अहमदनगरमधील कापूरवाडीच्या जलाशयात विदेशी पाहुण्यांचे आगमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 05:27 PM2017-11-12T17:27:32+5:302017-11-12T17:47:56+5:30

थंडीची चाहूल लागताच नगर जवळील कापूरवाडी येथील निळ्याशार जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात होते. पक्षी दिनाच्या निमित्ताने आज झालेल्या पक्षी निरीक्षणात ३० प्रकारच्या रंगी-बेरंगी पक्षांची नोंद करण्यात आली आहे.

Arrival of foreign guests at the water reservoir of Kapurwadi in Ahmednagar! | अहमदनगरमधील कापूरवाडीच्या जलाशयात विदेशी पाहुण्यांचे आगमन !

अहमदनगरमधील कापूरवाडीच्या जलाशयात विदेशी पाहुण्यांचे आगमन !

Next
ठळक मुद्देयुरोपियन पक्षांचे आकर्षण

योगेश गुंड 
अहमदनगर : थंडीची चाहूल लागताच नगर जवळील कापूरवाडी येथील निळ्याशार जलाशयावर देशी-विदेशी पाहुण्यांच्या आगमनाला सुरुवात होते. पक्षी दिनाच्या निमित्ताने आज झालेल्या पक्षी निरीक्षणात ३० प्रकारच्या रंगी-बेरंगी पक्षांची नोंद करण्यात आली आहे. थंडीची तीव्रता वाढल्यानंतर आणखी विदेशी पाहुणे या जलाशयावर विहार करण्यास जमणार आहेत.


विदेशी रंगी-बेरंगी आकर्षक पक्षांचे विहरण्यासाठी असलेले आवडते ठिकाण म्हणजे कापूरवाडीचा विस्तीर्ण पसरलेला निळाशार जलाशय. गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी स्थितीमुळे तलावातील पाणीसाठा घटला. यामुळे विदेशातून येणा-या पाहुण्यांची संख्या घटली होती. यावेळी पाउस चांगला झाल्याने कापूरवाडी येथील तलावात पाणीसाठा वाढला आहे. थेट विदेशातून येणा-या रंगी-बेरंगी पाहुण्यांनी तलाव बहरू लागला आहे.  पक्षी दिनाचे निमित्त साधून पक्षी अभ्यासक व निसर्ग मित्र मंडळ यांच्या वतीने पक्षी निरीक्षणाची मेजवानी आयोजित केली होती. यास नगर मधील हौशी पक्षीप्रेमींनी चांगला प्रतिसाद दिला. तलावाच्या भिंतीजवळ असणा-या झाडांवर युरोपातून आलेल्या पळसमैना पक्षांच्या थव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी गुलबस पायांच्या आणि शिडशिडती बांध्याच्या शेकात्या पक्ष्यानी तलावाच्या काठावर हजेरी लावली. यावेळी पक्षी अभ्यासक डॉ.सुधाकर कु-हाडे व कार्तिक स्वामी इंगळे यांनी पक्षी दिनाची माहिती दिली. टेलिस्कोप लाऊन सर्वांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. पक्षीमित्र बापूसाहेब भोसले, शाम भंडारी, विलास पाटील, राजेंद्र स्वामी, विजय देवचके, संध्या कु-हाडे, अरविंद गोरेगावकर यावेळी उपस्थित होते.

या पाहुण्यांचे झाले आगमन
लडाख वरून येणारे चक्रवाक, युरोपातील तलवार बदक, चित्र बलाक, चमचे, राखी बगळे, लालसरी बदक, चांदवा, पानडुबी,धोबी, खंड्या, हुप्पो ,खाटिक, कोतवाल, मुनिया, वेडे राघू, साथभाई, चीरक, मैना आदी पक्षांचे आगमन झाले आहे.

संख्या आणखी वाढणार
 जलाशयात समाधानकारक पाणी असल्याने विदेशी पाहुणे असणारे रंगी बेरंगी पक्षी विहरण्यासाठी येत आहेत. पाणीसाठा काहीसा कमी झाला कि आणखी विदेशी पक्षी पाहुणचारास येतील असा अंदाज आहे.
 

Web Title: Arrival of foreign guests at the water reservoir of Kapurwadi in Ahmednagar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.