हिवरधरा येथे साऱ्याच कारभारणी : गावाच्या भल्यासाठी सावित्रीचा आदर्श विठ्ठल कांबळे घाटंजी शिक्षणाची कास धरून अख्खे गाव समृद्ध करण्यासाठी गावाच्या कारभाराची सारी सूत्रे महिलांनी हाती घेतली आहेत. हे गाव आहे तालुक्यातील हिवरधरा. सरपंचापासून ग्रामसेविकेपर्यंत येथे साऱ्या महिलाच. गाव प्रगतीच्या वाटेवर आणण्यासाठी त्या काय करतात? शाहू, फुले, आंबेडकरांच्या तत्त्वांचा विचार करतात अन् छत्रपती शिवरायांच्या धडाडीने प्रत्यक्ष काम करतात. खेडे जागविणाऱ्या ‘सावित्रीं’ची ही कहाणी खास महिला दिनानिमित्त... तालुक्यातील हिवरधरा हे एक नव्या विचारांचे गाव. तालुक्यापासून १२ किलोमीटर अंतरावर डोंगरदऱ्यात विसावलेले हे ७०० लोकवस्तीचे गाव. या गावाचा संपूर्ण कारभार महिला सक्षमपणे पाहात आहेत. गावच्या सरपंच समिधा अरुण खडसे, तर पोलीस पाटील अर्चना अनिल गावंडे आहेत. ग्रामसेविका याही ताई मिसाळ आहेत. शाळा समितीच्या अध्यक्ष गीता बंडू आत्राम, जिल्हा परिषद शिक्षिका संगीता प्रभाकर चव्हाण, आरोग्यसेविका ताई चव्हाण, अंगणवाडी शिक्षिका ज्योत्स्ना परशराम मरस्कोल्हे या आहेत. म्हणजेच पदाधिकारी तसेच गाव आणि शासनाचा दुवा असणारे कर्मचारीही महिलाच आहेत. त्यामुळे या गावाची सत्ता आणि कारभाराची सूत्रे महिलांच्या हाती आहेत. या छोट्याशा गावात सर्व धर्माचे लोक आनंदाने व गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. सुख-दु:खात धावून जातात. कोणतेही उपक्रम गावकरी मिळून साजरा करतात. या गावाच्या कारभारणी ज्ञान आणि विकासावर भर देतात. त्यासाठी त्यांनी मकरसंक्रांतीच्या परंपरेला फाटा देत ज्ञानाच्या प्रसारासाठी गावात ग्रंथदिंडी काढली. वाणाऐवजी २०० ‘ग्रामगीता’ वाटप केल्या. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले. गावाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्या विविध उपक्रम राबवितात. बचतगटाच्या माध्यमातून त्यांनी गावातील महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी जागृत केले. गावात शैक्षणिक वातावरण निर्मिती, स्वच्छतेचा ध्यास छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वसा घेत सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शावर पाऊल टाकत या महिला काम करीत आहे. गावात शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासोबतच गावात शौचालय बांधून गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. बळीराजा चेतना अभियानांतर्गत गावात जनजागृती करून मतदार नोंदणी, बचत गट आदी शासनाच्या विविध उपक्रमात त्यांचा सहभाग असतो.
महिला कारभारणींनी जागविले खेडे!
By admin | Updated: March 8, 2017 00:10 IST