लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

By संजय तिपाले | Published: August 15, 2022 01:38 PM2022-08-15T13:38:28+5:302022-08-15T13:56:23+5:30

शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला.

The funeral procession of former MLA Vinayak Mete started from Shiv Sangram Bhavan. | लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

लढवय्या भूमिपुत्रासाठी अश्रूंचा बांध फुटला; बीडमध्ये कडकडीत बंद, अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय

googlenewsNext

बीड: राजेगाव ते मुंबई असा वादळी प्रवास करणारे शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांच्या जाण्याने बीड जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता शिवसंग्राम भवन येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. लढवय्या नेत्याला अंतिम निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय सहभागी आहे. शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असून राज्यभर कीर्ती गाजविणाऱ्या नेत्यासाठी बीडकरांच्या अश्रूंचा बांध फुटला.

मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांनी अखेरपर्यंत लढा दिला. आरक्षण प्रश्नी मंत्रालयात आयोजित बैठकीला जातानाच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर १४ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता त्यांचे अपघाती निधन झाले. सामान्य शेतकरी कुटुंबातील विनायक मेटे यांनी कार्यकर्ता ते आमदार असा उत्तुंग प्रवास केला. अपवाद वगळता सलग पाचवेळा विधानपरिषदेत पोहोचलेल्या मेटे यांनी राज्याच्या राजकारणात वेगळा ठसा उमटवला होता.

अमर रहे... अमर रहे.. मेटे साहेब अमर रहे या घोषणांसह अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांची आरास केलेल्या भव्य रथात विनायक मेटे यांचा पार्थिवदेह ठेवला होता. यावेळी कुटुंबातील सदस्य या रथात होते. टाळ-मृदंगाचा गजर व विनायक मेटे यांचा जयघोष करत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बशीरगंज, बलभीम चौक,माळीवेस,सुभाष रोड, शाहूनगर मार्गे अंत्ययात्रा कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानाजवळ पोहोचणार आहे.

अंत्यविधीला मातब्बर नेते येणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री रामदास आठवले, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा दौरा निश्चित आहे. मात्र, ऐनवेळी काही मंत्री, आमदार येण्याची शक्यता आहे.

Web Title: The funeral procession of former MLA Vinayak Mete started from Shiv Sangram Bhavan.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.