पुसदमधील थरार! भररस्त्यावर टोळक्याने केला युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:33 PM2021-09-15T16:33:02+5:302021-09-15T16:44:10+5:30

Yavatmal News मंगळवारी रात्री ८ वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर भररस्त्यात १५ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर सशस्त्र हल्ला केला. वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. 

a youth killed by mob | पुसदमधील थरार! भररस्त्यावर टोळक्याने केला युवकाचा खून

पुसदमधील थरार! भररस्त्यावर टोळक्याने केला युवकाचा खून

Next
ठळक मुद्देवर्चस्वाच्या लढाईतून झाला घात, दोन संशयित ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

यवतमाळ : पुसद शहराची ओळख ही आता जिल्ह्यातील क्राईम कॅपिटल म्हणून होत आहे. १४ सप्टेंबरला  रात्री ८ वाजता उपजिल्हा रुग्णालयासमोर भररस्त्यात १५ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर सशस्त्र हल्ला केला. धारदार शस्त्राचे सपासप वार करून त्याला जागेवरच ठार करण्यात आले. मनोज किसन सवंगडे (२२) रा. भीमनगर श्रीरामपूर असे मृत युवकाचे नाव आहे. वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. (a youth killed by mob)

मनोजवर आरोपी माधव चिरंगे (२१), बाबू बडवने, करण संजय मेकवान, राेहन गरवारे, संघदीप भगत, सॅन्डी ऊर्फ सौरभ मेश्राम, अजय ज्ञानेश्वर सावंत सर्व रा. पुसद यांच्यासह तीन ते चार जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. पोलिसांनी करण मेकवाण व अजय सावंत या दोघांना ताब्यात घेतले आहे. इतर आरोपी पसार आहे. शेकडो नागरिकांसमोर हा थरार घडला. यापूर्वी अशाचप्रकारे जुन्या वादातून पुसदमध्ये थेट गोळ्या झाडून ठार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.

जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपीने उपजिल्हा रुग्णालय चौकातील परिसरात घात लावला. मनोज हा दोन मित्रासह दुचाकीवरून या परिसरात आला असता त्याच्यावर हल्ला चढविण्यात आला. मनोजचे दोन मित्र घटनास्थळावरून पसार झाले. आरोपींनी चाकूचे सहा वार मनोजच्या पाठीत केले. यातच तो जागेवर कोसळला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी मनोजचा मित्र मनोहर श्रीरामे रा. वेणी ता. पुसद याच्या तक्रारीवरून कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ५०६ व मुंबई पोलीस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. मनोजला दोन भाऊ, तीन बहिणी आहेत.

आरोपींच्या शोधात दोन पथक रवाना

आरोपींना तत्काळ अटक व्हावी यासाठी पोलिसांचा कसून तपास सुरू आहे. त्यासाठी पुसद शहर पोलिसांनी दोन पथक तयार केले आहे. शहरात वर्चस्व राखण्याच्या चढाओढीतूनच ही हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी सतर्कता म्हणून ठराविक भागात बंदोबस्त लावला आहे.

मृतकावरही तडीपारीचा प्रस्ताव

मनोज सवंगडे याच्या विरोधातही शरीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहे. तो गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय होता. त्याच्या तडीपारीचा प्रस्तावही पुसद शहर पोलिसांनी पाठविला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळण्यापूर्वीच मनोजचा खात्मा झाला.

Web Title: a youth killed by mob

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.