर काही प्रमाणात उपाययोजना होईल. 

फळबागा सुकल्या 
या टंचाईचा परिणाम फळबागांवर होत असून, पांडुरंग ठाकरे यांची दोन हजार डाळिंबाची तर परसराम निलखन यांची लिंबूची झाडे वाळली आहेत. यांच्यासह बर्‍याच शेतकर्‍यांच्या फळबागांवर या प्रकारची संक्रांत आली आहे. भरघोस उत्पन्न मिळेल, या आशेने अमाप खर्च करून लहान बालकाप्रमाणे झाडांची निगा राखल्यानंतर त्या झाडावर कुर्‍हाड चालविण्याची दुर्दैवी वेळ शेतकर्‍यांवर आली आहे. वरील संभाव्य बाबीचा विचार करून टँकरची तात्पुरती आणि कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. 

Web Title: Akola: Water shortage at Khanapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.