लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : निसर्गाने अवकृपा दाखविल्यानंतर पीक नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी शेतकरी विमा काढतात. मात्र एक रुपयात पीक विमा योजना राबविणाऱ्या सरकारने गतवर्षी शेतकऱ्यांना ५० ते १०० रुपयांची भरपाई देऊन थट्टा केली होती. त्यामुळे यंदाही घोळ घातला जाणार की, शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जाणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात तब्बल ९ लाख हेक्टरवर कापूस, सोयाबीन, तूर आदी पिकांची लागवड करण्यात आली.
ई-केवाएसीचा खोडा सूचना केलेल्या सर्वच शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ दिला जाईल. केवळ आधार सिडिंग आणि ई-केवायसी नसलेल्या शेतकऱ्याची मदत प्रलंबित राहील, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
एकच सूचना ग्राह्य धरणार काही शेतकऱ्यांनी दोन ते तीन सूचना केल्या आहे. कृषी विभागाकडून पंचनामे रॅण्डम पद्धतीने लावण्याचे काम सुरू आहे. नुकसान भरपाई देण्यासाठी एकच सूचना ग्राह्य धरली जाणार आहे.
साडेसात लाख शेतकऱ्यांनी काढला पीकविमा शासनाने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरू केली आहे. या योजनेतून साडेसात लाखांवर शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरविला. खरीप हंगामात अतिवृष्टी व पूरपरिस्थतीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर पाच लाख ३५ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना दिली. शेतशिवारात जाऊन पंचनामे करण्यात आले. कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. शासनाने प्रीमियम दिल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून पीक विम्याचा लाभ दिला जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गतवर्षी पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा मोठा भ्रमनिरास झाला. त्यामुळे यंदा योग्य भरपाई दिली जाते का, याकडे लक्ष आहे.