॥ श्रीज्ञानेश्वर व श्रीज्ञानेश्वरी ॥

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 02:41 PM2018-11-10T14:41:39+5:302018-11-10T14:43:17+5:30

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात आपल्या अनेक उपमानांतून सूर्यदेवतेचा उपयोग करून घेतला आहे.

shridnyaneshwar and shridnyaneshwari | ॥ श्रीज्ञानेश्वर व श्रीज्ञानेश्वरी ॥

॥ श्रीज्ञानेश्वर व श्रीज्ञानेश्वरी ॥

  ॥ पुष्प तिसरे ॥ 

॥ श्रीज्ञानदेवांचा ज्ञानमार्तंड ॥

श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथात आपल्या अनेक उपमानांतून सूर्यदेवतेचा उपयोग करून घेतला आहे. अठराव्या अध्यायातील 'ईश्वरः सर्वभूतानां हृद्येशेऽर्जुन तिष्ठति l' या एकसष्टाव्या श्लोकावरील टीकेत ईश्वराचे स्वरूप वर्णन करतांना हे सूर्याचे रूप अत्यंत अलंकारिक भाषेत तीन ओव्यातून सांगितले आहे. 'सर्व प्राणिमात्रांच्या हृद्य महाकाशांत ज्ञानवृत्तीच्या सहस्त्रकिरणांनी युक्त असा जो ईश्वररूपी सूर्य उगवला आहे; जागृति, स्वप्न, सुषुप्ती या तीन अवस्था हेच कोणी स्वर्गादी तिन्ही लोक. ते लोक ते संपूर्ण प्रकाशून, 'देह मी' अशा विपरीत ज्ञानाने भुललेले वाटसरू त्या सूर्याने जागे केले,  दृश्य जगद्रूपीं पाण्याच्या सरोवरात, विषयरूपी कमळे उगवली असता पंचज्ञानेंद्रिये व सहावे मन या सहा पायाने युक्त असलेल्या जीवरूपी भ्रमराकडून त्या विषयकमळाचे सेवन तो ईश्वररूपी सूर्य करवितो. 'म्हणजे सूर्यदेवतेची आधिभौतिकादी तीन रूपे वर सांगितली तिचे आध्यात्मिक स्वरूप ईश्वरावर सूर्याचे रूपक केले त्यावरून समजून येईल. श्रीज्ञानदेवांच्या दृष्टीने ब्रह्म, ईश्वर, आत्मा, सद्गुरु यात काही अंतर नाही. जसे ईश्वरास सूर्य म्हणून महाराजांनी वर्णन केले तसेच आपले सद्गुरु श्रीनिवृत्तिनाथ यांनाही त्यांनी 'सूर्य' म्हणून संबोधिले आहे. 'नमो संसार तम सूर्यो' असे श्रीज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायाच्या मंगलाचरणात म्हणतात.

श्रीज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायाच्या आरंभी जे विस्तृत मंगल केले आहे ते या दृष्टीने फार महत्वाचे आहे. तसेच रूपकालंकार या दृष्टीने तर ते अजोड आहे. श्रीज्ञानोबारायांनी आपल्या सद्गुरुंना 'चित्सूर्य', 'ज्ञानमार्तंड', 'चिदादित्य' या पदांनी गौरविले आहे. म्हणजे हा लौकिक सूर्य श्रीज्ञानदेवांना लोकव्यवहारांत महत्वाचा वाटला म्हणूनच त्यांनी श्रीगुरुंना सूर्याची उपमा देऊन गौरविले आहे.

- ह. भ. प चैतन्य कबीरबुवा

Web Title: shridnyaneshwar and shridnyaneshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.