आनंद तरंग: शांती परते नाही सुख

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 02:07 AM2019-07-22T02:07:49+5:302019-07-22T02:08:03+5:30

दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत.

Anand Tarang: Return to Shanti No Pleasure | आनंद तरंग: शांती परते नाही सुख

आनंद तरंग: शांती परते नाही सुख

googlenewsNext

प्रा. शिवाजीराव भुकेले

शांती नावाच्या स्फटिकगृहातील डोलणारे अजातशत्रू दीपक म्हणजे संत होत. समता, ममता आणि शांती ही संताच्या जीवनातील त्रिवेणी होती. संसारात घडणाऱ्या नाना घटनांनी संताच्या मनाची शांती कधी विचलित झाली नाही. भ्रांतक्रांत व गलितगात्र झालेल्या समाजाला सन्मार्गाचा व सुसंस्काराचा उजेड दाखविण्याचे काम शांती नावाचा सद्गुण करतो. नदीचा प्रवाह हा जसा स्वाभाविकपणे सागराकडे जाण्यासाठी प्रवाहित होतो, सूर्यफूल जसे सूर्याच्या तेजाकडे तोंड करून बसते अन् आपल्या पिवळ्या धम्मक सगुण रूपाचा साक्षात्कार देते, चकोर जसे चंद्राकडे अमृतकणाची आस करण्यासाठी आपली चोच उघडून बसतात तसे संत भगवंताकडे शांत व संयमी जीवनाचे दानङ्कमागतात. कारण शांती हेच जगातील सर्वोत्तम सुख आहे. शांत-शांत जलाशयात जसे चंद्रासहीत स्वत:चे प्रतिबिंंब न्याहाळता येते अगदी तसेच शांत-शांत मनरूपी सरोवरात जीवत्वाचे भाव गळून जातात आणि शिवत्वाकडे वाटचाल सुरूहोते. निंदा-अवज्ञा-उद्धटपणा यांचे अडथळे जीवनरूपी रस्त्यावर वारंवार येणारच; पण या अडथळ्यांना पार करून जो अडथळा आणणाऱ्यांचे अहित चिंतित नाही तो शांतीचा प्रत्यक्ष पुतळा असतो. दंभी-दुर्जनांनी कितीही निंदा केली तरी संत कधी कोमेजले नाहीत अन् मुखवटे धारण करणाºयांनी कितीही खोटी प्रशंसा केली तरी हुरळून गेले नाहीत. कारण मानसिक शांती हाच तर संताचा स्थायीभाव होता. शरीराच्या पसाºयातील आपलाच हात अन् पाय आपल्याच अंगावर आदळला म्हणून आपण त्याला कधी कापून टाकत नाही. समाजात अगदी तसेच आहे म्हणून संत जगाचे आघात अगदी शांतपणे सहन करतात. शांती हेच परमसुख आहे हे सांगताना तुकोबाराय म्हणतात -

शांती परते नाही सुख। येर आवघेचि दु:ख।
म्हनवूनि शांती घरा। उतराल पैलतीरा।
खवळलीया कामक्रोधी। अंगी भरती आधीव्याधी।
तुका म्हणे विविध ताप। जाती मग आपोआप॥
वैषयिक सुखाच्या पाठीमागे लागलेल्या आजच्या भयग्रस्त जीवनात शांती परते सुख नाही. केवळ वैयक्तिक जीवनातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरील शांतता धोक्यात येत आहे. आंचन, कांचन, करवंदीने भरलेला, ऋषीमुनींच्या शांतीघोषाने दुमदुमणारा आपला भारत देश चहूबाजूने अशांत होत आहे. अशा वेळी धीर धरा रे, धीरापोटी शांती उपजेल गोमटी असा संदेश देणाºया संत विचारांची आज खरी गरज आहे. जेथे शांती नसते तेथे संसारिक असो वा पारमार्थिक असो अशा शांत-सुखाला कधी थाराच मिळू शकत नाही. शांततेच्या अभावाने आत्मविश्वास ढळतो आणि आत्मविश्वास ढळलेल्या जगात हिंसेच्या आणि भयाच्या नरसंहारक लाटा उसळत असतात. म्हणूनच विचारवंत आजही संदेश देत आहेत की, आता युद्ध नको बुद्ध हवा. समाज जीवनाला अधिभौतिक आधिदैविक व आध्यात्मिक तापांनी तप्त केले आहे त्यावर आपल्या हृदयस्थ शांतीचेच शिंंपण करायला हवे. जगात इतर प्रत्येक विषयांचा अंत दु:खांत आहे; पण शांतीचा अंत मात्र सुखांत आहे. परंतु, आज इतर प्राणिमात्रांनी माणसाचा शत्रू होण्यापेक्षा माणूसच झालाय माणसाचा वैरी. दुसºयाला नष्ट करण्याच्या कुविचारांचे गिधाडे आणि घारी आकाशात नव्हे, तर माणसाच्या डोक्यात घिरट्या घालत आहेत. जिकडे-तिकडे हिंंसेच्या ज्वाला उफाळत आहेत. मानवतेची राख-रांगोळी होत आहे. अशा वेळी शांतीला परब्रह्म मानणारे शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात -
शांती तोचि समाधान। शांती तोचि ब्रह्मज्ञान ।
शांती तोचि ब्रह्म पूर्ण। सत्य जाण उद्धवा ॥

Web Title: Anand Tarang: Return to Shanti No Pleasure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.