...तर डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे यांची खासदारकी जाणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 04:23 PM2019-06-20T16:23:41+5:302019-06-20T16:24:03+5:30

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी, तसेच पराभूत उमेदवारांनी २२ जूनपर्यंत अंतिम निवडणूक खर्च सादर करावा, अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची ...

... then Dr. Sujay Vikhe, MP of Sadashiv Lokhande? | ...तर डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे यांची खासदारकी जाणार ?

...तर डॉ. सुजय विखे, सदाशिव लोखंडे यांची खासदारकी जाणार ?

Next

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांनी, तसेच पराभूत उमेदवारांनी २२ जूनपर्यंत अंतिम निवडणूक खर्च सादर करावा, अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल, असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यमान खासदारांची धावपळ उडाली आहे.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखेंसह मतदारसंघातील १९ उमेदवार व शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह एकूण २० उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या खर्च नियंत्रक कक्षाने खर्चाबाबत बजावले. निवडणूक खर्च निरीक्षक अजित मिश्रा यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभेचे उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींची निवडणूक खर्चाबाबत बैठक झाली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, नोडल अधिकारी अनारसे, महेश घोडके यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणूक खर्च निरीक्षक मिश्रा यांनी आयोगाच्या निर्देशाप्रमाणे खर्चाबाबत सूचना केल्या. या उमेदवारांना निवडणूक निकालानंतर ३० दिवसांच्या आत उर्वरित खर्च निवडणूक आयोगाला सादर करणे बंधनकारक आहे. हा खर्च सादर न केल्यास उमेदवाराला पुढील निवडणूक प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. तसेच विजयी उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल असेही त्यांनी सांगितले.
नगर मतदार संघातील उमेदवारांनी १८एप्रिलपर्यंत खर्च सादर केला असून, १९ उमेदवारांपैकी सर्वाधिक खर्च भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी (५१ लाख ८९ हजार २८९) केला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनीही ४२ लाख ४० हजार ८४६ रुपये खर्च केला. या १९ उमेदवारांपैकी खर्चाच्या बाबतीत विखे अव्वल ठरले असून दोन्ही पक्षाने हा खर्च मान्य केला असल्याचे सांगण्यात आले.
शिर्डी लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची दुसरी तपासणी करण्यात आली होती. १९ एप्रिलपर्यंत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा निवडणूक आयोगाने परिगणित केलेला खर्च ३० लाख ८ हजार ६७३ रुपए आहे. तर लोखंडे यांनी घोषित केलेला खर्च २४ लाख ८३ हजार ४९८ रुपये आहे. याशिवाय काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांनी आतापर्यंत ३ लाख ८४ हजार ३३९ रुपये निवडणूक खर्च झाल्याचे घोषित केले आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाने परिगणित केल्यानुसार कांबळे यांचा खर्च ८ लाख ८ हजार ६४४ रुपये झाला आहे. अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे, भाकपचे उमेदवार बन्सी सातपुते, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखदान यांचा खर्चसुद्धा एक लाखांच्या पुढे गेला आहे.
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा खर्च तपासण्यासाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र कक्ष स्थापन केला होता. यामध्ये उमेदवाराला ७० लाखांची खर्च मर्यादा घालून दिली होती. या मर्यादेच्या अधिन राहून उमेदवारांनी १८ एप्रिलपर्यंत खर्च सादर केला आहे. आता या उमेदवारांना २२ जूनपर्यंत आपला अंतिम निवडणूक खर्च आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

Web Title: ... then Dr. Sujay Vikhe, MP of Sadashiv Lokhande?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.