वंचितांना विधानसभा, संसद पाहू द्या : लक्ष्मण माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 11:11 AM2018-08-30T11:11:31+5:302018-08-30T11:11:35+5:30

वंचित समाज घटकांना आजपर्यंत विधानसभा, संसद बघायला मिळालेली नाही. या घटकांनाही संसद बघू द्या, असे आवाहन करत यापुढे कुणीही बहुजन समाजाला गृहीत धरु नये, असा इशारा ‘उपरा’कार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन्ही कॉंग्रेस व भाजपला दिला.

Lets try Vidya Sabha, Parliament: Lakshman Mane | वंचितांना विधानसभा, संसद पाहू द्या : लक्ष्मण माने

वंचितांना विधानसभा, संसद पाहू द्या : लक्ष्मण माने

Next
ठळक मुद्देजनतेसाठी पैसा नाही म्हणता तर खुर्ची सोडा; आम्ही पैसे उभे करतो

अहमदनगर : वंचित समाज घटकांना आजपर्यंत विधानसभा, संसद बघायला मिळालेली नाही. या घटकांनाही संसद बघू द्या, असे आवाहन करत यापुढे कुणीही बहुजन समाजाला गृहीत धरु नये, असा इशारा ‘उपरा’कार व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन्ही कॉंग्रेस व भाजपला दिला. वंचित बहुजन आघाडी लोकसभा व विधानसभा लढविणार असल्याचेही ते म्हणाले.
नगर येथे आले असता माने यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. प्रा. किसन चव्हाण यावेळी त्यांच्यासमवेत होते. माने यांनी संपादकीय टीमशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘भाजप सरकार जनतेची मुस्कटदाबी करत आहे. मोदी देशाला आपली खासगी मालमत्ता समजत आहेत. देश पूर्णत: भांडवलदारांच्या ताब्यात दिला गेला आहे. त्यामुळे बेरोजगाची प्रचंड वाढली आहे. तरुण वर्ग उद्या कोणते टोक गाठेल हे काहीही सांगता येत नाही.
देशाची ही जी अवस्था आहे त्यास कॉंग्रेस व राष्टÑवादीही तेवढीच जबाबदार आहे. या पक्षांनीही भांडवलशाही पोसली. हे आज भाजपवर आरोप करतात. पण, आजवर यांचे कुणी हात बांधले होते?
वेगवेगळे समाजबांधव आज आरक्षणाची मागणी करत आहेत. आजपर्यंत ज्या समाजघटकांना आरक्षण देण्यात आले त्यांचीही फसवणूकच झालेली आहे. राजकारणासाठी आरक्षणाच्या मुद्याचा फायदा उठविला जात आहे. नोकर भरतीच निघणार नसेल तर आरक्षणाचे काय करायचे? फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, नोकर भरती करणार आहे का? हे सरकारने जाहीर करावे. अन्यथा या समाजाचीही फसवणूकच होईल. जिल्हाधिकारी होण्यासाठी आयएएस होण्याची गरज नाही, असे कार्पोरेट धोरण मोदी सरकार राबवित आहे. बहुजन व गरिबांची मुले आता ‘आयएएस’ होऊ नये यासाठी हे षडयंत्र आहे. भाजपला थोपविण्यासाठी आम्ही वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आहे. आमची सत्ता आल्यास आरक्षण देण्याची गरज भासणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करू. मुख्यमंत्री हे सरकारकडे पैसा नसल्याचे सांगतात. आम्ही म्हणतो, पैसा नाही म्हणता तर मग खुर्ची सोडा. पैसा कोणाकडून उभा करायचा ते आम्ही सांगतो.

बुद्धिवंतांना नक्षलवादी ठरविण्याचा प्रयत्न
नक्षलवाद्यांशी संबंध जोडून बुद्धिवंतांना अटक केली जात आहे. ज्यांना अटक केली ती पुस्तके लिहिणारी, निरुपद्रवी माणसं आहेत. गरिबांसाठी काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आहेत. कोणत्याही राजकीय पक्षांशी ते बांधील नाहीत. त्यांनाच नक्षलवादी ठरविण्याचे सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचल्याच्या संशयावरून पोलिसांनी मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्ते, साहित्यिक, विधिज्ञ, पत्रकार यांना मंगळवारी अटक केली. या पार्श्वभूमीवर माने म्हणाले, सरकारने लष्कराला बोलावून थेट नक्षलवाद्यांना गोळ््या घालाव्यात. पण, बुद्धिवंतांवर खोटे गुन्हे दाखल करु नयेत. संभाजी भिडेला अटक होत नाही. मात्र, बुद्धिवंतांना होते. सनातन, राष्टÑीय स्वयंसेवक संघ यांची कोठेही नोंदणी नसताना या संस्था चालतात कशा?

...तर काँग्रेसही आम्हाला नको
वंचित बहुजन आघाडीला राज्यात लोकसभेच्या १२ जागा द्याव्यात असा प्रस्ताव आम्ही दोन्ही कॉंग्रेससमोर ठेवला आहे. मात्र, त्यांच्याकडून उत्तर आलेले नाही. एवढ्या जागा आम्हाला ‘अ‍ॅडजस्ट’ करता येणार नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. ते जर आम्हाला समायोजित करु इच्छित नसतील, तर यापुढे आमचीही कॉंग्रेसला ‘अ‍ॅडजस्ट’ करण्याची भूमिका नाही, असे माने म्हणाले. यांनाच मते देण्याची आमची मानसिकता नाही. आता वंचितांनाही संसदेत पोहचण्याचे वेध लागले आहेत.

Web Title: Lets try Vidya Sabha, Parliament: Lakshman Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.