विलास गावंडे, यवतमाळ: एसटी बस किती वेगाने चालवायची याचे नियम प्रादेशिक परिवहन विभागाने घालून दिलेले आहे. काही चालक नियम तोडून, प्रसंग पाहून वेगमर्यादा सोडून बस दामटवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची शिक्षा दंडाच्या स्वरूपात संबंधित चालकांना मिळाली आहे. मागील काही वर्षांत आरटीओने सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड वसूल केल्याची माहिती आहे.
एसटी बस प्रवासी वाहतुकीचे वाहन आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी बसेस विशिष्ट वेग मर्यादेवर लॉक करण्यात आलेल्या आहेत. तरीही काही चालक मर्यादा तोडून बस पळवितात. याचा फटका त्यांना बसत आहे. झालेला दंड प्रारंभी महामंडळाकडून भरला जातो. नंतर टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून रक्कम कपात केली जाते.
एसटी बसचे स्पीड ६० ते ७० किलोमीटरवर लॉक केले जाते. ही सोय जुन्या गाड्यांमध्ये आहे. शिवशाही बस व इतर काही नवीन गाड्यांमध्ये नाही. अशाच गाड्या अधिक वेगाने पळविल्या जातात. प्रामुख्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्गावर ही मर्यादा तोडली जात असल्याची माहिती आहे.
किती दंड आकारला जातो?वेगमर्यादा तोडल्यास चार हजार रुपये दंड केला जातो. लेन कटिंगचा दंड एक हजार रुपये लागतो. सिग्नल जंप केल्याचा भुर्दंड ५०० रुपये बसतो. गर्दीच्या ठिकाणी आणि स्टॉपशिवाय इतर ठिकाणी गाडी थांबविल्यास १००० ते १५०० रुपये दंड केला जातो. महामंडळाच्या एकट्या ठाणे विभागाकडून मागील काही वर्षांत ८० लाख रुपये दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
श्रीरंग बरगे यांची प्रतिक्रियामहाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचीटणीस श्रीरंग बरगे म्हणाले की, "विशिष्ट परिस्थितीत लेन कटिंग करून पुढे जावे लागते. कधीकधी रुग्ण प्रवाशांना मानवतेच्या दृष्टिकोनातून उचित स्थळी पोहोचवायचे असते. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून वेगमर्यादा योग्य असली तरी परिस्थितीचा तसेच एसटीच्या एकंदर सेवेचा विचार केल्यास वेग मर्यादेत शिथिलता देण्यात आली पाहिजे. दंड वसूल करताना एसटीच्या सेवेचा आणि यापुढे चालकांच्या पगारातून वसुली करताना त्यांच्याही आर्थिक स्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे."