देवानंद पवार : सत्ताधाऱ्यांच्या संवाद यात्रेवर टीका लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केवळ एकमेकांना ‘काउंटर’ करण्यासाठी सर्वच पक्ष यात्रा काढायला लागले आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांनी शिवार संवाद यात्रा काढण्यापेक्षा, तातडीने निर्णय घेतला पाहिजे. आता उन्हाळ्यात उलंगवाडी झालेल्या शिवारात मुख्यमंत्री कुणाशी संवाद साधत आहेत? त्यापेक्षा मार्केट यार्डात ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधा, अशी टीका लोकजागृती मंचचे प्रमुख देवानंद पवार यांनी केली. राज्यातील शेतकरी अडचणीत असल्याने त्यांचे गाऱ्हाणे सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी काँग्रेसने संघर्ष यात्रा काढली. ते पाहून शिवसेनेनेही शिवसंपर्क यात्रा सुरू केली. आता आपणच मागे का राहायचे म्हणून सत्ताधारी भाजपानेही शिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. एकमेकांना प्रत्युत्तर देण्यासाठी हा खेळ आहे. विरोधकांनी अशी यात्रा करणे संयुक्तिक आहे. पण ज्यांच्या हाती निर्णयाची ताकद आहे, अशा मुख्यमंत्र्यांनी, त्यांच्या आमदारांनी कशाला यात्रा करायच्या? त्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांच्या सोयीचे निर्णय तातडीने घ्यावे, अशी अपेक्षा जिल्हा परिषद सभापती देवानंद पवार यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कोसळल्यावर ते बचावले. अशावेळी अनेक लोकांनी चित्रविचित्र संदेश सोशल मीडियातून पसरविले. वास्तविक हा प्रकार चुकीचाच आहे. पण सरकारच्या धोरणांमुळे मुख्यमंत्र्यांविषयी जनभावना किती तीव्र आहे, हे त्यातून स्पष्ट झाले. कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्यापेक्षा प्रत्युत्तर देण्यातच सत्ताधारी धन्यता मानत आहेत. मात्र त्यांनी जनतेला उत्तरदायी असावे, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली. सध्या शेतशिवारात पीक उभे नाही, उन्हाळवाहीची कामे सुरू मात्र दुपारच्या उन्हात शेतकरी शिवारात नसतात. अशावेळी मुख्यमंत्री शेतात जाऊन कुणाशी संवाद साधतात? केवळ आपल्यासोबत काही कार्यकर्ते न्यायचे आणि संवाद साधल्याचे भासवायचे, असा प्रकार सुरू आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी मार्केट यार्डात तूर विक्रीसाठी ताटकळत असलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधावा, असे पवार म्हणाले.
यात्रा कशाला, निर्णय घ्या !
By admin | Updated: May 29, 2017 00:50 IST