सॅनिटरी नॅपकीनचा कचरा दुर्लक्षित : पूर्वा बोरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 10:21 AM2018-06-05T10:21:41+5:302018-06-05T10:23:22+5:30

कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक अत्यंत दुर्लक्षित विषय समाजाच्या मुख्य प्रवाहात चर्चेत आणणारी ही पर्यावरणहीत याचिका मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या पूर्वा बोरा यांनी दाखल केली.

Ignored sanitary napkin waste: Pure berry | सॅनिटरी नॅपकीनचा कचरा दुर्लक्षित : पूर्वा बोरा

सॅनिटरी नॅपकीनचा कचरा दुर्लक्षित : पूर्वा बोरा

Next

कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात एक अत्यंत दुर्लक्षित विषय समाजाच्या मुख्य प्रवाहात चर्चेत आणणारी ही पर्यावरणहीत याचिका मूळच्या अहमदनगरच्या असलेल्या आणि पुण्यात कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या पूर्वा बोरा यांनी दाखल केली. या न्यायिक हस्तक्षेपातून सॅनिटरी नॅपकीनच्या कच-याचा दुर्लक्षित विषय आता कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीतील संपूर्ण भारतात प्रशासकीय बदल घडवून आणणारा ठरला आहे. त्याविषयी जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पूर्वा बोरा यांच्याशी ‘लोकमत’ने केलेली बातचित.


प्रश्न - सॅनिटरी नॅपकीनच्या कच-याचा विषय कसा सुचला?
पूर्वा : कायद्याच्या परीक्षेसाठी आॅगस्टमध्ये अभ्यास करीत असताना घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ माझ्या वाचनात आले आणि मला लक्षात आले, की विविध कंपन्यांद्वारे विक्री करण्यात येणा-या सॅनिटरी नॅपकीन सोबत वेगळे पाऊच देण्याची जबाबदारी कंपन्यांवर आहे. परंतु उत्पादक कंपन्या सॅनिटरी नॅपकीनसोबत वेगळे पाऊच देत नाहीत. त्यामुळे आम्ही अ‍ॅड. असीम सरोदे यांच्या मदतीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात पर्यावरणहीत याचिका दाखल करण्याचे ठरविले. माझ्यासोबत महिला हक्कांसाठी कार्यरत सुप्रिया जन-सोनार (मुंबई), तसेच मानवी हक्क वकील स्मिता सरोदे-सिंगलकर (नागपूर) यादेखील याचिकाकर्त्या आहेत.
प्रश्न - सॅनिटरी नॅपकीनच्या कचºयाबाबत कायद्यात नेमकी काय तरतूद आहे?
पूर्वा :घनकचरा व्यवस्थापन नियम २०१६ मधील कलम १७ नुसार सॅनिटरी नॅपकीनच्या प्रत्येक पॅकेटसोबत वापरलेले सॅनिटरी नॅपकीन फेकण्यासाठी वेगळे पाऊच द्यावेत, असे असतानाही ते दिले जात नाहीत. अशा बेकायदेशिरपणातून पर्यावरणाचा कायमस्वरूपी,  गंभीर -हास होतो.
प्रश्न - सॅनिटरी नॅपकीनचा कचरा निर्माण होण्याचे प्रमाण साधारणत: काय आहे?
पूर्वा :एक मुलगी किंवा स्त्री आपल्या संपूर्ण आयुष्यात साधारणत: ८००० ते १५०० सॅनिटरी नॅपकीन वापरते. भारतात दरवर्षी ४० हजार करोड सॅनिटरी नॅपकीनचा कचरा तयार होतो. इतके असूनही सॅनिटरी नॅपकीनच अविघटनशील कचरा पर्यावरणाला घातक ठरेल अशा पद्धतीने दुर्लक्षित केला जातो.
प्रश्न - सरकारी यंत्रणा आणि सॅनिटरी नॅपकीन उत्पादकांचा कसा प्रतिसाद मिळाला?
पूर्वा :सरकारी यंत्रणा आणि सॅनिटरी नॅपकीन उत्पादकांचा प्रतिसाद अत्यंत निराशाजनक आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, संचालक महाराष्ट्र आरोग्य विभाग, मुख्य सचिव शहरी विकास मंत्रालय, पुणे, मुंबई व नागपूरच्या महापालिका आयुक्तांना, तसेच सॅनिटरी नॅपकीन उत्पादक कंपन्या जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन, युनिचार्म इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, किंमबरले क्लाक्स लिव्हर लि., प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बलर यांनी प्रतिवादी म्हणून अजूनही साधे उत्तरसुद्धा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण न्यायालयात दाखल करण्याची तसदी घेतलेली नाही, ही खंत आहे.
प्रश्न - या पर्यावरणहीत याचिकेचा संपूर्ण भारतभर परिणाम झाला असे म्हटले जाते, त्याबाबत काय वाटते?
पूर्वा :भारतातील सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका या याचिकेमुळे सॅनिटरी नॅपकीनच्या कच-याचे व्यवस्थापन शास्त्रीय व कायदेशीर दृष्टिकोनातून व्हावे म्हणून कार्यरत झाल्या आहेत, हा व्यवस्था व यंत्रणांना कार्यरत करणारा महत्त्वाचा परिणाम आहे असे वाटते. हरित न्यायाधिकरणाच्या हस्तक्षेपामुळे पर्यावरणावरील मोठा आघात थांबेलच, शिवाय कचरावेचक कामगारांच्या आरोग्य हक्कांचे व समाजाच्या व्यापक स्वास्थ्याचे प्रश्नही सुटतील अशी अपेक्षा आहे. राज्य सरकार व शासकीय यंत्रणा सॅनिटरी नॅपकीन हा ओला कचरा आहे की सुका कचरा, असा प्रश्न निर्माण करून गोंधळाचे वातावरण निर्माण करीत आहे.
प्रश्न - सॅनिटरी नॅपकीनला काही पर्याय आहे का, जेणेकरून हा कचरा निर्माणच होणार नाही?
पूर्वा :आम्ही आमच्या याचिकेतच लिहिले आहे, की आरोग्यपूर्ण सवयींसाठी स्वच्छ पॅड वापरणे महत्त्वाचे असते. मग हे पॅड तुम्ही घरच्या घरी कापडापासून तयार केलेले असू शकते किंवा बाजारातून विकत आणलेले असू शकतात. परंतु एक गोष्ट नक्की आहे, की आता सॅनिटरी नॅपकीनशिवाय स्त्रियांना आधुनिक जीवन जगणेच कठीण होईल. आमच्या याचिकेमुळे या विषयावर गेल्या काही महिन्यांत बरेच काही बोलले गेले. परंतु या सॅनिटरी नॅपकीनची पर्यावरणपूरक विल्हेवाट कशी लावावी, याचा फारसा विचार करताना सॅनिटरी नॅपकीनला पर्याय म्हणून मेन्स्ट्रुअल कप्स ही गोष्ट पुढे येत आहे. आपल्याला मेन्स्ट्रुअल कप्स फारसे माहिती नसतात. कधी तरी सोशल मीडियावर जाहिरात किंवा वृत्तपत्रांतील लेखांतून आपल्याला त्याची ओळख झालेली आहे. हे कप अगदी ५ ते १० वर्षे वापरता येतात. ते विकत घेताना थोडे महाग पडतात. परंतु त्यांचा वापर पाहता ही रक्कम वसूल होण्याची खात्रीच असते. हे कप वापरल्यानंतर स्वच्छ धुऊन ठेवायचे असतात.
प्रश्न - सॅनिटरी नॅपकीन कचरा इनसिनिरेटर (ज्वलनयंत्रात) मध्ये टाकून जाळणे हा एक उपाय म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे सांगितला जातोय त्यावर याचिकाकर्त्या म्हणून तुमचे मत काय?
पूर्वा :वापरलेला सॅनिटरी नॅपकीनचा कचरा अनेकदा कच-यात फेकून दिला जातो. काही ठिकाणी हे सॅनिटरी नॅपकीन नष्ट करण्यासाठी इनसिनिरेटर म्हणजेच ज्वलनयंत्र मशीन लावलेले असते. त्यात ती जाळली जातात. पण अनेक तज्ज्ञांच्या मते त्यातून येणारा वायू पर्यावरणाला घातक आहे आणि त्यामुळे सॅनिटरी नॅपकीनचा कचरा इनसिनिरेटर (ज्वलनयंत्रात) मध्ये टाकून जाळणे हा शास्त्रीय उपाय असू शकत नाही.

Web Title: Ignored sanitary napkin waste: Pure berry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.