ठळक मुद्देबुद्धाच्या शिष्यांसाठी वर्ज्य असलेलं आणि स्पर्शही करण्यास त्याज्य असलेलं मद्य घेत तानझेन बसले होते"जो मद्य घेत नाही तो तर साधा माणूसपण असत नाही""जर मी माणूसही नसेन तर कोण आहे"?

जपानची राजधानी तोक्योमध्ये मेईजी काळामध्ये दोन विद्वान आणि अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व अध्यात्मिक क्षेत्रात होती. विशेष म्हणजे दोघांची व्यक्तिमत्त्व एकमेकांपेक्षा भिन्न होती. एक होते उन्शो जे शिनगॉनमध्ये मार्गदर्शक होते. उन्शो हे गौतम बुद्धांची शिकवणूक तंतोतंत आचरणात आणण्याबाबत आग्रही होते.त्यांनी कधी मद्याला स्पर्श केला नाही तसेच सकाळी 11 वाजल्यानंतर त्यांनी कधी अन्नही घेतलं नाही.

तर दुसरे जे गुरू होते, त्यांचं नाव होतं तानझेन. इंपिरियल विद्यापीठात ते तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते, आणि त्यांनी कधीही बुद्धांच्या आचारप्रणालीचा आग्रही पुरस्कार केला नाही. ज्यावेळी त्यांना  खावंसं वाटे तेव्हा ते खात, दिवसा झोपावसं वाटलं तर चक्क ताणून देत.

एकदा उन्शो यांनी तानझेन यांची भेट घेतली. त्यावेळी बुद्धाच्या शिष्यांसाठी वर्ज्य असलेलं आणि स्पर्शही करण्यास त्याज्य असलेलं मद्य घेत तानझेन बसले होते. उन्शो आल्यावर तानझेननी त्यांना विचारलं, अरे भाऊ तू घेणार का थोडं मद्य? 
मी कधीही मद्य घेत नाही, अत्यंत थंडपणे उन्शो उद्गारले.

यावर, जो मद्य घेत नाही तो तर साधा माणूसपण असत नाही, असं तानझेन म्हणाले. नशा येणारे पदार्थ मी घेत नाही, केवळ या कारणासाठी मी अमानव ठरतो का? असा प्रश्न संतापलेल्या उन्शोंनी विचारला आणि पुढे, "जर मी माणूसही नसेन तर कोण आहे"? असा सवाल केला.
"बुद्ध" तानझेन म्हणाले...