'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन

By सचिन धर्मापुरीकर | Published: February 14, 2024 01:22 PM2024-02-14T13:22:46+5:302024-02-14T13:22:58+5:30

उद्धव ठाकरे यांचे कोपरगावातील मेळाव्यातून शिवसैनिकांना आवाहन

Show seat to MP who supports Shiv Sena thieves; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks | 'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन

'शिवसेना चोरणाऱ्यांना साथ देणाऱ्या खासदाराला जागा दाखवा'; उद्धव ठाकरेंचं आवाहन

कोपरगाव : भाऊसाहेब वाकचौरे पक्ष सोडून गेले होते, ते परत आले. त्यांनी शिवसेना चोरली नाही. परंतू सध्याच्या खासदाराने गद्दारी करून शिवसेना चोरणाऱ्यांना साथ दिली. येणाऱ्या निवडणूकीत त्यांना जागा दाखवा असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

कोपरगाव येथील जनसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर खा. संजय राऊत, मिलींद नार्वेकर, वरूण सरदेसाई, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र झावरे, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका प्रमुख बाळासाहेब राहाणे, शहर प्रमुख सनी वाघ आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सकाळी दहा वाजता ही सभेची वेळ नसते. तरीही येवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली गर्दी आणि उत्स्फुर्त स्वागत याने मी भारावून गेलो आहे. भाजपवाल्यांनी खासदार, आमदार फोडले पण, त्यांना ज्यांनी निवडून दिले ते माझ्यासोबत आहेत, हे यावरून सिद्ध होते. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूकीत येथून निवडूण येईल तो शिवसेनेचा उमेदवारच असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी घराणेशाहीवर बोलतात. मग अशोक चव्हाण घराणेशाहीचे नाहीत का, असा सवाल करून उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींना आमची घराणेशाही खटकते. हो मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. प्रबोधनकारांचा नातू, शिवसेना प्रमुखांचा पूत्र म्हणून मला किंमत आहे. माझ्या घराण्यावर प्रेम करणारी जनता आहे. शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी साथ दिली नसती तर मोदी आज दिसले नसते, असेही ठाकरे म्हणाले.

हक्कासाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना अडविले जात आहे, पोलिसांकडून लाठ्या-काठ्या, अश्रूधुर सोडला जात आहे. ज्या स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार दिला, त्यांच्या शिफारशी लागु करण्याच्या मागणीसाठीच तर शेतकरी आंदोलन करीत असल्याचे ठाकरे म्हणाले. देशभक्त म्हणून एकत्र या, जात-पात, धर्म बाजूला ठेवून देशहितासाठी एकत्र या, कारण येणारी निवडणूक हुकूमशाही विरूद्ध लाेकशाहीची असणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

यावेळी भाऊसाहेब वाकचौरे यांचेही भाषण झाले. सूत्रसंचालन शिवाजी ठाकरे यांनी केले. कैलास जाधव, संजय सातभाई, डॉ. अजेय गर्जे, श्रीरंग चांदगुडे, प्रमोद लभडे, किरण बिडवे, इरफान शेख, योगेश बागुल, अतुल काले, अनिल आव्हाड, एैश्वर्यलक्ष्मी सातभाई, सपना मोरे, वर्षा शिंगाडे, राखी विसपूते, प्रफुल शिंगाडे, शेखर कोलते, सिद्धार्थ शेळके, भरत मोरे, राहुल देशपांडे, विक्रांत झावरे, विशाल झावरे, काँग्रेसचे आकाश नागरे, राष्ट्रवादीचे संदीप वर्पे आदी उपस्थित होते.

ना काळे, ना कोल्हे, शिवसेनेचा वाघ
ज्या जल्लोषात उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले, ते पाहिल्यावर मला पूर्ण खात्री झाली, यावेळेला कोपरगावमध्ये ना काळे, ना कोल्हे, शिवसेनेचा वाघच निवडून येणार, असे खा. संजय राऊत म्हणाले. इतके वर्षे हे सत्ता भोगताय, पण आठ दिवसाला पाणी येते, तेही गढूळ. हे सम्राट असून जनतेला शुद्ध पाणी देऊ शकत नाहीत, तर तुमची सत्ता काय कामाची. कोपरगावच्या साठवण तलावासाठी उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री असताना १२१ कोटी रूपयांचा निधी दिला असल्याची आठवण कारून देत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडवायला आपण निघालो आहोत, त्यात कोपरगावही आघाडीवर असेल, असा विश्वास व्यक्त केला.

Web Title: Show seat to MP who supports Shiv Sena thieves; Uddhav Thackeray's appeal to Shiv Sainiks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.