जवाब दो : इथे दुर्गंधीत उमलतेय नवी पिढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 02:08 PM2018-11-25T14:08:31+5:302018-11-25T14:09:55+5:30

भल्या मोठ्या उघड्या गटाराशेजारी बसून बाराखडी गिरवित दुर्गंधीच्या सानिध्यात चिमुकल्यांची नवी पिढी उमलत आहे. या चिमुकल्यांना बसायला वर्ग तर आहेत,

Answer: Here smells like a new generation | जवाब दो : इथे दुर्गंधीत उमलतेय नवी पिढी

जवाब दो : इथे दुर्गंधीत उमलतेय नवी पिढी

Next

सोनल कोथिंबिरे - रोहिणी मेहेर
भल्या मोठ्या उघड्या गटाराशेजारी बसून बाराखडी गिरवित दुर्गंधीच्या सानिध्यात चिमुकल्यांची नवी पिढी उमलत आहे. या चिमुकल्यांना बसायला वर्ग तर आहेत, पण त्यांना खेळायला ना मैदान; ना इतर सुविधा़ एका वर्गात बसून घोकंमपट्टीशिवाय त्यांना पर्यायच नाही.  ही परिस्थिती आहे सर्जेपुरा येथील अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय व हवालदार शहीद अब्दुल हमीद उर्दू विद्यालय या जुळ्या शाळांची! सर्जेपुरा येथील लांडगे चौकाजवळच एका इमारतीत शेजारीशेजारी या दोन शाळा आहेत.  या शाळांच्या पाठीमागून भला मोठा एक नाला आहे. या नाल्यातील प्रचंड दुर्गंधी वर्गांमध्ये पसरते. त्यामुळे मुलांना नाक दाबूनच शिक्षण घ्यावे लागते. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत आहे. मात्र, महापालिका, लोकप्रतिनिधींना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत, आरोग्याबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे तेथील परिस्थितीवरुन जाणवत आहे. अहिल्याबाई विद्यालयाच्या दोन खोल्या असून, त्यात पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरत आहेत.  सर्वसामान्यांची सुमारे ३१ मुले या शाळेत शिक्षण घेत आहेत. शिक्षिका प्रिती बु-हाडे, शिक्षक भाऊसाहेब चिकणे हे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. वेगवेगळे प्रयोग शाळेत राबवित आहेत. मात्र, महापालिकेकडून या शाळांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्यामुळे शिक्षकांना शाळेच्या विकासासाठी फार योगदान देता येत नाही. अहिल्याबाई होळकर शाळेच्या भिंतीला जोडूनच हवालदार शहीद अब्दुल हमीद उर्दू प्राथमिक विद्यालय आहे. या विद्यालयाच्या दोन खोल्यांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. येथील पटसंख्या २६ आहे. शिक्षिका समिना खान, कमरजबीन इनामदार हे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत भर घालत आहेत. मात्र, त्यांनाही प्रशासकीय सहकार्याशिवाय फार काही करता येत नाही. या दोन्ही शाळांच्या खोल्यांतून बाहेर पडले की मुले थेट रस्त्यावरच येतात. रस्त्यावरचा गोंगाट, पथारीवाल्यांचा आरडाओरडा सहन करीत विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागते. शिक्षकांनी वारंवार महापालिकेकडे येथील समस्यांचे पाढे वाचले. मात्र, अद्याप महापालिकेच्या शिक्षण विभागाला शाळेच्या समस्यांकडे लक्ष देण्यास वेळ मिळालेला नाही.

दोन शाळांसाठी एक स्वच्छतागृह
अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालय ही मराठी माध्यमाची तर हवालदार शहीद अब्दुल हमीद प्राथमिक विद्यालय ही उर्दू माध्यमाची शाळा आहे. या दोन्ही शाळांसाठी एकच स्वच्छतागृह आहे. याकडेही कोणी लक्ष देत नाही. मैदानाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून वारंवार उपस्थित केला जात आहे. मात्र, जागेचे कारण दाखवून प्रत्येक वेळी हा प्रश्न टोलविण्यात येत आहे.


मेहेर यांचे उर्मट उत्तर
या शाळेच्या विविध प्रश्नांबाबत महापालिका लक्ष घालत नाही, असे तेथील शिक्षकांनी सांगितले. याबाबत महापालिकेचे प्रशासन अधिकारी संजय मेहेर यांना विचारले असता मला काहीही माहिती नाही. तुम्ही महापालिकेला विचारा़ शिक्षकांनी महापालिकेला काय पत्र दिले आहे, हे तुम्ही पाहिले आहे का, अशा उर्मट शब्दात मेहेर यांनी आपली प्रतिक्रिया ‘लोकमत’कडे व्यक्त केली.


‘लोकमत’चे आवाहन
‘लोकमत’ने वेळोवेळी शहरातील समस्यांना वाचा फोडली. नागरिकांनीही महापालिकेकडे अनेक प्रश्न मांडले. सदर प्रश्नांच्या सोडवणुकीचे आश्वासन त्या-त्या वेळी महापालिकेचे पदाधिकारी आणि सबंधीत नगरसेवकांनी दिले. या प्रश्नांचे खरोखरच काय झाले? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न ‘जवाब दो’ या मोहिमेद्वारे ‘लोकमत’ या निवडणुकीत करत आहे. महापालिका शाळांच्या दुरावस्थेपासून त्यास सुरवात केली आहे. याबाबत सत्ताधारी पदाधिकारी, नगरसेवक, लोकप्रतिनिधी काही मत नोंदवू इच्छित असतील, तर त्यांच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे.
- संपादक

Web Title: Answer: Here smells like a new generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.