कोपरगाव : विवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यावरून मंगळवारी रात्री तालुक्यातील भोजडे येथे दोन गटात जोरदार संघर्ष होऊन गावात तणाव निर्माण झाला. या प्रकरणी पोलिसांनी मयत महिलेच्या पतीसह सासु, सास-या विरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
भोजडे येथे मयत प्रियंका (वय २३) या सासरी नांदत असताना दुचाकी व सोफासेट घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रूपये आणावेत म्हणुन पती प्रमोद बाळासाहेब सिनगर, सासु हिराबाई बाळासाहेब सिनगर व सासरे बाळासाहेब अहिलाजी सिनगर हे त्यांचा सतत शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून, उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक छळ करीत होते. या छळास कंटाळुन मयत प्रियंका सिनगर यांनी ३ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता भोजडे शिवारातील विजय सिनगर यांच्या गट क्रमांक ३१०/४ मधील शेतातील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान ६ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृतदेह आढळुन आला. याप्रकरणी तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली. मात्र आत्महत्येविषयी त्यांच्या माहेरील मंडळीने संशय घेतल्याने मंगळवारी दुपारी औरंगाबादच्या सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन करून रात्री साडे अकरा वाजता मृतदेह भोजडे गावात आणण्यात आला. मयताच्या माहेरील मंडळीने सासरच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा घेतल्याने दोन गटात जोरदार संघर्ष होऊन काही काळ तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर फौजफाट्यासह गावात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत दोन गटात वाद सुरू होता. अखेर अंत्यविधी उरकण्यात आला. याप्रकरणी मयताची आई अनिता गोरख निरगुडे रा. पढेगाव चौकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पतीसह सासू व सास-याविरूध्द गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली.