असं एक ‘मनगाव’

By सुधीर लंके | Published: November 21, 2018 11:53 AM2018-11-21T11:53:40+5:302018-11-21T12:03:12+5:30

मनोरुग्ण महिलांचा आधारवड असलेल्या माउली प्रतिष्ठानच्या ‘मनगाव’ या प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे

A 'mangaon' | असं एक ‘मनगाव’

असं एक ‘मनगाव’

Next

मनोरुग्ण महिलांचा आधारवड असलेल्या माउली प्रतिष्ठानच्या ‘मनगाव’ या प्रकल्पाचे लोकार्पण बुधवारी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे व विविध मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्यानिमित्त ‘माउली’ प्रतिष्ठानच्या कार्याची ही ओळख....
अहमदनगरच्या सक्कर चौकात तब्बल सहा वर्षे भावाची वाट पाहत उभी असलेली ‘आक्का’ अखेर गेली. या आक्काला ती ३५-३६ वर्षे वयाची असताना तिच्या भावाने या चौकात आणून सोडले होते. ‘येथे थांब मी आलो’, असे म्हणून तो गेला. पण, पुन्हा कधी परतलाच नाही. एखादे कुत्र्याचे पिल्लू नको म्हणून दूरवर सोडून यावे तसे या आक्काला तिच्या कुटुंबाने सोडले होते. लहान बाळ वाट चुकल्यावर भांबावते तशी ती बिचारी भांबावली. तिचा कुटुंबावरचा विश्वास दृढ होता. भाऊ येईल या आशेने तब्बल सहा वर्षे या चौकात उभी राहिली. उकिरड्यावर मिळेल ते शिळे अन्न खायची व पुन्हा चौकात येऊन पहारा द्यायची.
आपल्या कुटुंबाने आपणाला घरातून व मनातूनही कधीच हद्दपार केले आहे याची तिला बिचारीला कल्पनाही नव्हती. मनोरुग्ण महिला घरात नको म्हणून तिला रस्त्यावर आणून सोडले होते. माउली प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र धामणे यांच्या रुपाने अखेर तिला भाऊ मिळाला व काही काळ तिला ‘माउली’ या सेवाभावी संस्थेचा निवारा मिळाला. तोवर तिला अनेक आजार जडले होते. आजाराने जर्जर झालेली आक्का अखेर दगावली. भावाचा विरह घेऊनच ती गेली.
‘माउली सेवा प्रतिष्ठान’ने अशा अनेक आक्कांना आधार दिला. आक्काच्या अगोदर धामणे यांना रस्त्यावर एक आजीबाई भेटली होती. मनोरुग्ण झाली म्हणून तिच्या मुलाने तिला रस्त्यावर आणून सोडले होते. रस्त्याने जाणाऱ्या येणा-या प्रत्येकाशी ती एकच वाक्य बोलायची ‘मला मरायचे आहे’. डॉ. धामणे या आजीबाईला थेट स्वत:च्या घरी घेऊन गेले होते. रस्त्यात घाणीनं माखलेल्या, शी-शूची शुद्ध हरपलेल्या या आजीला घरी घेऊन जाणं ही सोपी गोष्ट नव्हती. पण, धामणे यांनी ते आव्हान पेललं आणि या बेवारस आजीला आपल्या कुटुंबाचे सदस्य बनविले. ही आजी ‘माउली’ची पहिली सदस्य आणि आक्का दुसरी. जेव्हा हे प्रतिष्ठान शोध घेऊ लागले तेव्हा चौकाचौकात अशा अनेक ‘आज्जी’ आणि ‘आक्का’ त्यांना भेटल्या. कुणाला वडिलांनी रस्त्यावर आणून सोडलेले, कुणाला भावाने, कुणाला पतीने तर कुणाला सख्ख्या आईने.
माणूस हा किती मतलबी प्राणी आहे हे आशा आक्कांकडे पाहून कळते. शहरात, गावात फिरताना रस्त्यावर बेवारसपणे फिरणारे मनोरुग्ण दिसतात. शरीर खंगलेले, कळकट झालेली त्वचा, अस्ताव्यस्त कपडे, वाढलेले व मातीने माखल्याने गुठळ्या झालेले केस. हातात मिळेल ते खाणारी ही माणसे. त्यांच्यावर मनोरुग्णतेचा शेरा मारत समाज त्यांना दुर्लक्षून पुढे चालत राहतो. समाज मनावर त्यांच्या या अवस्थेबद्दल जराही ओरखडा उठत नाही. पण, माउली प्रतिष्ठानने त्यांच्याजवळ थबकून त्यांचे मन जाणून घेतले.
डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे या डॉक्टर दाम्पत्याची ही संस्था. हे दोघेही सोबत वैद्यकीय शिक्षण घेत असताना त्यांची ओळख झाली व ओळखीचे रुपांतर आयुष्याच्या साथीदारात झाले. वैद्यकीय क्षेत्रात काम करावे म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९९८ साली ही संस्था स्थापन केली. महामार्गाच्या कडेला विष्ठा खाणारा मनोरुग्ण या दाम्पत्याने बघितला होता. मानसिक अवस्थेमुळे एखादा माणूस विष्ठा खाऊ शकतो हे दृष्यही किती भयानक आहे. तेव्हा या दाम्पत्याने अशा रुग्णांना घरुन जेवणाचे डबे पुरविण्याचा निर्णय घेतला. दररोज ५०-६० व्यक्तींचे अन्न शिजवायचे व मनोरुग्णांचा शोध घेत त्यांच्यापर्यंत हा शिधा पोहोचवायचा. त्यांना जेऊ घालायचे. वेळ आली तर हाताने भरवाचये. ते सापडतील तेथे.
सुरुवातीला त्यांचे काम एवढ्यापुरतेच मर्यादित होते. पण, अशात त्यांना मरणाची वाट पाहत असणारी वरील आजीबाई भेटली. तिला घरी नेण्याशिवाय पर्याय नव्हता. यातून या दाम्पत्याला एक जाणीव झाली. या रुग्णांना अन्नाची गरज तर आहेच, पण त्यांना निवाराही हवा आहे. त्यातून निवासी हक्काचा प्रकल्पच उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पातील पहिले दातृत्व हे डॉ. धामणे यांच्या वडिलांचे. ते प्राथमिक शिक्षक होते. त्यांनी शिंगवे येथील सहा गुंठे जागा या प्रकल्पासाठी दिली. सुरुवातीला या प्रकल्पासाठी एक छोटी खोली बांधली गेली. त्यात आक्का प्रवेशली. बळजबरी तिला तेथे आणावे लागले.
रस्त्यावर कोठेही बेवारस व मनोरुग्ण महिला दिसली की तिला घेऊन यायचं. न्हाऊ-धुऊ घालायचे. तिच्या वैद्यकीय तपासण्या करायच्या. तिच्या आजाराचे विश्लेषण करायचे व उपचार करायचे. नुसते उपचार करुन भागणार नव्हते. या महिला जाणार कोठे? म्हणून माउलीने आयुष्यभर त्यांचा साथीदार व्हायचे ठरविले. रस्त्यावर बेवारस अवस्थेत सोडलेल्या या महिला केवळ आजाराच्या शिकार नाहीत. त्या समाजाच्या नजरेच्याही शिकार आहेत. या महिलांवर लैंगिक अत्याचार होण्याचे प्रमाण मोठे आहे. माउलीत दाखल होणाºया अशा अनेक महिला तपासणीनंतर गर्भवती आढळल्या. काही एचआयव्ही सारख्या आजाराला बळी पडलेल्या. यातील काही महिलांनी मुलांना जन्म दिला. या महिलांना आपल्या परिवाराचेही नाव सांगता येत नाही. मग, डॉक्टर धामणे यांनी या मुलांना आपलेच नाव देऊन त्यांचेही पालन पोषण करण्याचा निर्णय घेतला. आजमितीला या संस्थेत १४६ महिला व २० मुुले आहेत.
या प्रकल्पाचे वैशिष्ट्य हे की येथे मनोरुग्ण महिलांना त्यांच्या मुलांसह सांभाळले जाते. ब-याचदा मनोरुग्ण पुरुषांना आधार मिळतो. कुटुंबही त्यांना स्वीकारते. महिलांना मात्र कुणीच स्वीकारत नाही. सुरुवातीला महिलांवर उपचार केल्यानंतर त्यांच्या परिवाराचा शोध घेऊन धामणे यांनी त्यांना घरी पोहोचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यातील अनेक महिलांचा परिवारात गेल्यावर दुर्लक्षामुळे मृत्यू झाला. काही बेपत्ता झाल्या. त्यामुळे आता महिलांचा कायमस्वरुपी सांभाळ केला जातो.
धामणे दाम्पत्याच्या या उपक्रमाला सुरुवातीला पुण्यातील शरद बापट व स्व. वाय. एस. साने यांनी मदतीचा हात दिला. या संस्थेतील महिलांची वाढती संख्या पाहून बलभीम व मेघमाला पठारे यांनी स्वत:ची तीन एकर जागा या संस्थेसाठी दिली. तेथे ‘मनगाव’ हा प्रकल्प उभारला आहे. या महिलांसाठी येथे आधुनिक उपचारपद्धती व पुनर्वसन केंद्र आहे. ‘घर आणि मन हरविलेल्या माणसांचे गाव’ असे प्रकल्पाचे घोषवाक्य आहे. हे मनाची काळजी घेणारे गाव आहे. माणूस मनोरुग्ण होण्याची अनेक कारणे आहेत. ती कौटुंबिक आहेत अन् शास्त्रीयही. मेंदूतील रासायनिक बदलांतून हा आजार जडतो. पण, ही शास्त्रीय परिभाषा समजावून न घेता समाज या माणसांना कचरा फेकल्याप्रमाणे उकांड्यावर फेकतो. ‘माउली’ने त्यात माणूसपण शोधले.
रोटरी इंटरनॅशनल या संस्थेच्या वतीने मानवतावादी कार्यासाठी देण्यात येणारा ‘द वन इंटरनॅशनल हुम्यॅनॅटॅरियन अवॉर्ड २०१६’ या संस्थेला हाँगकाँग येथे मिळाला. या पुरस्काराची १ कोटी रुपयांची रक्कम धामणे दाम्पत्याने ‘मनगाव’परिवारात गुंतवली. तब्बल ६०० खाटांचे मोठं घर त्यातून साकारले आहे. २५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे.

सुधीर लंके, आवृत्तीप्रमुख, लोकमत, अहमदनगर 

Web Title: A 'mangaon'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.