विखेंच्या घरात ‘कमळ’ का फुलले?, बंडाचा जुनाच वारसा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 04:30 PM2019-03-12T16:30:49+5:302019-03-12T17:31:41+5:30

काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेकदा घडलेला आहे. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.

why vikhe join to BJP? old formula of family rebels | विखेंच्या घरात ‘कमळ’ का फुलले?, बंडाचा जुनाच वारसा

विखेंच्या घरात ‘कमळ’ का फुलले?, बंडाचा जुनाच वारसा

Next
ठळक मुद्देकाय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?का सोडली नाही पवारांनी जागा?विखे यांना भाजपा मानवेल का?

- सुधीर लंके

काँग्रेसचे नेते व राज्याचे विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्याच घरात ‘कमळ’ फुलले आहे. हा म्हटले तरच काँग्रेससाठी धक्का आहे. कारण, विखे परिवाराचा पक्षबदलाचा इतिहास नवीन नाही. यापूर्वीही विखे घराण्याने काँग्रेसमध्ये बंड केल्याचा इतिहास अनेकदा घडलेला आहे. यावेळच्या त्यांच्या बंडाकडे काँग्रेसने गांभीर्याने पाहिलेले दिसत नाही.
राधाकृष्ण विखे यांचे पुत्र सुजय हे ‘अहमदनगर’ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करु इच्छित आहे. ही जागा राष्टÑवादीने सोडली नाही म्हणून सुजय यांनी बंड करत भाजपा प्रवेश केला. विखे यांचा हा भाजपा प्रवेश काँग्रेस थांबवू शकली असती. पवारांना काँग्रेस आग्रह करु शकली असती. मात्र, पवार व काँग्रेस या दोघांनीही विखे यांना एकप्रकारे दुर्लक्षित केले. विखे परिवाराची काँग्रेस विरोधी व बंडखोर भूमिका हेच कारण यामागे असू शकते.

काय आहे विखे-पवार-काँग्रेस संघर्ष?
सुजय यांचे आजोबा दिवंगत बाळासाहेब विखे हे काँग्रेसचे मोठे नेते होते. मात्र त्यांनी अनेकदा काँग्रेसमध्ये बंड केले. तोच कित्ता त्यांच्या नातवाने गिरविला आहे. बाळासाहेब विखे हे आठ वेळा खासदार झाले. मात्र, क्षमता असूनही त्यांना काँग्रेसमध्ये मंत्रिपद कधीही मिळाले नाही. त्यांना व त्यांचे पुत्र राधाकृष्ण यांना पहिला लाल दिवा शिवसेनेने दिला. काँग्रेस विखे यांच्याकडे नेहमी संशयाने पाहत आली. बाळासाहेब विखे हे काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे समर्थक होते. शंकरराव चव्हाण व पवार या संघर्षात विखे हे सतत शंकरराव यांच्यासोबत होते. १९७८ मध्ये शंकरराव चव्हाण, विखे, खताळ पाटील यांनी ‘मसका’ काँग्रेस काढली. शरद पवारांच्या ‘पुलोद‘ सरकारमध्ये ‘मसका’चे शंकरराव चव्हाण हे समाविष्ट होते. तेव्हाच पवार-विखे थोडी जवळीक होती. एरव्ही ती नव्हती. बाळासाहेब विखे यांच्यात मुख्यमंत्री पदाची क्षमता होती. मात्र, त्यांनी आपले वजन सतत शंकरराव चव्हाण यांच्या पारड्यात टाकले. त्यामुळेच आजही अशोक चव्हाण व राधाकृष्ण विखे यांच्यात सलगी आहे. पवारांना विखे यांनीही कधीही साथ दिलेली नाही.
राजीव गांंधी पंतप्रधान असताना बाळासाहेब विखे यांनी त्यांच्याविरोधात ‘फोरम’ निर्माण केला होता. विखे हे त्यावेळी काँग्रेसच्या ‘ब्लॅकलिस्ट’ मध्ये गेले. त्यातून त्यांची १९९१ ची लोकसभा उमेदवारी कापली गेली होती. त्यामुळे १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत विखे यांनी नगर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार यशवंतराव गडाख यांच्या विरोधात बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी केली. त्या निवडणुकीत विखे पराभूत झाले. मात्र, निवडणूक आचारसंहितेचा भंग केला म्हणून त्यांनी गडाख व पवार यांच्या विरोधात उच्च न्यायालयात खटला भरला होता. त्या खटल्यात गडाखांची निवड रद्द होऊन गडाख व पवार या दोघांवरही न्यायालयाने ठपका ठेवला होता. पवार त्यावेळी पुढे सहा वर्षासाठी निवडणूक लढविण्यासाठी अपात्रही ठरले असते. त्यांच्यावर नामुष्की ओढावली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरविले. पवारांवर हे संकट विखे यांनी आणले. ती सल पवारांच्या मनात आजही दिसते.
१९९१ च्या या खटल्याच्या पार्श्वभूमीवर १९९५ मध्ये राधाकृष्ण विखे यांना काँग्रेसने शिर्डी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यावेळी विखे परिवाराचे पुन्हा काँग्रेसचे सूत्र जुळले. मात्र, काही महिन्यातच राधाकृष्ण विखे शिवसेनेत जाऊन मंत्री झाले. विखे पिता-पुत्रांनी पुन्हा बंड करत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. १९९८ च्या निवडणुकीत बाळासाहेब विखे हे नगर मतदारसंघातून सेनेच्या तिकिटावर खासदार झाले. तेही केंद्रात मंत्री झाले.
शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेसमध्ये सोनिया गांधी यांच्या विरोधात बंडखोरी करत राष्टÑवादी काँग्रेस काढली. त्यावेळी विखे शिवसेनेत होते. त्यांनी त्यावेळी सेनेकडून राष्ट्रवादी विरोधात कोपरगाव लोकसभा मतदासंघातून निवडणूक लढवत विजय मिळविला. २००४ ला दोन्ही काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी विखे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पवारांनी त्यावेळी त्यांच्यासाठी कोपरगावची जागा काँग्रेसला सोडली होती. म्हणजे पवारांनी एकदा विखे यांच्यासाठी जागा सोडल्याचा इतिहासही आहे. मात्र, आता नगरची जागा पवारांनी सोडली नाही या कारणावरुन सुजय विखे यांनी बंडखोरी केली.

का सोडली नाही पवारांनी जागा?
विखे हे कुठल्याही पक्षात असले तरी ते स्वत:चा गट वाढविण्यास प्राधान्य देतात. सर्व पक्षात त्यांचे कार्यकर्ते आहेत. जिकडे विखे तो आमचा पक्ष अशी या कार्यकर्त्यांची भूमिका असते. त्यामुळे विखे यांचे नगर जिल्ह्यात सर्वच विधानसभा मतदारसंघात एक उपद्रवमूल्य आहे. त्या जोरावर ते सर्वांना वाकविण्याचा व आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. विखे यांच्यासाठी नगरची लोकसभेची जागा सोडल्यास ते खासदार होतील. नंतर राष्टÑवादीला उपद्रव देतील ही भीती पवार यांना असावी. त्यामुळे त्यांनी ही जागा सोडण्यास नकार दिला.

विखे यांना भाजपा मानवेल का?
सुजय विखे हे भाजपामधून विजयी झाल्यास त्यांचा प्रवास सुकर राहील. अन्यथा विखे यांना नगर जिल्ह्यात मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागेल. विखेंच्या भाजपा प्रवेशामुळे बाळासाहेब थोरात यांच्याकडे आता नगर जिल्ह्याचे काँग्रेसचे नेतृत्व येण्याची शक्यता आहे. राज्यातही काँग्रेस राधाकृष्ण विखे यांच्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांना आता अधिक महत्त्व देईल. त्यामुळे थोरात यांच्यासाठी आता काँग्रेसच्या नेतृत्वाची संधी वाढली आहे.

Web Title: why vikhe join to BJP? old formula of family rebels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.