संतांचे मन स्वच्छ झऱ्यासारखे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 08:38 AM2019-02-05T08:38:22+5:302019-02-05T08:38:38+5:30

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही.

Spiritual : The mind of saints is like a clean springhead | संतांचे मन स्वच्छ झऱ्यासारखे

संतांचे मन स्वच्छ झऱ्यासारखे

googlenewsNext

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

संतपणा बाजारात मिळत नाही. संताचे लक्षण त्याच्या मनोवृत्तीनुसार ठरतात. रानावनात गिरिकंदरात फिरून संत होता येत नाही. धन-मान-पैसा यावरून संत कळत नाही. आकाश-पाताळात गेलात तरी संतत्त्व लक्षात येत नाही. संत ईश्वराच्या आत्मसाक्षात्काराने भारावून गेलेले असतात. त्यांची जीवदशा बदलेली असते. ते मनाने सतत हरिचिंतनातच रत असतात. हरिनामाची आवड त्यांच्या मनात आहे ते प्रत्यक्षात ईश्वराचे रूपडे आहेत. त्यांच्याविषयी इतरांना ते कळत नाही. त्यासाठी संताचीच अनुभूती घ्यावी लागते. संताचे मन नितळ-स्वच्छ झऱ्यासारखे असते. ते कोणत्याही मोहात अडकत नाही. वर्तमान स्थितीत जगतात. जगत कल्याणाच्या कल्पना करतात. ते कशाचीही आशा न धरता सर्वस्व टाकून ईश्वराला शरण जातात. ते वर -वर आपल्यासारखे दिसतात; पण ते प्रत्यक्षात तसे नसतात.

त्यांचे मन ईश्वरातीत झालेले असते. आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक ताप निवारण करतात. व्यवहारात त्यांना अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थिती आली तरी ते समत्व ठेवतात. सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, भक्तांचे मनोरथ पूर्ण करणारे ईश्वरतत्त्व त्यांच्या हाती असते.
देव भक्तांचा अंकित असतो. संत झाल्याशिवाय संताचा महिमा कळत नाही. संत हे दीपस्तंभासारखे असतात. समाजाची नैतिकता, समाजाचे स्थैर्य टिकविण्यासाठी संताचा जन्म असतो. ‘जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे’ ही संताची मनोवृत्ती असते. जगत कल्याण हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असते. संताचे मन अथांग सागरासारखे विशाल असते. त्यांच्या कृपादृष्टीने माणूसपण येते. माणसाच्या आंतरिक वृत्तीत बदल होतो. ‘संतकृपा झाली इमारत फळा आली’ अशी संतवचने आहेत.

आपल्या मनात शंका-कुशंकाच येतात. संत त्या दूर करत मनाला सद्वृत्तीकडे परावृत्त करतात. मनाची अवस्था बदलून टाकतात. संतकृपेमुळे जीवनात स्थिरता येते. व्यावहारिक उन्नतीपासून आत्मिक उन्नतीचा मार्ग सुकर होतो. संतविचार मनुष्य जीवनात बदल घडवतात. धैर्यशील बनवतात. संतांची वचने सुमधुर, रसाळ व मृदू असतात. संताच्या विचारांचा मनावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे मनुष्यदेहाचे महत्त्व समजते. संसाराविषयी वीट येतो. ज्याच्यापासून हित आहे त्याची गोडी लागते. मन परिपक्व होते. म्हणून संताची कृपा मनुष्याला समाधान प्राप्त करून देतात. संताचे मन गंगेसारखे पावन असते.

(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

Web Title: Spiritual : The mind of saints is like a clean springhead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.