चांगल्या कर्मानेच मनुष्य जीवनात यशप्राप्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2019 03:46 PM2019-02-02T15:46:25+5:302019-02-02T15:47:24+5:30

प्रत्यक्षात माणूस हा कर्माने मोठा होतो हे ज्ञात असून देखील खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे.  ईश्वर निर्मित जग हे अत्यंत सुंदर तर आहेच पण ते रहस्यमय देखील आहे.

Success in good life is the achievement of life | चांगल्या कर्मानेच मनुष्य जीवनात यशप्राप्ती

चांगल्या कर्मानेच मनुष्य जीवनात यशप्राप्ती

Next

सोडून आव मोठेपणाचा,

कधी लहान होऊन पहावे।

बाळगून मनी सतत उत्साह,

अनुभव घ्यावे नीत नवे।।

आजच्या कालखंडात मोठे, लहान, गरीब, श्रीमंत हे भाव प्रकर्षाने पाहावयास मिळतात. प्रत्येक व्यक्ती मी कसा मोठा आहे, हे दाखवण्यात मग्न असल्याचे दिसून येतो. प्रत्यक्षात माणूस हा कर्माने मोठा होतो हे ज्ञात असून देखील खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागलेला आहे.  ईश्वर निर्मित जग हे अत्यंत सुंदर तर आहेच पण ते रहस्यमय देखील आहे. या गोष्टीचा विचार करायला हवा माणसाला लाभलेल्या अल्पायुष्यात कितीतरी आनंद घेता येतो व देता देखील येतो परंतु खोट्या प्रतिष्ठा आणि अहंकारामध्येच लुप्त झालेला आहे. माणूस कितीही मोठा झाला परंतु, तो या समाजाचे उपयोगास नाही आला तर, त्याचे मोठेपण काही कामाची नसते. संत नामदेवांनी मानवी देह किती नम्र असावा, आणि सम मार्गी लागावा याकरिता ईश्वरचरणी प्रार्थना करीत असताना नम्रपणे ईश्वराला शरण जात म्हटले आहे,

देह जावो अथवा राहो। पांडुरंगी दृढ भावो।।

चरण न सोडी सर्वथा। आण तुझी पंढरीनाथा।।

वदनी तुझे मंगलनाम। हृदयी अखंडित प्रेम।।

वरील अभंगाच्या प्रत्येक शब्दात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली आहे. कुठेही ताठरपणा, अहंभाव, अहंकार नाही. उलट हृदयात अखंड प्रेम असुदे ही याचना केलेली आहे. आप-पर  भाव माणूस जेव्हा विसरेल तेव्हाच त्याचे नाव चिरकाल टिकते. प्रत्येक व्यक्ती हा मनाने मोठा होण्याची गरज आहे. अहंकाराचे ओझे वाहणारा व्यक्ती अत्यंत ताठर होतोच.परंतु फक्त वाढलेल्या वृक्षासारखा असतो. याउलट सात्विकचे व माणुसकीचे कर्तव्य जाणणारा व्यक्ती कितीही लहान असला, तरी तो रसरशीत फळांनी लगडलेल्या वृक्षासारखाच असतो. असाच व्यक्ती समाजाचे हित साधू शकतो.

वरून वरून दिसणारे ऐश्वर्या हे चिरकाल नसते. टिकून राहते ते कर्म.  'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, नदी डोंगी परि जल नोहे डोंगा, काय भुललाही वरलिया रंगा' असे ठणकावून आपणास संतांनी सांगितले आहे अहोरात्र 'अहं' पणा साठी झटणाऱ्यासाठी मात्र हे डोळ्यातील  मात्र अंजनाचे काम करते. एखाद्याच्या वरकरणी दिसणाऱ्या प्रतिष्ठा पेक्षा श्रमप्रतिष्ठा अत्यंत श्रेष्ठ असते. अशा व्यक्ती बाह्यांगाने सालस नसतील परंतु समाजहीत तशाच मानवाकडून होऊ शकते. ऊस कितीही वेडा-वाकडा असला तरी त्यामध्ये असणार्‍या रसाची गोडी कमी होत नाही. तसेच नदी कितीही वाकडी वळणे घेत प्रवाहित झाली,तरी त्या पाण्याचे महत्व कमी होत नाही. असेच असते समाजासाठी अंतः प्रेरणेने कार्य करणाऱ्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व म्हणूनच ईश्वराचा अंश म्हणून अशांना संबोधले जाते. अकबर बादशाहाच्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न कविराज अब्दुल रहिम खान हे मंत्री पदावर होते. इतक्या उच्च पदावर कार्यरत असून देखील अत्यंत साधेपणाने जीवन जगत होते. आपल्या उत्पन्नाचा बहुतांश भाग धार्मिक कार्यात ते खर्च करीत असत. त्यांच्या विनम्र स्वभावाने त्यांना असे उच्चपद प्राप्त झाले होते. तेव्हा काहींनी त्यांना विचारले की आपण एवढे विनम्र कसे?  त्यावर त्यांनी उत्तर दिले, 'देने वाला कोई और है, जो दिन रात देता रहता है.पर लोग मुझ पर भरम करते है, इसलिए शर्म, संकोच से मेरी नजर नीची हो जाती है. याला लहानपण म्हटले गेले आहे. अशाच व्यक्ती महान व अमर झाल्या. ज्या व्यक्तीने विनम्रतेची समजून घेतले तोच विशाल सागराप्रमाणे सर्व गोष्टी सामावणारा असतो म्हणून म्हटले जाते,"गुरुजनी ऐसे द्यावेत धडे।आपुला आदर्श ठेवोनी पुढे."

भालचंद्र संगनवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक,लातूर.

Web Title: Success in good life is the achievement of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.