भक्त निवडरहित असतो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 05:04 AM2018-12-12T05:04:18+5:302018-12-12T05:05:06+5:30

भक्त ही अशी व्यक्ती आहे, जिला जीवनात स्वत:साठी काही राखून ठेवायचे नाहीये किंवा त्या व्यक्तीला जीवन उद्यासुद्धा जगायचे नाहीये. असा भक्त हा नेहमीच आजच्यापुरता म्हणजे वर्तमानात जगणारा असतो.

devotee is free of choice | भक्त निवडरहित असतो

भक्त निवडरहित असतो

Next

- सद्गुरु जग्गी वासुदेव

भक्तीत कंजुषी नसते, याउलट तुम्ही उत्साहाने ओतप्रोत असता. तुमच्यातील सर्वकाही उत्साहाने सदैव ओसंडून वाहात असते. प्रत्येक क्षणी, तुमच्यातून जे काही ओसंडून वाहू शकते, ते ते सर्वकाही वाहत असते. मागे काहीच शिल्लक ठेवले जात नाही. ही समर्पित होणारी भावना आणि स्वत:पुरते काही न पाहता संपूर्णपणे वाहून घेणे, हीच सारी त्या भक्तीत मन:पूत उतरते. ती ज्याच्या ठायी असते, त्यालाच ‘भक्त’ असे म्हणतात. असा हा भक्त नेहमीच आपले आयुष्य शक्य तितक्या लवकर आणि शक्य तितके पूर्णपणे सद््गुरूसाठी, भक्तीसाठी वाहून देण्याच्या प्रयत्नात असतो. भक्त ही अशी व्यक्ती आहे, जिला जीवनात स्वत:साठी काही राखून ठेवायचे नाहीये किंवा त्या व्यक्तीला जीवन उद्यासुद्धा जगायचे नाहीये. असा भक्त हा नेहमीच आजच्यापुरता म्हणजे वर्तमानात जगणारा असतो. तो इतका परिपूर्ण असतो की, त्याला अन्य कुणाच्याही सहवासाची गरज भासत नाही किंवा इतर कुठल्याही गोष्टीची गरजसुद्धा विरून जाते. तो, त्याची भक्ती आणि ती ज्याच्यावर आहे, असे सारे एकरूप होऊन गेलेले असतात. त्यांच्यात भक्त आणि त्याची भावना या पलीकडे दुसरे विश्वच उरत नाही.
त्याचे हे असे असणे, म्हणजे तो काही निरुपयोगी आहे म्हणून झालेले नसते, तर तो निवड-रहित झालेला आहे. ज्याचा उल्लेख आपण निर्गुण-निराकार असा करतो, तशीच काहीशी ही अवस्था म्हणायला हवी. भक्त आणि तो ज्याच्यावर भक्ती करतो, असे दोघेही परस्परांमध्ये पूर्णत: सामावले गेल्याचेच हे लक्षण आहे. जीवन जगण्यापासून निवडपूर्वक जीवन जगण्याइतपत ही मानवी उत्क्रांती आहे. तुम्ही माकडाच्या प्रक्रियेतून पार पडून मानव बनलात. जे जीवन, त्यातील बदल किंवा उत्क्रांती अनिवार्य होती, त्यात आता निवड आलेली आहे. म्हणजेच अनिवार्यतेकडून निवडीकडे जाणे ही उत्क्रांती असेल, तर निवडीकडून निवडरहित होऊन जगणे ही क्रांती म्हणायला हवी. अनिवार्य नव्हे, तर निवडरहित जीवन. हीच साक्षात्काराची मूक क्रांती आहे. निवडरहित जीवन ही भक्ताची नैसर्गिक स्थिती आहे. केवळ जेव्हा तुम्ही दु:खी-कष्टी असता, फक्त तेव्हाच तुम्हाला जीवनात निवड करावी लागते. जर तुम्ही पूर्णत: उत्साही असाल, तर तेव्हा त्या अवस्थेत जीवनात तुम्हाला कोणत्याही निवडीची गरजच कधी भासत नाही. जगण्याचा केवळ एकच मार्ग तुमच्यासमोर असतो आणि तो सदासर्वकाळ परिपूर्ण असतो.

Web Title: devotee is free of choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.