शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By चंद्रकांत शेळके | Published: October 2, 2023 08:43 PM2023-10-02T20:43:53+5:302023-10-02T20:44:53+5:30

गुलमाेहर रस्त्यावरील आनंद शाळेपासून निघालेल्या पायी माेर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले.

protest of teachers against school privatisation march at the collector office | शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शाळा खासगीकरणाविरोधात शिक्षकांचा आक्रोश, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

googlenewsNext

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : शाळांच्या खासगीकरणाने ग्रामीण भागातील गरीब मुले शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकली जातील. हा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या नेतृत्वाखाली राज्यभरात शिक्षक एकटवला आहे. सरकारने शाळा खासगीकरणाचा हट्ट न साेडल्यास प्राथमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून राज्यभर तीव्र आंदाेलन उभे राहील, असा इशारा प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य नेते डॉ. संजय कळमकर यांनी दिला.

शाळा खासगीकरणाविराेधासह इतर मागण्यांसाठी साेमवारी (दि. २) महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते संभाजीराव थाेरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आक्राेश माेर्चा काढण्यात आला. अहमदनगरमध्येही राज्य नेते बाळासाहेब झावरे, डॉ. संजय कळमकर, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा काढण्यात आला. गुलमाेहर रस्त्यावरील आनंद शाळेपासून निघालेल्या पायी माेर्चाचे रूपांतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत झाले.

जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सालके, सुदर्शन शिंदे, भास्कर नरसाळे, संगीता कुरकुटे, जयश्री झरेकर, राजेंद्र ठाणगे, प्रवीण ठुबे, अविनाश निंभाेरे, सुभाष तांबे, रघुनाथ झावरे, बाळासाहेब देंडगे, अमाेल साळवे, उषा बांडे, शशिकांत आव्हाड, स्वाती गाेरे, सुनीता काटकर, अंबादास गारुडकर आदी प्रमुख मंडळीसह शेकडाे शिक्षक-शिक्षिका या आक्राेश माेर्चात सहभागी झाले हाेते.

डॉ. संजय कळमकर म्हणाले की, शाळा खासगीकरणाचा हा निर्णय थेट समाजव्यवस्थेवर परिणाम करणारा आहे. शाळा कारखानदारांकडे गेल्या तर शाळांच्या माेठ्या जागा ते ताब्यात घेऊ शकतात. ही धोक्याची घंटा आहे. तुम्हाला शाळा दत्तकच द्यायच्या असतील तर आम्ही दहा गुरुजी एकत्र आल्यावर याच शाळा दत्तक घेऊ शकताे. गुरुजींनी शाळा दत्तक घेतल्यावर त्यांचेच निर्णय मान्य करावे लागतील. बदली, प्रमाेशन, सर्व काही निर्णय तेच घेतील, हे सरकारला मान्य हाेईल का, असा टोलाही कळमकर यांनी लगावला.

राज्य सरचिटणीस जगताप म्हणाले की, शिक्षकांबाबत राज्यात नेहमीच दुर्दैवी निर्णय हाेतात. आता खासगीकरणाचे संकटदेखील त्याचाच भाग आहे. खासगीकरण, कंत्राटीकरण आणि व्यापारीकरण न थांबवल्यास या गुरुजींचा सरकारला शाप लागेल.

प्रशांत बंब यांना कळमकरांचे शब्दबाण

संजय कळमकर यांनी आपल्या खुमासदार शैलीत आमदार प्रशांत बंब यांच्यावर टीका केली. बंब यांना ज्या गुरुजींनी शिकवले, त्यांना अगाेदर शाेधावे लागेल. त्यांचे आभार मानावे लागतील. हा बंब लवकर विझणार नाही. ताे पेटताच राहणे ही त्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, असा सल्ला त्यांनी शिक्षकांना दिला.

आमदार तनपुरेंचा आंदोलनाला पाठिंबा

शासनाने दत्तक शाळा देण्याच्या आडून जो खासगीकरणाचा घाट घातला आहे, तो शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांसाठीही धोकादायक आहे. २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याचे शासनाचे धोरण चुकीचे आहे. त्यामुळे गरीब, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे. शिक्षकांनी पुकारलेल्या या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

Web Title: protest of teachers against school privatisation march at the collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.