नवरात्र स्पेशल :पहिल्याच माळेला भाविकांची गर्दी : उत्साहात घटस्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 02:48 PM2018-10-10T14:48:06+5:302018-10-10T14:48:33+5:30

आज सकाळी विधिवत पूजा करून केडगावच्या रेणुकामाता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच माळेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

Navaratri Special: The crowd of devotees on the first visit: Impressions of excitement | नवरात्र स्पेशल :पहिल्याच माळेला भाविकांची गर्दी : उत्साहात घटस्थापना

नवरात्र स्पेशल :पहिल्याच माळेला भाविकांची गर्दी : उत्साहात घटस्थापना

googlenewsNext

योगेश गुंड
केडगाव : आज सकाळी विधिवत पूजा करून केडगावच्या रेणुकामाता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच माळेला दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणा-या होर्डिंग युद्धात नवरात्रोत्सवाला गालबोट लागू नये म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाने केडगाव देवी मंदिर परिसरात होर्डिंग लावणा-याविरोधात कठोर भूमिका घेतल्याने केडगाव मंदिर परिसर प्रथमच होर्डिंग मुक्त झाला आहे. नवरात्र उत्सव काळात कुठलाच अनुचित प्रकार घडू नये यासाठी २५ सीसीटीव्ही कॅमे-यांची परिसरात करडी नजर राहणार आहे.
केडगाव देवी मंदिर परिसरात दरवेळी नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात राजकीय कार्यकर्त्यांचे होर्डिंग लावले जातात. होर्डिंग लावण्याची जणू स्पर्धाच येथे पाहवयास मिळते. होर्डिंग फाडाफाडी व इतर कारणामुळे तणावाची स्थिती निर्माण होते. काही महिन्यापूर्वी केडगाव मध्ये झालेले दुहेरी हत्याकांड व नुकतेच पुणे येथे झालेली होर्डिंग दुर्घटना यामुळे केडगाव मध्ये प्रशासन गंभीर बनले. सध्या महापालिका निवडणुकीची धामधूम असल्याने आणि त्या पार्श्वभूमीवर होर्डिंग लावण्याची मोठी स्पर्धा निर्माण होणार असल्याने जिल्हा पोलीस प्रशासनाने केडगाव मध्ये पोलीस, मनपा प्रशासन, शांतता कमेटी आणि देवस्थान समिती यांची बैठक घेतली. यात होर्डिंग न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी रात्री केडगाव देवी परिसराची पाहणी केली. यात होर्डिंग लावणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच उत्सव काळात कोणताच अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या वाढवून ती २५ करण्यात आली. होर्डिंग बंदीचा प्रभाव आजच दिसून आला. एरव्ही होर्डिंगमुळे गजबजलेला मंदिर परिसर आज प्रथमच होर्डिंग मुक्त झालेला पाहवयास मिळाला. या निर्णयाचे भाविक व सामान्य नागरिकांनी स्वागत केले.
आज सकाळी मंदिरात उत्साहात घटस्थापना करण्यात आली. हिरामण रंगनाथ कोतकर व अनिता कोतकर या दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. प्रथम देवीला पंचामृताने स्नान घालून अभिषेक करण्यात आला. मंगळाई देवीला अभिषेक व आरती, भवानी गुरव यांच्या पादुकांची पूजा, दीपमाळेची पूजा करण्यात आली. भैरवनाथाच्या मंदिरात पूजा करण्यात आल्यानंतर ध्वजस्थापना करण्यात आली. देवीला महानैवेद्य देऊन आरती करण्यात आली. पुजेची व आरतीची जबाबदारी वंश परंपरेने गुरव परिवार करत आहे. यावेळी हर्षवर्धन कोतकर, संतोष कोतकर, दीपक कोतकर, विजय कोतकर, धनजय जामगावकर आदी उपस्थित होते.

केडगाव येथे नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंदिर परिसराला भेट दिली. यात रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे व होर्डिंग हटविण्याचे आदेश दिले. अतिक्रमण करणारे व होर्डिंग लावणा-या विरोधात कठोर भूमिका घेतली जावी असे त्यांनी आदेश दिले आहेत. - नितीनकुमार गोकाव, पोलीस निरीक्षक, कोतवाली पोलीस ठाणे

केडगाव मंदिर परिसरात होर्डिंग मुळे अनुचित प्रकार किंवा दुर्घटना होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन व शांतता समितीने होर्डिंग वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच भाविकांना त्रास होईल असे सर्व अतिक्रमणे हटवण्याचे आदेश दिले आहेत. - संजय आंधळे, शांतता समिती, सदस्य

Web Title: Navaratri Special: The crowd of devotees on the first visit: Impressions of excitement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.