अरे संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये ।

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 01:13 AM2019-07-01T01:13:59+5:302019-07-01T01:14:17+5:30

संंसारिक माणसांचे एक साधे स्वप्न असते की, संसाराच्या वाटेवरून चालता चालता हात रक्तबंबाळ झाले तरी मला समजावून घ्या!

Hey worldly, never say falsehood. | अरे संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये ।

अरे संसार-संसार, खोटा कधी म्हणू नये ।

Next

- प्रा. शिवाजीराव भुकेले

एक सांसारिक माणूस म्हणून, या संसाराबद्दल साधू-संतांचे काय विचार आहेत, हे ऐकायला मी कधी-कधी एखाद्या कथा-कीर्तनाला आणि एखाद्या संन्याशाच्या सत्संगालाही जातो अन् या विरक्तीची वल्कले धारण केलेल्या मंडळींचे विचार माझ्यासहित लाखो भक्तगण माना डोलावत ऐकू लागतात. हा संसार म्हणजे विस्तवाचे अंथरूण. हा संसार म्हणजे रोहिणीचे मृगजळ. हा संसार म्हणजे केवळ काल्पनिक जगतातला स्वप्नमय खेळ, जो स्वत:च स्वत:वर स्वार होतो, त्याला संसार म्हणतात, एवढेच नव्हे तर त्यासाठी संतांच्या विशिष्ट मनोभूमिकेचे प्रमाण देताना ही मंडळी म्हणू लागतात -
संसार दु:ख मूळ चोहीकडे इंगळ
विश्रांती नाही कोठे रात्रंदिस तळमळ ।
काम क्रोध लोभसुनी पाठी लागले ओढाळ
हे सारे विचार ऐकले की वाटायला लागते अरे! वेड्या, उंबरातील किडेमकोड्यांनी उंबरातच लीला कराव्यात आणि मरून जावे तसे तुझे आयुष्य फुकट गेले आहे. पण लगेच आतला आवाज साद घालू लागतो. अरे! ज्याने गूळ कधी खाल्लाच नाही तो कसा सांगू शकतो गूळ किती गोड आहे अन् किती आंबट आहे. खादल्याची गोडी कधी देखिल्यास येत नाही. तद्वत संसाराच्या काठावर उभे राहून संसार न करताच तो किती दु:खाचे मूळ आणि अनार्थाचे महाद्वार आहे, हे न अनुभवलेले अर्धसत्य ही मंडळी अगदी डांगोरा पिटवून छातीठोकपणे कसे सांगू शकतात? अरे! तुमच्यासारख्या लाखो संसाराला सात्त्विक अधिष्ठान देताना आमचे तुकोबा पांडित्याच्या कलाकुसरीशिवाय सरळ-सरळ सांगतात...
आपुलीया हिता जों असे जागता
धन्य माता-पिता तयाचिया ।
कुळी कन्या पुत्र होती जे सात्त्विक
तयांचा हरिख वाटे देंवा ।


संंसारिक माणसांचे एक साधे स्वप्न असते की, संसाराच्या वाटेवरून चालता चालता हात रक्तबंबाळ झाले तरी मला समजावून घ्या! केविलवाणा आक्रोश कुणाकडेही न करता आपल्याच संसाराच्या वेलीवर कर्तृत्ववान फुले फुलवायची अर्थात मुलामुलींनी पूर्वजांचे पोवाडे गाण्यापेक्षा स्वकर्तृत्वाने वाडवडिलांचे महत्त्व वाढवावे. त्यांना स्वार्थाच्या बाजारात रडणाऱ्या पामरांप्रमाणे भौतिक हित नाही समजले तरी चालेल, परंतु सात्त्विक विचारांच्या पणत्या आपल्या घरात तेवत राहाव्यात, अशा या सात्त्विक विचारांचे संवर्धन साधूसंत, बुवा-बैरागी यांच्या सत्संगाच्या मेळाव्यातून होते की नाही हे मला माहीत नाही, पण आपल्या लेकरांसाठी आयुष्याची बाजी लावून देवघरासमोर वाती वळणाºया आईच्या चेहºयातून मात्र सात्त्विक विचाराचे संवर्धन अवश्य होते. तर वरून कठोर दिसणाºया परंतु आतून संस्कारसंपन्नतेची बेटे निर्माण करणाºया बापाची एकच इच्छा असते, ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा.’ म्हणून हा संसार अतिशय गोमटा म्हणून तेवढ्या खालच्या पातळीवर जाऊन भोगू नये आणि ओखटा म्हणून त्यागू नये. किती सोपे आणि पचणारे संसारिकाचे तत्त्व आहे ना! जर संसाराला सात्त्विक विचारांचे, शुद्ध आचाराचे आणि स्वकर्म कुसुमांचे अधिष्ठान दिले की संसारसुद्धा स्वानंदाच्या कंदातील महासागर होतो. म्हणून संसाराला कधी छोटाही म्हणू नये अन् कधी खोटाही म्हणू नये. याचे रसाळ विवेचन करताना बहिणाबाई म्हणतात -
अरे संसार-संसार,
खोटा कधी म्हणू नये ।
देवळाचे कळसाला
लोटा कधी म्हणू नये ॥

Web Title: Hey worldly, never say falsehood.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.