Yavatmal's Public Works Project will interfere with the state government | यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पाची राज्य शासनाकडून दखल
यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम प्रकल्पाची राज्य शासनाकडून दखल

ठळक मुद्देग्रीहा ग्रीन बिल्डींगचे कौतुक : मरपल्लीकर यांना रायझिंग स्टार अवार्ड

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी ग्रीहा ग्रीन बिल्डींग प्रकल्पासाठी घेतलेल्या कष्टाची राज्य शासनाने दखल घेतली आहे. या कामाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मरपल्लीकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला.
अस्तित्वातील इमारतींमध्ये सुधारणा करून त्यांना पर्यावरण पूरक बनविणे, इमारतीमध्ये नैसर्गिक हवा, प्रकाश खेळता राहण्याच्या दृष्टीने बांधकाम करणे असा प्रकल्प राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरू केला आहे. यवतमाळ येथील कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर यांनी या प्रकल्पात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पीडब्ल्यूडी-ग्रीहा ग्रीन बिल्डींग इनिशिएटीव्ह अशा नावाने सुरू असलेल्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मरपल्लीकर यांनी विविध इमारतींना सुधारित केले आहे. या कामाची दखल घेत १४ जून रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मरपल्लीकर यांना ग्रीहा रायझिंग स्टार अवार्ड प्रदान करण्यात आला. आपल्या प्रयत्नामुळे या संपूर्ण प्रकल्पाचे काम प्रभावीपणे आणि मुदतीत पूर्ण होईल, अशा प्रकारचे प्रशस्तीपत्रही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मरपल्लीकर यांना बहाल केले.


Web Title: Yavatmal's Public Works Project will interfere with the state government
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.